हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतिक हजरत अहमदशहा वली बाबा

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
हजरत अहमदशहा वली बाबांची दरगाह
हजरत अहमदशहा वली बाबांची दरगाह

 

इस्लामचे आगमन भारतात सुफी संतासोबत झाले. देशातील खेड्यापाड्यांमध्ये हे सुफी संत पसरले व समता, मानवता आणि प्रेम यांची शिकवण देऊ लागेल. बहुतांश संत त्या त्या गावीच स्थायिक झाले, आणि तिथेच समाधिस्थ झाले. आपल्या जीवनकाळातच हे संत त्या त्या ग्रामीण संस्कृतीचा भाग बनून गेले. बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजानेही त्यांना भरपूर प्रेम आणि आदर दिला. सुफी संतांच्या निधनानंतर त्याच्या आश्रमातच त्याची समाधी बांधली जात असे. अशाप्रकारे त्याची खानकाह म्हणजे आश्रम दरगाह म्हणजे याचनास्थळ होत असे. 

मृत्यूनंतर सुफी संतांचे ईश्वराशी मिलन होते असे मानले जाते. त्यामुळेच सुफी संतांच्या पुण्यतिथीचा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो. त्याला उर्स असे म्हणत. अपभ्रंश होऊन त्याचा उच्चार उरूस असा केला गेला. "उरुस" हा शब्द 'महफिल ए समा' मधील शेवटच्या नृत्यासाठी वापरला जातो. 'महफिल ए समा' सुफी नामजागरणाच्या बैठकीला म्हटले जाते. कालांतराने उरुस हाच शब्द  दिवंगत सुफींच्या पुण्यानुमोदन सोहळ्यासाठी वापरला जाऊ लागला.

पुढे या सोहळ्यात अनेक बदल होत गेले. त्याला हिंदू देवस्थानाच्या जत्रांचे स्वरुप प्राप्त झाले. उरुस कधी सुरू झाली याची नेमकी माहिती सांगता येत नसली तरी सल्तनत काळापासूनच दिल्लीत काही दर्गाह मध्ये उरुस साजरा केला जात असल्याचे दाखले मिळतात. अशाच काही सुफी संतांच्या उरूसांची आणि त्यामुळे तिथे होणाऱ्या सांस्कृतिक मिलाफाच्या कहाण्या आवाज मराठी  वेळोवेळी आपल्यापर्यँत पोहोचवणार आहे. नुकत्याच झालेल्या अशाच एका उरुसाविषयीची ही माहिती... 

-संपादक
 
 
हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतिक असलेल्या हजरत अहमदशहा वली बाबाचा उरूस नुकताच मुरबाड जवळील वांजळे गावी उत्साहात पार पडला. सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या दर्ग्यावर मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी पीरबाबांच्या समाधीचे दर्शन घेत मोठ्या भक्तिभावात चादर चढवली. हाजी मलंग बाबांचे सहकारी असणारे हजरत अहमदशहा वली बाबांचे या ठिकाणी वास्तव्य होते. त्यांच्या निर्वाणानंतर येथेच त्यांची कबर बांधण्यात आली, अशी आख्यायिका आहे.

पूजाअर्चा करण्याचा पहिला मान पोतदार कुटुंबियांना  
वांजळे गावात मुस्लिम समाजाचे एकही घर नाही.सुमारे शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या दर्ग्याची देखभाल व पूजाअर्चा पूर्वापारपासून हिंदू समाजाचे लोकं करीत आहेत. मुरबाड येथील सचिन पोतदार यांनी सांगितले की,“त्यांचे आजोबा पोतदारबाबा, त्यांच्यानंतर रमेश दत्तात्रय पोतदार यांनी या दर्ग्याची दिवाबत्ती चालू ठेवली होती, हिंदू समाजाचे असून सुद्धा माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी या दर्ग्यात दररोज संध्याकाळी दिवाबत्ती करण्याच काम सातत्याने चालू ठेवले होते.त्यामुळे उरसाला पहिला मान आम्हाला असतो.”
 
वांजळे, गावातील हिंदू समाजातील शहाजी केशव लाटे हे जवळपास 50 वर्षांपासून दर्ग्याची देखभाल व पूजाअर्चा करीत असल्याचे लाटे यांनी सांगितले. हिंदू समाजातील लोकं या दर्ग्यावर दर गुरुवारी येऊन पीर बाबांच्या समाधीचे दर्शन घेत पुजाअर्चा करीत असल्याचे पोलीस पाटील रविंद्र भोईर यांनी सांगितले.
 
दर्ग्याच्या जिर्णोद्धारासाठी पैठणकर कुटुंबियांकडून अकरा लाख अकरा हजार अकरा रुपयांची देणगी
हजरत अहमदशहा वली बाबांच्या दर्ग्याच्या जिर्णोद्धारासाठी पैठणकर कुटुंबीय यांनी अकरा लाख अकरा हजार अकरा रुपयांचे अर्थसाहाय्य दिल्याबद्दल समाजसेवक मेहबूबभाई पैठणकर यांचे ठाणे जिल्हा एकता संस्था व दर्गा कमिटीकडून त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.
 
 
दर्शनासाठी मोठी गर्दी
मुरबाड तालुक्यातील मुस्लिम बांधव व सर्वच समाजातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ठाणे जिल्हा एकता मंचचे अध्यक्ष अब्बास शेख, महिला अध्यक्षा झरिया अब्बास शेख, उपाध्यक्ष गीताताई पवार, पदाधिकारी फातिमा शेख, सलमा शेख, कोषाध्यक्ष सलीमभाई शेख, पदाधिकारी निजाम शेख, नजीर शेख, रज्जाक शेख, साकीर पठाण, शहाजी लाटे, अविनाश लाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. मदिना मस्जिद मुस्लिम जमात व सुन्नी जमात मुरबाड यांनी भाविकांची व्यवस्था केली होती.