९व्या अ. भा. मुस्लीम साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण : भाग २

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
मुस्लिम मराठी साहित्य - भिन्नता आणि एकात्मता
मुस्लिम मराठी साहित्य - भिन्नता आणि एकात्मता

 

२८ आणि २९ जानेवारी २०२३  रोजी नाशिक येथे ९ वे अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन पार पडले. यावेळी अब्दुल कादर मुकादम यांनी केलेले अध्यक्षीय भाषण तीन भागात प्रसिद्ध करत आहोत. त्यातील हा भाग २ . 

- संपादक


मुस्लिम मराठी साहित्य - भिन्नता आणि एकात्मता

 

गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात अनेक मुस्लिम लेखक मराठीतून लेखन करत आहेत. या लेखकांना आपल्या व्यथा वेदना आणि नातेसंबंधांतून निर्माण होणारे भावनिक ताण तणाव प्राधान्याने काव्यातून व्यक्त करावेसे वाटतात. साहजिकच या लेखनात काव्य निर्मिती अधिक झालेली दिसते. तरीही काही लेखकांनी आपले जीवनानुभव गद्य लेखनातूनही व्यक्त केले आहेत. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे त्याचे पुढचे पाऊल होते. त्यामुळेच गेल्या काही वर्षापासून मुस्लिम मराठी साहित्य संमेलनांचे नियमित आयोजन करण्यात येत आहे. ही प्रथा खरोखरच स्वागतार्ह आहे. पण मुस्लिम मराठी लेखकाची ही साहित्य निर्मिती आणि साहित्य संमेलने चिकित्सक साहित्यिक चर्चेचे विषयही झाले आहेत. ही या नाण्याची दुसरी बाजू आहे.


सर्वच भाषांच्या साहित्यिक निर्मितीविषयी मुक्तचर्चा होणे हे त्या भाषेच्या आणि त्या भाषेत निर्माण होणाऱ्या साहित्याच्या प्रगतीचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते. तेव्हा मुस्लिम मराठी साहित्य निर्मिती विषयी मुक्त चर्चा होत असेल तर ती मुस्लिम मराठी साहित्याच्या प्रगतीच्या दृष्टीने योग्य आहे असे समजूनच त्या चर्चेचे स्वागत केले पाहिजे. पण या चर्चेत काही मूलगामी मुद्दे उपस्थित करण्यात आले असतील तर त्याची योग्य ती दखल घेऊन त्याचे तर्कशुद्ध विश्लेषण करून या साहित्यिक वेगळेपणाचे स्वरूप उलगडून दाखविणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, ही बाब आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही..


या पार्श्वभूमीवर आपण मुस्लिम मराठी साहित्याचा विचार करू गेल्यास आपल्या लक्षात येईल की मुस्लिम मराठी साहित्यिक ज्या मराठी भाषेतून आपल्या साहित्याची निर्मिती करत असतात ती मुख्य प्रवाहातील मराठीपेक्षाकुठल्याही अर्थाने वेगळी नाही. किंबहुना त्यांच्यात पूर्णतः एकरूपता आहे. मात्र मराठी मुसलमानांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनपद्धतीतील एक पैलू मराठी भाषा आणि संस्कृतीच्या विविध पैलूंपेक्षा काहीसा वेगळा असतो. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या मूलभूत स्वरूपातील हे वेगळेपण आहे असा त्याचा अर्थ होत नाही. हे वेगळेपण कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील आहे आणि त्याचा उद्गमबिंदू धर्मभिन्नतेमुळे त्याच्या दैनंदिन जीवनशैलीत आणि संस्कृतीत झालेल्या परिवर्तनात आहे किंवा असतो. हे गुणात्मक परिवर्तन विचारात घेतल्या शिवाय मुस्लिम मराठी साहित्याची समीक्षा यथायोग्य रीतीने करता येत नाही. कारण मुस्लिम मराठी साहित्यातील हा वेगळा पैलू एकीकडे आपल्या वेगळेपणाचे दर्शन घडवित असतो तर दुसरीकडे व्यापक मराठी साहित्याशी आणि पर्यायाने मराठी संस्कृतीशी असलेले अतूट नाते अधोरेखित करीत असतो.


मराठी मुसलमानांच्या तीन अस्मिता

तेव्हा मुस्लिम मराठी साहित्यातील हा वेगळा पैलू आणि मुख्य मराठी साहित्य प्रवाहाशी असलेले त्याचे अतूट नाते समजून घेण्यासाठी मराठी मुसलमानांच्या तीन अस्मिता समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे.


