- शंकर टेमघरे
पुणे: ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी,’ अशी महती असलेल्या वारकरी संप्रदायाने समाजाला नेहमीच दिशा दिली आहे. सध्या वारकरी तरुणही कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राबाहेर संतविचार पोचविताना दिसतात. तमिळनाडूमधील एक तरुण वारकरी संत विचाराचा अभ्यास करून, तो ठेवा थेट लंडनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पोचविणार आहे. त्या तरुणाचे नाव आहे रघुनाथदास महाराज. ‘वारकरी संप्रदाय आणि ज्ञानोत्तर भक्ती’ या विषयावर ते आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी व्याख्यान देणार आहेत.
साडेसातशे वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार संत नामदेव महाराजांनी पंजाबपर्यंत केला. त्यानंतरच्या काळात वारकरी सांप्रदायिक तत्वज्ञान अनेक भाषकांपर्यंत पोचले. त्यामध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगण, तमिळनाडू, गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. अनेक कीर्तनकारांनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे विचार अन्य राज्यांत नेले. सध्याही अनेक राज्यांमध्ये उच्चशिक्षित कीर्तनकारांची व्याख्याने होतात.
ग्रंथांचे तमीळ भाषेत भाषांतरित
तमिळनाडूमधील तुकाराम गणपती महाराज हे पंढरीच्या वारीच्या निमित्ताने ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांच्या संपर्कात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायाचे काम तमिळनाडूमध्ये सुरू केले. तेथे त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला. त्यानंतरच्या काळात चेन्नई, कोइमतूर, कडईनल्लूर या शहरांमध्ये येथील तमीळ वारकऱ्यांसाठी सातारकर महाराजांनी इंग्रजीमध्ये कीर्तने केली. त्याचा मोठा प्रभाव तमिळनाडूमध्ये पडला. तेव्हापासून त्या भागात मोठ्या प्रमाणात ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा पारायणे, एकनाथी भागवत कथेचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. तमीळ भाविकांना भाषेचा अडसर येत असल्याने तुकाराम गणपती यांचे चिरंजीव रघुनाथदास महाराज यांनी अनेक वारकरी सांप्रदायिक ग्रंथ तमीळ भाषेत अनुवादित केले. त्यामुळे तमीळ भाविक अभंगांचा उच्चार मराठी करतात. मात्र, त्याचा अर्थ त्यांना तमीळ भाषेत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
परदेशातील भाविकांसाठी प्रवचने
वारकरी संप्रदायावर प्रेम करणाऱ्या तमीळ भाविकांसाठी रघुनाथदास महाराज यांनी दहा वर्षांपासून ज्ञानेश्वरीवर इंग्रजीत प्रवचने देण्यास सुरुवात केली. त्यामध्ये अमेरिका, जर्मनी, लंडनसह सुमारे बारा देशांतील भाविकांचा समावेश आहे. त्यांच्या या प्रवचनांच्या माध्यमातून त्यांची महती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीपर्यंत पोचली. त्यांना या युनिव्हर्सिटीच्या हिंदू स्टडी विभागाच्यावतीने वारकरी संप्रदाय आणि ज्ञानोत्तर भक्ती या संकल्पनेवर प्रवचनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. येत्या सोमवारी त्यांचे प्रवचन युनिव्हर्सिटीत होत आहे. वारकरी संप्रदायावरील प्रथमच अशा स्वरूपाचे व्याख्यान होत आहे.
तमिळनाडूमध्ये वाढतोय संप्रदाय
तमिळनाडूमध्ये प्रामुख्याने दक्षिण भारतीय संप्रदायाचा प्रभाव आहे. गोविंदपूरम् येथील विठ्ठलदास महाराज यांनीही वारकरी सांप्रदायिक संतांचे अभंग गायन तमीळ भाषिकांपर्यंत पोचविले. त्याचबरोबर तुकाराम गणपती महाराज यांनी बाबामहाराज सातारकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी कीर्तन प्रवचन परंपरा तमिळनाडूमध्ये वाढविली. पंढरीच्या वारीला येणाऱ्यांची संख्याही या राज्यातून वाढत आहे. कर्नाटक, तमिळनाडूमध्ये पंढरपूरमधील बोधले महाराज फडाच्यावतीने मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रचार करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
परदेशात यांचे झालेत कार्यक्रम
परदेशात यापूर्वी ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर, चैतन्य महाराज देगलूरकर, जयवंत महाराज बोधले, चिन्मय महाराज सातारकर, विश्वनाथ महाराज वारिंगे, प्रमोद महाराज जगताप, जगन्नाथ महाराज पाटील, भावार्थ महाराज देखणे, पुरुषोत्तम महाराज पाटील यांची कीर्तने तसेच प्रवचनांचे कार्यक्रम झाले आहेत. पुढील पंधरा दिवसांत रघुनाथदास महाराज लंडनमध्ये चार कीर्तने करणार आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे प्रवचन प्रथमच होत आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यान देण्याची संधी मिळाल्या नंतर याचे सर्व श्रेय त्यांनी वडील, गुरु आणि संताना दिले. त्यावेळेस ते बोलताना म्हणाले की, संत ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेले विचार हे वैश्विक आहे. त्यामुळे ते जगाच्या कल्याणासाठी निश्चित उपयुक्त आहेत. संतांची कृपा आणि वडील तुकाराम गणपती महाराज आणि गुरू बाबामहाराज सातारकर यांच्या मार्गदर्शनामुळेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यान देण्याची संधी मिळाली आहे.