नाशिकमधील बडी दर्गा येथे ३९७ संदल शरीफ गुरुवारी (ता. १२) उत्साहात झाला. सायंकाळी धार्मिक परंपरेप्रमाणे विश्वस्तांच्या हस्ते बाबांच्या मजारवर संदल शरीफ अर्पण करण्यात आले. सर्वधर्मीय श्रद्धास्थान असलेले बड़ी दर्गा शरीफ हजरत पौर सय्यद सादिक शहा हुसेन बाबा यांचा ३९७ वा संदल शरीफनिमित्त दरवर्षी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत साजरा केला जातो.
मंगळवारी (ता. १०) रात्री हजरत अब्दुल कादिर जिलानी यांचे प्रवचन आणि शादाब रजवी, गुफरान रजा कादरी यांचे नात-ए-पाक धार्मिक कार्यक्रम झाले. बुधवारी (ता.११) रोजी धर्मगुरु हजरत सय्यद मोहम्मद महेमूद अशरफ यांचा बयान (प्रवचन) झाले. गुरुवारी (ता.१२) मुख्य दिवशी सायंकाळी संदल शरीफनिमित्त चौक मंडई येथून सायंकाळी शहर-ए-खतीब हिंसामोद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात जुलूस काढण्यात आला.
शहर-ए-खतीब एजाज काजी, मौलाना महेमूद आलम, मोहम्मद जफर अली हैदर अली खान, एजाज मकराणी आधी उपस्थित होते. बागवानपुरा, कथडा, शिवाजी चौक, भोई गल्ली, आझाद चौक, कमोद गल्ली, दंडे हनुमान चौक, मुलतानपुरा, कोकणीपुरा, फुले मार्केट, खडकाळी, दूध बाजार, पिंजर घाट मार्गे जुलूस काढण्यात येऊन बडी दर्गा मैदानात समारोप करण्यात आला. त्यानंतर विश्वस्तांच्या हस्ते संदल अर्पण करण्यात आले.
नवजवानाने बडी दर्गा संस्थेच्या तरुणांतर्फे लंगर शरीफ (महाप्रसादाचे) आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. गुरुवारचा दिवस आणि संदल शरीफ योगायोग जुळून आल्याने सकाळपासूनच भाविकांनी बड़ी दर्गा येथे दर्शनासाठी गर्दी केली होती. बडी दर्गा, बडी मशीद तसेच परिसर रोषणाईन उजळून निघाला होता.
दरम्यान, संदल शरीफ अर्पण केल्यानंतर बडी दर्गा आणि मशिदीमध्ये विशेष फातेहा पठन झाले. देशात, राज्यासह शहरात सुख शांती नांदो, आलेले विविध प्रकारचे संकट दूर हो, राष्ट्रीय एकात्मता नांदो अशी दुवा करण्यात आली. गुरुवारी संदल अर्पण करत महाप्रसादाचे आयोजन करून संदल शरीफ उत्सवाचा समारोप करण्यात आला.