या देशात जन्माला येणारे प्रत्येक मूल आपल्याबरोबर तीन अस्मिता घेऊनच जन्माला येत असते. ज्या आईवडिलांच्या पोटी ते मूल जन्माला येते त्यांचा धर्म त्याला आपोआपच प्राप्त होत असतो. ही त्याची पहिली अस्मिता असतो. आपण तिला धार्मिक अस्मिता म्हणू शकतो. त्या मुलाचे आईबाप ज्या प्रदेशाचे किंवा राज्याचे मूळ रहिवासी असतात ती त्यांची प्रादेशिक अस्मिता असते आणि तीच त्यांच्या मुलाला वारसा हक्काने प्राप्त होते. म्हणजे ही त्याची दुसरी अस्मिता असते. आणि सर्वात महत्वाची म्हणजे त्या मुलाचे आईवडील भारताचे नागरिक असतात आणि त्यामुळे भारताचे नागरिकत्वही त्याला त्याच वारसाहक्काने प्राप्त होते. ही त्याची तिसरी आणि राष्ट्रीय अस्मिता असते.


या तिन्ही अस्मितात समतोल साधणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असते. पण त्याच वेळेस भाषा आणि साहित्याच्या संदर्भात विचार करावयाचा झाल्यास दुसरी म्हणजेच प्रादेशिक अस्मिताच निर्णायक ठरत असते. कारण त्यामुळेच त्या भाषेतील साहित्य निर्मितीला प्रेरणा आणि प्रयोजन मिळत असते आणि या साहित्यिक प्रक्रियेमुळेच भाषा समृद्ध होत असते.


या प्रक्रियेत आणखी एक घटक कार्यरत असतो आणि तो म्हणजे धर्म ! कुठल्याही राज्यात किंवा प्रदेशात प्रादेशिक आणि राष्ट्रीय अस्मिता समान असतात. पण धर्मभिन्नतेमुळे धार्मिक अस्मिता मात्र भिन्न असते. त्यामुळे मुस्लिम मराठी साहित्यिक लेखकांच्या साहित्यात या धार्मिक अस्मितेचे प्रतिबिंब या ना त्या स्वरूपात पडलेले आढळते. "मुस्लिम मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप" या संपादित ग्रंथात अनेक मराठी कवी व गद्य लेखकांच्या कविता, लेख प्रसिद्ध झालेले आहेत. (संपादक प्रा. शहाजिंदे आणि प्रा. फारुख तांबोळी) या लेखांतून आणि कवितांतूनही या लेखकांच्या धार्मिक अस्मितांचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष दर्शन घडले. इथे श्रीमती आशा आपराद या प्रथित यश लेखिकेच्या उपरोक्त ग्रंथातील "मी का लिहिले" या शीर्षकाच्या लेखाचा उल्लेख मुद्दाम करावासा वाटतो. मी का लिहिले या त्यांच्या लेखात त्यांनी म्हटले आहे की, "माझ्या वयाची पन्नास वर्षे पूर्ण होईतोपर्यंत अनेकविध अनुभवातून नाना प्रकारे यातनामय जीवन जागून झाल्यावर, अंतरात जे साठत गेले त्याचा निचरा व्हावा असं वाटू लागलं आणि त्यातूनच लिहिण्याची निकड भासू लागली." ही निकड हेच त्यांच्या लेखनाचे प्रयोजन होते, असे आपण म्हणू शकतो.


आशा ताईचे वरील उद्धरण तत्सम कौटुंबिक आणि सामाजिक संस्कारात वाढलेल्या एकूणच मराठी महिलांचे प्रातिनिधिक स्वरूप आहे, असे निश्चित म्हणता येईल. पण त्याचबरोबर धार्मिक आणि सांस्कृतिक भिन्नतेमुळे अशा संस्कारात वाढलेल्या लेखक कवींच्या अभिव्यक्तीत किंवा आविष्कार शैलीत काही भिन्नता असणे अपरिहार्य असते, ही बाबही दुर्लक्षित करता येणार नाही.


