९व्या अ. भा. मुस्लीम साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण : भाग ३

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
९व्या अ. भा. मुस्लीम साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण : भाग ३
९व्या अ. भा. मुस्लीम साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण : भाग ३

 

२८ आणि २९ जानेवारी २०२३  रोजी नाशिक येथे ९ वे अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन पार पडले. यावेळी अब्दुल कादर मुकादम यांनी केलेले अध्यक्षीय भाषण तीन भागात प्रसिद्ध करत आहोत. त्यातील हा भाग ३. 

- संपादक


इस्लामी संस्कृतीची वाटचाल


इ.स. ६६१ ते १२५० पर्यंतचा जवळ जवळ सहा शतकांचा कालखंड इस्लामच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचा किंवा वाटचालीचा दुसरा टप्पा मानला जातो. या काळातील 'खलिफा' या संस्थेच्या स्वरूपात काही गुणात्मक बदल झाले. इ.स. ६६१ मध्ये उमय्या घराण्याचा संस्थापक मुआविया हा खलिफा झाला. इथपासून पुढे खलिफा ही संस्था वंशपरंपरागत झाली. त्याचबरोबर पहिल्या चार खलिकांच्या काळातील लोकाभिमुखता संपून तिची वाटचाल सरंजामशाहीच्या दिशेने सुरू झाली. अब्बासी खलिकांच्या काळातही सरंजामशाही संस्कृती पूर्णत्वास पोचली होती.


या काळात काही लहान घराणी सोडली तर उमय्या (इ.स. ६६१ ते ७४९), अब्बासी (इ.स. ७५० ते ८६१) आणि फातिमी (इ.स. ९०९ ते ११७१) या तीन महत्वाच्या घराण्यांकडे खिलाफतींची सूत्रे व सत्ता होती. याच काळात इस्लामची सामाजिक वैचारिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सर्वांगीण प्रगती झाली. म्हणूनच इस्लामच्या इतिहासातील या कालखंडाला सुवर्णयुग म्हणता येईल.


तत्त्वज्ञान

पण याच काळात इस्लामी संस्कृती समृद्ध झाली. इस्लामी विचारवंत आणि संशोधकांनी वैचारिक क्षेत्रात सर्वांत महत्त्वाचे योगदान केले आहे. त्यातही ग्रीक भाषेतील प्रचंड ज्ञानभांडार अनेक लेखक अनुवादकांनी अरबी भाषेत अनुवादित केले,त्याचा विशेष उल्लेख केला पाहिजे. या ग्रीक ज्ञानभांडाराची हस्तलिखिते युरोपमधील अनेक मठांच्या तळघरात धूळ खात पडलेली होती. या हस्तलिखितांच्या महत्त्वाविषयी सर्व मठाधिपती पूर्णपणे अनभिज्ञ तरी होते किंवा त्याविषयी त्यांना कसलीच आस्था नव्हती. कॉस्टेटिनोपल व परशीया जिंकल्यानंतर अरबांचा ग्रीक भाषेशी आणि त्या भाषेतील ज्ञानभांडाराशी त्यांचा संबंध आला. या अरब संशोधकांनी हे सर्व ग्रंथ अरबी भाषेत अनुवादित केले. पुढे या अनुवादाच्या माध्यमातून हे ज्ञानभांडार युरोपमध्ये गेले. रोम या पाश्चात्य लेखकाने अरब संशोधकांच्या या कार्याचे फार समर्पक शब्दात वर्णन केले आहे.


याच काळात इस्लामी तत्त्वज्ञानाचा पाया घातला गेला अबु याकुब इब्न इसहाक अल्-किंदी हा या परंपरेतील आद्य तत्त्वचिंतक मानला जातो. तो बुद्धीवादी होता व त्याच्यावर सॉक्रेटिस, प्लेटो आणि पायथागोरसयांच्या विचारांचा प्रभाव होता. तत्त्वज्ञानाव्यतिरिक्त त्याला वैद्यक, खगोलशास्त्र, गणित अशा अनेक विषयांत रस होता.


याविषयावरचे त्याचे ग्रंथी प्रसिद्ध झाले असून त्यांच्या अनेक ग्रंथाचे लॅटिन भाषेत अनुवादही झालेआहेत. अल्-किंदीपासून सुरू झालेली ही ज्ञानसाधनेची परंपरा अनेक शतकांपर्यंत सुरू होती. या काळात अनेक तत्त्वज्ञ होऊन गेले. त्यातील काही महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यांचा ओझरता तरी उल्लेख करणे योग्य होईल असे वाटते.


