अद्यापही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचा प्रश्न रखडलेला?

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

 

मुंबई: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना यासाठी विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
 
मराठी भाषेने अभिजात दर्जाचे चारही निकष पूर्ण केले आहे. गेल्या चौदा वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरच मार्गी लावावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली. तिला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला.
 
 
भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विधानसभेच्या कामकाजाच्या सुरूवातीलाच औचित्याचा मुद्दा उपस्थित करत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्न ऐरणीवर आणत सभागृहाचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री शिंदे यांनी याची दखल घेतली. ‘‘सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल, अशी ग्वाही शिंदे यांनी सभागृहाला दिली.
 
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. साहित्याची श्रेष्ठता, भाषेच्या वयाचे १५०० ते २००० वर्षांचे लिखित पुरावे, भाषेची स्वतंत्रता आणि भाषेचे मूळ स्वरूप व आजचे स्वरूप यांचे नाते असणे हे अभिजात भाषेचे चारही निकष मराठी भाषेने पूर्ण केलेले आहे. मात्र अद्यापही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचा प्रश्न रखडलेला असल्याची बाब भुजबळ यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिली.
 
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने तयार केलेला अहवाल केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ज्ञांनी सर्वानुमते मंजूर केला आहे. त्याला सात वर्षांहून अधिक काळ लोटला गेला असून अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. वास्तविक महाराष्ट्रातील ‘प्राकृत’ किंवा ‘महारठ्ठी’ या नावाने दोन अडीच हजार वर्षांपूर्वी प्रचलित, लोकप्रिय व मान्यताप्राप्त असलेली मराठी भाषा ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे म.म.राजारामशास्त्री भागवत यांनी १८८५ मध्येच दाखवून दिले आहे. यावर दुर्गा भागवत यांनी संशोधन करत विश्लेषण केले आहे. त्यात त्यांनी जुनी महाराष्ट्रीय भाषा संस्कृत पेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखविले आहे, असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
 
जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब
दक्षिणेकडील सात भाषांना आजवर अभिजात दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषेने देखील अभिजात भाषेचे निकष पूर्ण केले आहेत. या प्रश्नासाठी सर्वांचा पाठपुरावा हा अतिशय महत्त्वाचा असून यामुळे मराठी भाषेच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होईल तसेच देशातील ४५० विद्यापीठांमध्ये ही भाषा शिकविली जाणार आहे. त्यामुळे तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणीही छगन भुजबळ यांनी केली.