मात्र ही भिन्नता किंवा वेगळेपण मराठीच्या मुख्य प्रवाहापासून पूर्णतः वेगळे आहे असे समजण्याचे कारण नाही. किंबहुना मराठी भाषेच्या मुख्य प्रवाहाचा एक अविभाज्य घटक आहे. आणि तीच त्याची मर्यादा आहे. हीच मुस्लिम मराठी कवी लेखकांची भूमिका आहे. असे मला वाटते. माझ्या या भूमिकेशी ते सहमत होतील अशी मी आशा करतो. अनेक मुस्लिम आणि इतरही साहित्यिकांनी या पूर्वीच अशी भूमिका आपल्या गद्य आणि पद्य साहित्यातून मांडली आहे. कवी जावेद कुरैशी हे त्यापैकीच एक, "डॉ. आंबेडकर" या शीर्षकाच्या त्यांच्या कवितेतून त्यांनी हीच भूमिका मार्मिकपणे मांडली आहे, ते म्हणतात :


"डॉ. आंबेडकर, तुमच्या विचारांचे शस्त्र हाती घेऊन मी युद्धरत आहे

 पण,आंबेडकर सांस्कृतिक अस्मितेसह मी शोषित कसा ?

 याचे उत्तर धर्मग्रंथात नव्हे तुझ्या लेखणीत गवसले !

आता मी निर्धास्त आहे. एका हातात मुस्लिम अस्मिता / दुसऱ्या हातात संविधान आहे

आणि या दोहोंच्यामध्ये त्यांची प्रादेशिक अस्मिताही अध्याहृत आहे.


डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांचे काहीसे वेगळ्या वळणाचे विश्लेषणही दखल घेण्यासारखे आहे. "मुस्लिम मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप" या उपरोक्त ग्रंथातील त्यांच्या याच शीर्षकाच्या लेखात त्यांनी म्हटले आहे की "मुस्लिम साहित्य प्रवाह व इतर साहित्य प्रवाहयात एक महत्वाचा असा गुणात्मक फरक आहे आणि तो म्हणजे नव्या मुस्लिम पिढीस हे तीव्रपणे जाणवते की महाराष्ट्रात जवळपास ११ टक्के मुस्लिम समाज असताना देखील या समाजाचे चित्रण तटस्थपणे मराठी साहित्यात झालेले नाही.


सर्वात चीड आणणारी बाब म्हणजे आज पर्यंतच्या (१८८५ इ. नंतरचे ) मराठी साहित्यात मुसलमानांना एकतर खलनायक, विदूषक किंवा बदमाश गुंड याच रूपात करण्यात आलेले आहे. एक माणूस म्हणून त्याचे चित्रण नाही. याचाच अर्थ असा की महाराष्ट्रात दहा / पंधरा टक्के असलेल्या मराठी मुसलमानांच्या काहीशा वेगळ्या परंतु वैशिष्टयपूर्ण असलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब मराठी साहित्यात प्रभावीपणे पडायला हवे आहे तितक्या प्रभावीपणे ते पडलेले आढळत नाही.


वरील उदाहरणातून व्यक्त झालेली नव्या पिढीतील मुस्लिम साहित्यिकांचे खंत डॉ. रणसुभेनी नेमकी हेरली आहे.  नव्या पिढीतील मुस्लिम मराठी साहित्यिकांच्या विशेषतः कवींच्या काव्यातून मुस्लिम समाजाची व्यथा वेदना आणि निराशा मोठ्या प्रमाणावर प्रतिबिंबित झालेली आढळते. अर्थात ते समाज जीवनाचे वास्तव असल्यामुळे साहित्य व्यवहारात त्याचे प्रतिबिंब पडणे साहजिक आहे.


पण हे मान्य केल्यानंतरही, आशावाद हाच मुस्लिम मराठी साहित्याचा स्थायीभाव आहे असे मला वाटते. कारण तशा तऱ्हेने आश्वासित करणारे संदर्भ काही काव्यपंक्तीतून आढळतात. पण स्थलकालाच्या मर्यादांमुळे त्या सगळ्यांची नोंद घेणे इथे शक्य होणार नाही. पण नमुना म्हणून काही काही काव्यपंक्तींचा संदर्भ देणे हेही तितकेच आवश्यक आहे असे वाटते. जावेद पाशा (कुरैशी) यांच्या खालील पंक्तीत त्यांनी हाच आशय सांगितला आहे:


"या दंग्यांनी हाताना सवड दिली तर ।

टाकाऊ वस्तूंतून ही पोट जागविणारे

देशही जागवून दाखवतील ।

या दंग्यांनी हाताना सवड दिली तर ।

बेचिराख झोपड्यांतूनही

मानवतेचे मनोरे बांधून दाखतील ।