इस्लामपूर्व काळातील अब समाज सांस्कृतिक व वैचारिकदृष्टया आदिम अवस्थेत होता. पण पैगंबरांच्या निधनानंतर केवळ २०० वर्षांत या समाजाने या क्षेत्रात प्रगतीची जी झेप घेतली ती केवळ विस्मयकारक होती. अरब विचारवंतांनी आणि संशोधकांनी दोन शतकांत प्रगतीचा जो टप्पा गाठला तसा टप्पागाठण्यास ख्रिश्चन समाजाला १५०० वर्ष लागली हे ख्रिश्चन अभ्यासक / संशोधकानी लिहून ठेवले आहे.

"The Story of Philosophy was discovered by the Muslims and then transmitted to the west, provides one of the most fascinating chapters in the book of mankind's progress from ignorance to enlightenment. (Islam & The Arabs, pg 143-144)


इ.स. ८७० ते ९५० या काळात अब्बासी खलिफांच्या कारकीर्दित इस्लामी तत्त्वज्ञानाचाही उगम आणि विकास झाला. या केवळ ८० वर्षांच्या कालखंडात आंतरराष्ट्रीय दर्जाचे तत्त्वज्ञ निर्माण झाले या मध्ये अबु नसर अल्-फराबी आणि अल्- अशारी यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. सेंट थॉमस या ख्रिश्चन तत्त्ववेत्त्याने त्याच्या ग्रंथात अल्-फराबीच्या तत्त्वज्ञानाचे अनेक संदर्भ दिले आहेत.


आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ॲरिस्टॉटलनंतर अल्-फराबीला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान देण्यातआले आहे. या वरून त्याच्या तत्त्वज्ञानाचा कस काय प्रतीचा होता, हे स्पष्ट होऊ शकेल. अध्यात्मशास्त्र( Metaphysics),मानसशास्त्र, तर्कशास्त्र, पदार्थविज्ञान, वैद्यक, धर्मशास्त्र अशा अनेक शास्त्रांमध्ये त्यालागति होती. त्याच्या नंतरच्या काळात होऊन गेलेल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांचा अल् फरेबी हीच त्यांच्या व्यासंगाची प्रेरणा आणि ज्ञानाचा स्त्रोत होता. असे असूनही पाश्चात्य जगतात इब्न सीना या तत्त्ववेत्याला जितकी मान्यता आणि प्रसिद्धी अल्-फरेबीला मिळू शकली नाही.


तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील अल्- फरेबीची परंपरा इब्न सीना याने त्याच वैचारिक बांधिलकीने पुढे चालूठेवली. त्याचा जन्म परशीयातील अफसाना येथे ९८० मध्ये झाला व इ.स. १०३७ (रमाधान) मध्ये त्याचेनिधन झाले. कालमानानुसार विचार केला तर अल फराबी आणि इब्न सीना यांच्या मध्ये शतक भराचे अंतरअसले आणि त्याकाळात अल् अशारी अल् किंदी या सारखे तत्त्वचिंतकही झाले तरी अल्-फरेबीचा वैचारिक वारसा, इब्न सीनाला मिळाला होता असे इस्लामी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे मानले जाते. असे असले तरी विद्वन्मान्यता आणि प्रसिद्धी मात्र अल्- फरेबी पेक्षा इब्न सीनाला अधिक मिळाली.


इब्न सीनाला केवळ ५७ वर्षांचे आयुष्य लाभले. पण या अल्प काळातही त्याने ज्ञानाच्या क्षेत्रात जेकर्तृत्व गाजावले ते अतुलनीय होते असेच म्हटले पाहिजे. त्याचे वडिल सरकारी अधिकारी होते. त्यामुळे त्यालाउत्तम शिक्षण घेण्याची संधी मिळाली. इब्न सीनानेही त्या संधीचे सोने केले. चौदा वर्षाचा असतानाच त्यानेशरीयत (आचार संहिता) आणि (फिक) इस्लामी न्यायशास्त्र या विषयांवर प्रभुत्व मिळविले होते. दहा वर्षांचाअसतानाच त्याने कुराण आणि इतर धार्मिक विषयांचा सखोल अभ्यास केला होता.


या दैनंदिन विषयांच्या अभ्यासाबरोबर ॲरिस्टॉटल, युक्लीड आणि टालेमी यांच्या तत्त्वज्ञानाचा आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या ग्रंथावरील विविध भाष्यांचाही त्याने अभ्यास केला होता. सोळाव्या वर्षी त्याने तत्त्वज्ञानाव्यतिरिक्त वैद्यकशास्त्रावरील सर्व ग्रंथ, गणित, खगोलशास्त्र, विज्ञान, संगीत, भूमीशास्त्र अशा अनेक विषयांच्या त्याने अभ्यास केला होता. इब्न सीनाचे आणखी एक वैशिष्टय होते. इस्लाममधील एकेश्वरवादाची म्हणजेच तौहीद वरील आणि अल्लाह चराचर सृष्टीचा निर्भिक आहे या सूत्रा वरील त्याची श्रद्धा कधीही डळमळीत होऊ दिली नाही.


तत्त्वज्ञ विचारवंतांच्या या परंपरेत, अबु हमीद इब्न महंमद अल तुमी अल्-गझाली या विचारवंत संशोधकाच्या नावाचाही अंतर्भाव करणे आवश्यक आहे. परशियातील खोरासन या शहरात १०५९ साली त्याचा जन्म झाला. दुर्दैवाने त्याला छत्र मात्र फार काल लाभले नाही. पण त्याचे सुदैव असे की त्याकाळी उपलब्ध असलेले उत्तमोत्तम शिक्षण घेण्याची संधी मात्र त्याला मिळाली अलू गझालीच्या तल्लख बुद्धीमत्तेची जाणीव तत्कालीन अनेक विद्वान, विचारवंताना होती त्यांच्या सहकार्यामुळे वयाच्या केवळ सेहतीसावा वर्षी बगदाद प्रसिद्ध निझामिया विद्यापीठात त्याला प्राध्यापकाची नोकरी मिळाली. या विद्यापीठाची स्थापना सेल्झुक राज्यकर्त्यांचे वजीर निझाम उल मुल्क याने केली होती. ज्ञानखेत्रातील या नोकरीमुळे त्याला एकीकडे आर्थिक स्थैर्य लाभले तर दुसरीकडे आपली ज्ञानसाधना पुढे चालू ठेवण्याची संधी ही मिळाली. पण हे भागय फार काळ टिकले नाही. काही वर्षानच गंभीर अशा मानसिक आणि शारिरिक आजाराना तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्यांच्या जीवनाला एक वेगळेच पण कायमचे वळण लागले. त्याने ज्ञानदानाचे क्षेत्र सोडले व तपस्व्याचे भटके जीवन स्वीकरले. आपल्या जीवनाच्या शेवटच्या पर्वात तर चिंतनशील तपस्व्याचा मार्ग स्वीकारला. ११११ साली म्हणजेच वयाच्या केवळ बावन्नाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जीवनातील अशा मानसिक आणि शारिरिक उलथापालथीमुळे त्यांच्या व्यक्तिगत जीवनात तत्त्ववेत्त्याच्या व धार्मिक शिक्षकाच्याभूमिकेचा त्याग करावा लागला. गूढवादी तत्त्वचिंतक ही त्यांची शेवटची भूमिका होती व त्याच अवस्थेतत्यांनी शेवटचा श्वास घेतला. इब्न गझालीच्या जीवनात तत्त्ववेत्त शिक्षक, भटका तपस्वी आणि गूढवादी तत्त्वचिंतक अशी अनेक वळणे आली, तरी त्यांच्या चिंतनशील विचारांचा कस मात्र जराही कमी झाला नव्हता.


गूढवादी साक्षात्कारातूनच अंतिम सत्याचा प्रत्यकारी शोध घेता येतो, हे अल्-गझालीच्या तत्त्वज्ञानाचे मध्यवर्ति सूत्र होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील गुणविशेषांविषयी बोलायचे झाल्यास त्याच्या वैचारिक भूमिकेविषयीची प्रामाणिक बांधिलकी आणि आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तिचाच खचोटीने कष्ट करण्याची तयारी यांचा उल्लेख करावा लागेल. त्याच्या व्यक्तिमत्त्वात अविचल धार्मिक श्रद्धा आणि वस्तुनिष्ठ चिंतनशीलता यांचे समतोल संमिश्रण झालेले आढळते. सुफी आध्यात्मिक परंपरेला त्याने प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्ली, हे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वात महत्वाचे योगदान म्हटले पाहिजे.


बाराव्या शतकात त्याचे ग्रंथ विशेषतः तत्त्वज्ञानावरील ग्रंथ अनेक पाश्चात भाषांत अनुवादित झाले होते. त्यामुळेच त्याच्या विचारांचा आणि तत्त्वानात्मक सिद्धांताचा ज्यू आणि ख्रिश्चन तत्त्वविचारांवर खूप प्रभाव पडला होता. मानव आणि ईश्वर यांच्यात अद्वैत साधण्यासाठी कुण्या त्रयस्थाची गरज नाही, हे इब्न झालीचे सूत्र सेंट थॉमस पासून अनेक ख्रिश्चन संतांनी पूर्ण श्रद्धेने स्वीकारले होते.


विज्ञानाच्या क्षेत्रात गणिताला सर्व विज्ञानशाखांचा स्रोत मानले जाते. मूलतः अस्यांपाशी स्वतःचे असे गणितशास्त्र नव्हते. त्यामुळे त्यांना या बाबतीतही ग्रीकांकडेच वळावे लागले. परंतु कालांतराने त्यांना त्यांच्या उद्दिष्टांच्या दृष्टीने ते अपुरे आणि अपर्याप्त वाटू लागले. म्हणून त्यांनी या शास्त्राचा स्वतंत्रपणे विकास करण्याचे ठरविले.


गणिताच्या क्षेत्रातील अरबांच्या योगदानाचा सारांश काढायचा झाला तर अंकशास्त्र आणि दशमान पद्धतीचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. अंकशास्त्राचा उगम भारतात झाला हे सर्वज्ञात आहे. अरबांनी त्याचा अभ्यास करताना ते अधिक प्रगत केले, हेही मान्य केले पाहिजे. त्याचबरोबर नव प्लॅटोनिक साधनांपासून अंकशास्त्रामध्ये ज्ञान मिळविले असे इतिहास सांगतो. (Legacy at Islam by Cara de Vaux, Pg 384- 85). याचाच अर्थ असा की ज्ञानप्राप्तीसाठी अरबांनी स्वतःवर कुठल्याही मर्यादा घातल्या नव्हत्या. “ज्ञान मिळविण्यासाठी चीनला जावे लागले तरी जा" हे पैगंबरांचे वचन त्यांनी आदर्श व प्रमाण मानले होते. गणितात शून्याचा (सीकर) वापर, हे अरबांचे सर्वांत महत्त्वाचे योगदान आहे. अब गणितशास्त्रात शून्याचा वापर त्यापूर्वी किमान दोनतीन शतकांपासून होत होता. दशमान पद्धतीबरोबरच त्यांनी बीजगणित (Algebra) व त्रिकोणमितीची (Trigonometry) या क्षेत्रातही भरीव कामगिरी केलेली आढळते.


गणितशास्त्राप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातही मुस्लिम संशोधकांनी व डॉक्टरांनी भरीव कामगिरी केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील या संशोधकांचे कार्य केवळ वैद्यकशास्त्राची प्रगती करण्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी आपल्या संशोधनाचा साधा मानवतावादी संकल्पनांशी जोडून मानवी जीवन निरामय आणि निरोगी करण्याचा प्रयत्न केला. या काळातील वैद्यकीय संशोधकांनी देवी, कॉलरा, गोवर, प्लेग यांसारख्या गंभीर सांसर्गिक रोगांवर मूलगामी संशोधन केले. वास्तविक इतर अनेक देशांमधील अनेकजण या रोगांचे बळी होत होते. पण या रोगांच्या सांसर्गिकपणाचा शोध मुस्लिम डॉक्टरांनी लावला. हे सहजासहजी घडलेले नव्हते. त्यामागे मानवी जीवन निरोगी करण्याचे उद्दिष्ट होते व ते साध्य करण्याची प्रामाणिक बांधिलकी होतीर. नवव्या शतकात म्हणजे खलिफा मामूनच्या काळात होऊन गेलेला हुनैन इब्न इस्हाक हा मुस्लिम वैद्यकशास्त्राचा जनक मानला जातो. खलिफा मामून यांनी बगदाद येथे स्थापन केलेल्या अनुवादपीठाचा तो प्रमुख होता. त्याच्या या पदावरील नेमणुकीमुळेच ग्रीक भाषेतील वैद्यकशास्त्रावरील अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे अरबीत भाषांतर करता आले.. हुनैनबरोबर दुसरे एक नाव घेतले जाते ते अल्-राझी याचे (८६५ ते ९२५). त्याने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. यामध्ये त्याच्या वैद्यकीय विश्वकोषाचा विशेष उल्लेख करावा लागेल. वैद्यकीय विश्वकोषाची ही परंपरा त्यानंतरही दीर्घकाळ सुरू होती.


यानंतर उल्लेख केला पाहिजे तो इने याचा (११२६ ते १९९८). त्यानेही वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. पण त्यापैकी औषधशास्त्राचे सर्वसाधारण नियम (कल्नीयात फित तिब्ब) हा ग्रंथ सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. इब्न रश्द याच्या प्रमाणेच इब्न खतीज याचेही वैद्यकशास्त्रातील योगदान महत्त्वाचे आहे. तो प्रखर बुद्धिवादी होता. धर्मशास्त्रात जे काही सांगितले असेल ते वास्तवाच्या निकषावर खरे उतरले पाहिजे, असा त्याचा आग्रह असायचा. त्याच्या या बौद्धिक बांधिलकीचा प्रत्यय त्याच्या ग्रंथात विशेष करून 'अमल मन तब्बा लिमन हब्बा' या ग्रंथात येतो या ग्रंथाच्या शेवटच्या प्रकरणात गर्भपातासारख्या अतिशय संवेदनशील विषयावरही चर्चा केली आहे. मातेच्या जीवाला धोका असेल तर गर्भपात केला पाहिजे असा त्याचा आग्रह होता. या क्षेत्रातील त्याचा सहकारी इब्न खातिमा याचे चरित्र त्याने लिहिले असून त्याच्या गवरील संशोधनात्मक संचाची स्तुती केली आहे.


रसायनशास्त्र (Chemistry) आणि रसशास्त्र (Alchemy)

या काळातील अनेक मुस्लिम वैद्यकीय संशोधन व व्यावसायिकांना औषधनिर्माणशास्त्रातही स्म होता, त्यामुळे त्यातील अनेक जण रसायनशास्त्रज्ञ व रसशास्त्रज्ञ होते. त्यांना प्रयोगशाळांची तंत्रपद्धती व औषध निर्मितीच्या तंत्रशुद्ध प्रक्रियेची माहिती होती. आठव्या शतकात होऊन गेलेल्या जबीर हैयात यांचे नाव या क्षेत्रात विशेष प्रसिद्ध आहे. त्याला इस्लामी रसायनशास्त्राचा जनक मानले आहे. त्याने धातूंची भूशास्त्रीयनिर्मिती प्रक्रिया व सल्फर मर्क्युरी सिद्धांत यांचा शोध लावला. त्याच्यामुळेच अलेबिक अँटिमनी, अल्कली या रसायन शास्त्रातील संज्ञा प्रचलित झाल्या.


अलू-राझी या वैद्यकीय तज्ञाने जबीर हैयात यांचे रसायनशास्त्र प्रगतीपथावर आणखी पुढे गेलं. त्याच्या (Book of the Art of Alchemy) या ग्रंथात पदार्थ आणि त्यांची रसायन प्रक्रिया यांचे नेमके वर्गीकरण केले. त्यामुळे रसायनशास्त्राचे स्वरूप व रसायनशास्त्र आणि अल्केमी यांच्यातील भेद स्पष्ट करणे शक्य झाले. रसायनशास्त्राच्या तुलनेत अरब संशोधकांनी पदार्थविज्ञानात फारसे योगदान केले नाही. पण वनस्पतीशास्त्र शेती आणि बागायती या क्षेत्रात मात्र लक्षणीय योगदान केले.


सातव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेली आणि तेराव्या शतकापर्यंत अव्याहतपणे प्रगत होत गेलेली. ज्ञानसाधनेची परंपरा त्यानंतर मात्र कंठित झाली व एक नवी संकुचित, सनातनी व असहिष्णु कुराण भाग्यप सुरू झाली. अल्पावधीतच या भाष्यपरंपरेने मुस्लिम मनावर आणि बुद्धिवादावर प्रभाव केली. हा प्रभाव आजही टिकून आहे. त्यातून कोणत्या समस्या निर्माण झाल्या.


भारतातील संस्कृती संगम (मज्म उल-बहारेन)

अब्बासी खलिफांच्या काळात (इ.स. ७५० ९४५) अरब जगतात सुरु झालेल्या ज्ञानसाधनेच्या परंपरेचा प्रसार केवळ शतकभराच्या अवधीत येमेन, सिरिया, इराक, इराण, अश्या मध्यपूर्वेतील अनेक देशात झाला होता. इतकेच नव्हे तर दहाव्या शतकानंतरच्या अल्प काळातच हे ज्ञानसाधक भारतातही येऊन पोचले होते. मुळातच त्यांच्या या साधनेला प्रदेश धर्म किंवा संस्कृतीच्या मर्यादा नव्हत्या. किंवा स्वतःच्या धार्मिक परंपरांविषयी किंवा संस्कृतीविषयी कसलीही अभिनिवेश नव्हता. त्यांची ज्ञानलालसा आणि ज्ञानसाधना म्हणून उत्कट होती. त्यामुळे जिथे जिथे ज्ञान असेल तिथून ते आत्मसात करायचे व आपल्या भाषेत अनुवादित करून त्याचा प्रसार करायचा हेच त्यांचे इप्सित होते. कदाचित "....... मिळवण्यासाठी चीन ला जावे लागले तरी जा" या पैगंबरांच्या वाचनातून त्यांना प्रेरणा मिळत असावी.


दहाव्या शतका पासून भारतावर मुस्लिम आक्रमणे व्हायला सुरवात झाली. पण ख्रिस्ती घराण्याची सत्ता प्रस्थापित होण्यासाठी तेरावे शतक उजडावे लागले.त्यानंतरच्या अडीच शतकांच्या कालखंडात तुघलक सय्यद, लोधी अशा सुलतान शाही घराण्यांनी राज्य केले. पण १५५६ साली बाबराने मोगल घराण्याची स्थापना केली तेव्हापासून विशेषतः सम्राट अकबरापासून सम्राट शहाजहानपर्यंतचा म्हणजेच १५५६ ते १६५८ पर्यंतचा शतकभराचा कालखंड हा मोगलशाहीचा सुवर्णकाळ समजला जातो. पण मध्ययुगातील हा सर्व राजकीय इतिहास जितका आणि जसा शिकविला जातो किंवा तो जसा आपण सर्वाना माहित आहे तितका, याच काळात घडलेला पण राजकीय इतिहासाला समांतर असलेला ज्ञानसाधनेचा आणि कलात्मक आविष्काराचा इतिहास फारसा कुणाला माहित नाही. वास्तविक मध्ययुगातील राजकीय इतिहासापेक्षा हा सांस्कृतिक इतिहास अधिक समृद्ध आहे कारण या इतिहासात मानवी समाजातील हिंसक परिवृत्तीवर मात करून त्याला सुसंस्कृत करण्याचे सामर्थ्य होते. सम्राट शहाजहानच्या ज्येष्ठ पुत्र दारा शुकोह याने हे नेमकं जाणलं होतं. म्हणूनच त्याने 'मज्म-उल-बहरेन' म्हणजेच हिंदू आणि मुस्लिम या दोन सांस्कृतिक सागरांचा संगम हा ग्रंथ लिहिला. भारतातील गंगा-जमनी संस्कृतीच्या संकल्पनेचा हाच उद्गम-बिंदू होता म्हणूनच दारा शिकोहला मानवतावादी सुसंस्कृतपणाचे प्रतीक मानले पाहिजे.


इस्लाम भारतात आल्यानंतर अनेक अभ्यासक, संशोधक भारतात आले आणि त्यांनी आपल्या पूर्वपरंपरेनुसार आपली ज्ञानसाधना सुरु केली. त्यांनी या ज्ञानसाधनेला धर्म, भाषा, देश वा इतर कुठल्याही मर्यादा घालून घेतल्या नव्हत्या. त्यांची ज्ञानसाधना पूर्वग्रहविरहित होती. म्हणूनच त्यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविले व त्या आधारे या भाषेतील समृद्ध ज्ञानभांडार अरबी व पर्शियन भाषेत अनुवादित केले व भारताबाहेर त्याचा प्रचार आणि प्रसार केला.


अल बेरुनी व अमीर खुस्रो हे याच परंपरेतील विद्वान संशोधक! अल बेरुनी (जन्म ९७३ इसवी) हा विद्वान संशोधक होता. अरेबिक, पर्शियन आणि संस्कृत भाषांवर त्याचे विलक्षण प्रभुत्व होते. तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, खगोलशास्त्र, फळ ज्योतिष या विषयात त्याला विशेष रस होता. त्याचबरोबर इतरही अनेक विषयांचा त्याने सखोल अभ्यास केला होता. अकराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात तो उत्तर हिंदुस्तानात विशेषतः वायव्य सरहद प्रांत, पंजाब, सिंध, हिमाचल प्रदेश, हरियाणा, बिहार या सर्व प्रांतात त्याने प्रवास केला होता. या ते भ्रमंतीतत्याने मिळविलेले ज्ञान तहकिक-मा-लिल-हिंद या ग्रंथात शब्दबद्ध करून त्याने पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून ठेवले आहे. या मूळ अरबी भाषेतील ग्रंथाचा एडवर्ड सॅको (Edward Sachau) याने इंग्रजीत अनुवाद केला असून सहाशे ऐकणेंशी पृष्ठांच्या या ग्रंथात ऐंशी प्रकरणे आहे. यातील प्रत्येक प्रकरण म्हणजे एकेक विषयावरचा वेगळा ग्रंथ आहे. एका अर्थाने तो भारतातील हिंदू परंपरांचा विश्वकोश आहे असे म्हणता येईल. अल बेरूणींची ही ज्ञानसाधना म्हणजे इस्लाम आणि हिंदू संस्कृतीच्या संगमाचा इतिहास आहे असेही म्हणता येईल.


अमीर खुस

अमीर खुस्रो हाही याच सहिष्णू आणि उदारमतवादी परंपरेचा पाईक होता. त्याचा जन्म उत्तर प्रदेशातील ईटा (सध्याची पटियाली) इथे इ.स. १२५३ साली झाला. पण दिल्ली हीच त्याची कर्मभूमी होती. त्याने भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा सखोल अभ्यास केला होता. वृत्तीने तो संत प्रवृत्तीचा होता व त्याने दिल्लीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत निजामुद्दीन अवलिया यांच्याकरून सुफी संप्रदायाची दीक्षा घेतली होती. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आपला कायाकल्प झाला, असे त्याने लिहून ठेवले आहे. अमीर खुस्रो इस्लामेत्तरात हिंदूंना श्रेष्ठ मानत असे. ईश्वर साऱ्या विश्वाचा निर्मिक आणि नियंता असून संत असो की अज्ञजन, विरक्त असो की मोहभ्रष्ट असो, सर्वाचा तो पोशिंदा आहे या उपनिषदातील व इतर तत्त्वज्ञानात्मक प्रणालीतील संकल्पनेने त्याला खूपच प्रभावित केले होते. चारही वेदांचा उल्लेख त्याने अतिशय आदराने केला आहे. वेद म्हणजे ज्ञानाचा सागर असे त्याने म्हटले आहे.


भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील अमीर खुस्त्रोचे योगदानही दखल घेण्याजोगं आहे. ध्रुपद धमार ही भारतीय शास्त्रीय संगीताची मूळची शैली मानली जाते. ही शैली काहीशी आक्रमक व रुक्ष आहे. त्यामुळे मध्ययुगातील सुप्रसिद्ध गायक सदारंग व अदारंग यांनी या शैलीच्या आविष्कारात काही बदल करून त्यातील रुक्षता कमी करण्याचा प्रयोग केला. त्यासाठी त्यांनी नव्या चीज नव्या स्वरावलीत तयार करून त्या गायची प्रथा सुरु केली. नंतरच्या काळात त्यांच्या शिष्यानी ही प्रयोगशीलता तशीच पुढे चालू ठेवली. या प्रयोगशीलतेतूनच ख्यालगायकीची नवी शैली तयार झाली व ती अल्प काळात लोकप्रियही झाली. या प्रयोगशीलतेत अमीर खुस्त्रीचेही योगदान होते. त्याने भारतीय सांगितलं इराणी संगीताची जोड देऊन त्याला एक नवे परिमाण प्राप्त करून दिले. सुफी संत परंपरेतील आध्यात्मिक गूढवादाचे (Mysticism) त्याच्यावर संस्कार झाले होते. त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताचे आध्यात्मिकतेशी असलेले नाते त्याला उमगले होते. म्हणूनच भारतीय आणि इराणी या दोन संगीत शैलींचे सहजसुलभ संमिश्रण करणे त्याला शक्य झाले असावे, असे म्हणता येईल.


अल बेरुनी व अमीर खुस्रो हे याच परंपरेतील विद्वान ! त्यांची नवे थोड्या फार प्रमाणात परिचित आहेत, पण अपरिचित असलेल्या संशोधकांची, अभ्यासकांची यादीही मोठी आहे. त्यापैकी अबू सालेह शुयेब हा एक. त्याने महाभारताचे पर्शियन भाषेत भाषांतर केले आहे. पुढे इ.स. १०२६ मध्ये अबू हसन जलाली याने त्याची आणखी एक सुधारित आवृत्ती प्रसिद्ध केली. याच सुमारास इब्न अल-मुक्कफा याने पंचतंत्र या नीतिकथा संग्रहाचे 'कलीलहे-ओ-दिमनेह या नावाने अरबी भाषांतर केले. त्यानंतर गझनवी सुलतान इब्राहिम काळात दारुल इन्शा या संस्थेच्या अबुल अली मुसतोफी याने 19/21या यन आवृत्ती काढली. त्यानंतर मुल्ला हुसेन वा इज काशीफी याने त्याची 'अन्वरे सुहेली या नावाने पर्शियन भाषेत गद्यात्मक आवृत्ती काढली. पण भाषांतरकर्त्याने त्यात अरबी काव्यपंक्ती आणि वाक्प्रचार यांचा वापर केला. त्यानंतर सम्राट अकबर यांच्या सांगण्यावरून अबुल फझल याने काशीफीच्या 'अन्वरे सुहेली' ची आवृतीही काढली.


सुलतान फिरोज शाह तुघलख (१३५१ ते १४१३ इ.) याने नागरकोट राजाचापराभव केला तेव्हा ज्वालामुखी मंदिरात त्याला जवळजवळ तेराशे संस्कृत ग्रंथ सुलतान फिरोज शाह तुघलख (१३५१ ते १४९३ इ.) याने नागरकोट राजाचा पराभव केला तेव्हा ज्वालामुखी मंदिरात त्याला जवळजवळ तेराशे संस्कृत ग्रंथ आढळले. त्यात अनेक ग्रंथ खगोलशास्त्रावरचे होते. त्याने तेथील पंडितांबरोबर चर्चा करून आणि त्यांच्या सहकार्याने हे ग्रंथ पर्शियन भाषेत भाषांतरित करून घेतले. त्यातील इझुद्दीन खालिद रवानी याने भाषांतरित केलेला 'दलाई ल फिरुज शाही हा ग्रंथ महत्वाचा मानला जातो. याच काळातील आणखी एक भाषांतरित ग्रंथ म्हणजे वराहमिहीरचा 'पंचसिद्धांतिक' हा होय. हा ग्रंथ शम्स-ए-शिराजी याने 'तर्जुमा-ए-वराही या नावाने भाषांतरित केला. 'संगीत दर्पण' या शास्त्रीय ग्रंथाचे 'धुनयतुल मूनैय्या या नावाने भाषांतर झाले आहे.


सुलतान सिकंदर लोधीच्या कारकिर्दीत (१५५६- १६०५ ) तर या ज्ञानसाधनेला राजाश्रयच मिळाला होता. त्यामुळे या काळात तत्त्वज्ञान, विज्ञान आणि इतर विषयांवरील महत्त्वाच्या संस्कृत ग्रंथांच्या भाषांतराला विशेष उतेजन मिळाले होते. खुद्द अकबराच्या ग्रंथसंग्रहात संस्कृत, पर्शियन, अरबी, ग्रीक अशा अनेक भाषांतील ग्रंथ होते. संस्कृत भाषेतील ज्ञानभांडार पर्शियनमध्ये भाषांतरित करण्यासाठी अनेक विद्वानांची खास नेमणूक करण्यात आली होती. तत्कालीन प्रसिद्ध कवी फैजी, इतिहासकार अब्दुल कादिर बदायुनी, धर्मशास्त्रज्ञ नकीब खान, तत्वज्ञ सुलतान ठाणेसरी आणि प्रसिद्ध विचारवंत मुल्ला शिरी, ही त्यापैकी काही नावे! अकबराचा वजीर अबुल फाझल याचाही या विद्वानांत समावेश करावा लागेल. याना त्यांच्या कार्यात सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी तत्वज्ञान व विज्ञान या विषयांतील अनेक तज्ञ पंडितांचीही नेमणूक करण्यात आली होती.


अब्दुल कादिर बदायुनी याने भवन खान (हा धर्मांतरित ब्राह्मण होता ) याच्या सहकार्याने रामायणाचे भाषांतर केले. त्यानंतर त्याच्या आणखी चार संक्षिप्त आवृत्याही निघाल्या होत्या. त्यातील पहिली गिरधरदास कायस्थ याने काढली होती व ती बादशाह जहांगीरला अर्पण करण्यात आली होती. अकबराच्याच कारकिर्दीत महाभारताच्या अठरा पर्वाचे पर्शियन भाषांतर 'रझम नामा' या नावाने करण्यात आले होते. कवी फैजी याने या गद्य भाषांतरात सुधारणा करून त्यात आणखी दोन पर्वाच्या भाषांतराची भर घातली फैजीने 'भगवद्गीता', भास्कराचार्यांचा 'लीलावती' हा ग्रंथ आणि सोम सागराच्या कथा सरीत सागरचेही भाषांतर केले होते. त्याने नलोपाख्यानाचे 'नलदामन' या नावाने मसनवी वृतांत काव्यरूप आषांतरही केले. वेदान्त, तत्वज्ञान, योगवशिष्ठ आणि भागवत पूर्ण यांवर आधारित त्याचा शरीकुल मारिफ' हा ग्रंथ पर्शियन भाषेत सर्वांत महत्त्वपूर्ण मानला जातो.


अब्दुल कादिर बदायुनी याने सम्राट अकबराच्या आदेशावरून सिंहासन- बत्तिशीचे 'खेराट अफजा' या नावाने भाषांतर केले. जहांगीरच्या काळात सिंहासन- बत्तिशीची, किस्सा-ए-बिक्रमाजीत व गुलअफसान अशी आणखी दोन भाषांतरे झाली होती. त्याचप्रमाणे मुल्ला शिरी व्यासांच्या हरिवंश या कृष्ण चरित्राचे 'हरिबन्स' या नावाने भाषांतर केले. शहाजहान बादशहाचा मोठा मुलगा दारा शिकोह हा या सर्व विद्वानांचा शिरोमणी मानला पाहिजे. बनारसला जाऊन तेथील पंडितांकडून तो संस्कृत भाषा शिकला. संस्कृतवर त्याचे उत्तम प्रभुत्व होते. त्याने 'सिरे अकबर' या नावाने उपनिषदांचे भाषांतर केले. त्याचबरोबर योगावशिष्ठ व भग्वद्गीतेचेही त्याने पर्शियन भाषांतर केले आहे, परंतु त्याचा मजम-उल- बहरेन' (हिंदू आणि मुस्लिम या दोन महासागरांचा संगम ) हा ग्रंथ सर्वांत महत्वाचा मानला पाहिजे. कारण हा ग्रंथ म्हणजे भारतातील मिश्र संस्कृतीचे प्रतीक आहे. दुर्दैव असे की औरंजेबावर अनेक कादंबऱ्या, नाटके लिहिली गेली आहेत, परंतु दारा शिकोह या सुफी संत प्रवृत्तीच्या शोकांत नायकावर मराठीत एकही पुस्तक नाही.