मनीषा सिंह
१४ सप्टेंबर रोजी विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो. हेच औचित्य साधत, हिंदी साहित्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आणि देशाच्या दृष्टीकोनाला आकार देणाऱ्या हिंदीतील प्रमुख्य साहित्यिकांची ओळख 'आवाज मराठी'वरून लेखमालेच्या रूपाने करून देत आहोत. त्यातील हा पहिला लेख...
एक वाचक म्हणून आपण विचार करतो की, भारतीय हिंदी साहित्याने 'कामायनी'पासून थेट 'युगवाणी'पर्यंतचा प्रवास कसा पूर्ण केला असेल? असे काय घडले असेल की, छायावादाकडून प्रगतिवादाकडे झालेले हे पदार्पण हिंदी साहित्य समीक्षकांचा एक उत्कृष्ट प्रयत्न ठरले. एक स्त्री म्हणून, जर मी १९३६ च्या काळात स्वतःला वाचताना आणि लिहिताना कल्पना करते, तर मला हे अत्यंत धाडसी वाटते. त्याचबरोबर, एक माणूस म्हणून नवनवीन विचार करण्याची वृत्तीही दिसते.
मला हा बदल केवळ रोचकच वाटत नाही, तर तो संवादाच्या दृष्टीनेही मानवतेचा एक उद्घोष होता. या काळात रांगेय राघव असोत, त्रिलोचन असोत किंवा शिवमंगल सिंह सुमन, या सर्वांचा आदर्शवादी यथार्थवाद साहित्य रसिकांच्या मनात एक सकारात्मक आशा निर्माण करतो.
पण जर याला आधुनिक दृष्टिकोनातून आणि भारतातील सध्याच्या स्त्रीवादी चिंतनाच्या दृष्टीने पाहिले, तर माझ्या मनात एक प्रश्न येतो की, या मार्क्सवादी चिंतनाच्या आणि क्रांतीच्या काळात स्त्री रचनाकार कुठे मागे राहिल्या?
महादेवी वर्मा यांचा दीन स्वर आणि सुभद्राकुमारींची मर्दानी लक्ष्मीबाई यांव्यतिरिक्त, स्त्रिया असे काही लिहित नव्हत्या का, ज्याची नोंद झाली नाही? की काही रिकाम्या जागा राहून गेल्या? हा विचार करत मी थोडा अभ्यास केला, तेव्हा माझ्या लक्षात आले की, प्रगतिवादाला पूर्णपणे पुरुषप्रधान काळ मानल्यास कोणतीही अतिशयोक्ती ठरणार नाही.
अशा वेळी, 'बहुजन हिताय'चा नारा देणारा हा काळ स्त्री-प्रश्नावर कसा चुकला? त्यावेळी युरोपात स्त्रीवादी आंदोलन एका महत्त्वाच्या टप्प्यातून जात होते. निदान थोडीफार चर्चा तरी इथेही होत असेल?
अशा परिस्थितीत, स्त्री-मनाला उलगडणाऱ्या किंवा युरोपप्रमाणे बहुआयामी विचारांना आवाज देणाऱ्या फारशा स्त्री लेखिकांची नावे हाती लागत नाहीत. अशा वेळी ताराबाई शिंदे यांचे नाव घेणे मला समर्पक वाटते, जरी त्यांचे लेखन प्रगतिवादाच्या खूप आधीचे आहे.
ताराबाई शिंदे थेट शब्दांत आपल्या रचनेला 'स्त्री-पुरुष तुलना' असे नाव देतात. फुले दांपत्यही अठराव्या शतकापासूनच स्त्रीवादी चिंतन आणि नारी-चेतनेला आवाज देत होते. तरीही, मला आजही हे विचित्र वाटते की, प्रगतिवादी लेखनात ज्या स्त्री लेखिकांच्या योगदानाचा इतिहास आहे, त्यात स्त्री-चेतनेचा वापर दिसूनही कुठेतरी स्त्रीच्या असहाय्यतेचेच वर्णन आहे.
“क्या पूजन, क्या अर्चन रे!” च्या जागी “स्त्री का कमरा” (स्त्रीची खोली) यांसारख्या चिंतनाचा अभाव का जाणवतो? आश्चर्याची गोष्ट म्हणजे, प्रगतिवादामध्ये स्त्रीवादी चिंतनाचे किंवा स्त्रियांच्या वास्तवाच्या चित्रणाचे श्रेयही पुरुष रचनाकारांना, विशेषतः प्रेमचंद यांना दिले जाणे, हे प्रगतिवादासारख्या आशावादी काळात माझ्यासारख्या एका सामान्य वाचकाला निराशेने भरते. कारण माझ्या मते, स्त्रीबद्दल स्त्रीने लिहिणे महत्त्वाचे आहे.
हीच निराशा भरून काढण्यासाठी, मी जेव्हा जेव्हा एक विद्यार्थी म्हणून प्रगतिवादाचा अभ्यास केला, तेव्हा तेव्हा मला वाटले की काहीतरी सुटले आहे. कारण पंधराव्या शतकातील ललद्यद असोत किंवा मीरा, किंवा अठराव्या शतकातील फुले दांपत्य, या सर्वांचे विचार प्रगतिवादी स्त्री लेखिकांपेक्षा अधिक धारदार आणि काळाच्या खूप पुढचे वाटतात.
अशा वेळी, प्रगतिवादी रचनांमध्ये स्त्री लेखिकांची उपस्थिती इतकी शांत कशी आहे? इतकेच नाही, तर “दुखिनी बाला” कोण आहे, हे आजही एक रहस्य आहे. इतक्या तेजस्वी लेखनालाही प्रकाशनासाठी २००८ साल उजाडावे लागले. अशा वेळी, माझे बंडखोर मन म्हणते की, निश्चितच अनेक रिकाम्या जागा राहून गेल्या आहेत, ज्या कदाचित प्रगतिवादाला आणखी सुंदर बनवू शकल्या असत्या.
या रिकाम्या जागा म्हणजे स्त्रीवादी लेखनाकडे दुर्लक्ष करणे. याची अनेक कारणे असतील, पण आज त्यांना सबबी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जानकीदेवी बजाज यांच्या रचनांनाही नुकतीच प्रकाशनाची संधी मिळाली. अशा परिस्थितीत मार्क्सवादी स्त्रीवादही अपूर्णच राहिला.
जर भांडवलशाही विविध प्रकारे भारतीय संदर्भात रोषाचा विषय ठरली, तर स्त्रिया कशा मागे राहिल्या असतील? माझे मत आहे की, आजच्या काळातही जेव्हा आपण हिंदी साहित्यात बोटांवर मोजता येणाऱ्या स्त्रियांची नावे घेतो, अशा वेळी जर या रिकाम्या जागा राहिल्या नसत्या, तर विचारांच्या भूमीची सुपीकता वेगळीच असती. कदाचित तो काळ काही वेगळा असेल, पण ही चूक झाली नसती, तर आजच्या स्त्रीवादी संघर्षांची भारतीय पार्श्वभूमी खूप मजबूत असती आणि 'बहुजन हिताय'चे दर्शन संपूर्ण झाले असते.
(मनीषा सिंह या लेखिका आणि शिक्षिका आहेत)