इस्राईलने शुक्रवारी केलेल्या हल्यांमध्ये इमारतीचे झालेले नुकसान.
इस्त्राईलने आज त्यांचा कट्टर शत्रुदेश असलेल्या इराणमध्ये थेट हल्ले करत नव्या संघर्षाला तोंड फोडले. इस्त्राईलने इराणमधील अणुकेंद्रावर हल्ले करतानाच त्यांच्या लष्करप्रमुखासह १५ ते २० वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनाही लक्ष्याधारित मारा करत ठार मारले. इराणच्या अणुकार्यक्रमामुळे आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यानेच हल्ले केल्याचा दावा इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केला, तर इस्राईलला या कृत्याची भयानक शिक्षा मिळेल, असा इशारा इराणचे सर्वोच्च प्रमुख अयातुल्ला अली खामेनेई यांनी दिला आहे. इराणने नंतर इस्त्राईलवर ड्रोन हल्ले केले. इराण आणि इस्राईलमधील शत्रूत्व जुने असले तरी इराणवरील आजचा हल्ला १९८० नंतरचा सर्वांत मोठा हल्ला मानला जात आहे. इराणकडून अणुकार्यक्रमाला वेग येत असताना आणि अण्वस्त्रांसाठी युरेनियमचे समृद्धीकरण केले जात असताना इस्त्राईलने आज 'रायझिंग लायन' या मोहिमेंतर्गत इराणमध्ये चार ते सहा ठिकाणी हल्ले केले. यातील एक हल्ला इराणच्या नानतांज अणुकेंद्रावर झाला. हल्ल्यानंतर किरणोत्सर्ग झाला की नाही, याची तपासणी केली जात आहे. इराणची राजधानी तेहरानमध्येही लष्करी ठिकाणांवर आणि शस्त्रसाठ्यांवर इस्त्राईलने ड्रोनद्वारे मारा केला. यात इराणच्या लष्कराचे प्रमुख जनरल महंमद वाघेरी, इराणच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख जनरल हुसेन सलामी, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञ मारले गेले, तर किमान ९५ जण जखमी झाले.
इसाईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, "हल्ल्यांची आमची सुरुवात यशस्वी झाली. आम्ही इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर हल्ले केले, तसेच अणुबाँब तयार करत असलेल्या शास्त्रज्ञांवरही हल्ले केले. आमच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याने आम्हाला ही कारवाई करावी लागली. हा धोका पूर्णपणे दूर होईपर्यंत कारवाई सुरूच राहील."
याशिवाय लहान मुले आणि महिलांसह काही नागरिकही मारले गेल्याचे इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. इराणवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इतर देशांचे समर्थन मिळविण्यासाठी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज विविध जागतिक नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना कारवाईची माहिती दिली. भारताने तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. नेतान्याहू यांनी अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, इटली, हंगेरी, युरोपीय महासंघ आणि इतर काही देशांच्या प्रमुखांशीही संवाद साधला.
इस्त्राईलने शुक्रवारी रात्री इराणवर पुन्हा हल्ले केले. इस्त्राईलची दुसरे अणुकेंद्र असलेल्या फोर्दो येथे ड्रोन हल्ले करण्यात आले. मात्र, हे ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा दावा इराणने केला. तेहरानमध्येही काही ड्रोन कोसळल्याचे समजते आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्राईलला पूर्ण समर्थन जाहीर केले असून इराणने हल्ला केल्यास इस्त्राईलचे पूर्ण संरक्षण केले जाईल, असा इशाराही दिला आहे. इराणला आम्ही अणुबाँब तयार करू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
खनिज तेलमंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले, "भारत हा जगातील तिसरा सर्वांत मोठा तेल आणि चौथा नैसर्गिक वायूचा आयातदार देश आहे. येत्या काळामध्ये देशाला पुरेशा प्रमाणामध्ये इंधन पुरवठा होत राहील. खनिज तेल क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या प्रमुखांशी वेळोवेळी चर्चा करून याचा आढावा घेण्यात येतो."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter