निवडणूक २०२४ : लोकशाहीचा उत्सवारंभ

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 13 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

निवडणूक गावकी-भावकीची नाही, तर देशाचे भवितव्य घडवणारी आहे, हे खरे असले तरी ती सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांभोवती फिरत राहिली, तर लोकांना त्याबाबत अधिक जिव्हाळा वाटेल.

लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी आज होणारे मतदान म्हणजे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील पंचवार्षिक उत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात. दोन महिन्यांपासून निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्यामुळे अखेरच्या टप्प्यातील जागांवरील उमेदवारांची निश्चितीही अनेक ठिकाणी झालेली नाही.

पक्ष आणि आघाड्यांमध्ये उमेदवारीवरून धुसफूस, कुरघोड्या सुरू आहेत. आपल्याकडे जत्रा-यात्रांपासून क्रिकेटच्या सामन्यांपर्यंत अनेक उत्सवांना या म्हणून लोकांना सांगावे लागत नाही. माहिती मिळाली की हजारोंच्या संख्येने गर्दी करतात; परंतु निवडणुकीच्यावेळी मात्र लोकांना पुन्हा पुन्हा मतदान करा म्हणून सांगावे लागते.

सरकारी यंत्रणांपासून सामाजिक संस्थांपर्यंत विविध पातळ्यांवर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. यंदा तर महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत उन्हाचा पारा वाढल्याने मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

अर्थात सर्व क्षेत्रांतील राजकारणग्रस्तता वाढली आहे. निवडणुकीच्या राजकारणाबाबत लोकांची रुचीही वाढली आहे. त्यामुळे पारांवरील गप्पांपासून ते बस, ट्रेनमधील गर्दीपर्यंत सगळीकडे ज्याची चर्चा होते, त्या निवडणुकीसाठी मतदान करायला लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. किंबहुना लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करावयास हवे. अनमोल अधिकार बजावायला हवा.

निवडून आलेल्या सरकारबद्दल नंतर नुसत्याच तक्रारी करीत बसण्यापेक्षा आपल्या पसंतीचे सरकार निवडण्यासाठी आवर्जून मतदान करणे महत्त्वाचे. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मत महत्त्वाचे असते. मतदानाबाबतची जागरुकता वाढत चालली असताना आजही खेड्यापाड्यांतील, दुर्गम वाड्यावस्त्यांवरील लोक ज्या कर्तव्यभावनेने मतदान करतात, ती कर्तव्यभावना मोठ्या शहरांतून विशेषतः उच्चभ्रू घटकांमध्ये दिसत नाही.

वेळोवेळी झालेल्या मतदानाचे आकडे पाहिले तरी मोठ्या शहरांमधील उच्चभ्रू वस्त्यांमधील मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असलेली दिसते. मतदान न करणारे हे लोकच हिरिरीने लोकशाहीवर गप्पा मात्र मोठमोठ्या मारत असतात. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कुठे लक्ष केंद्रित करावयास पाहिजे, हेही यानिमित्ताने संबंधित यंत्रणांनी लक्षात घ्यावयास हवे.

पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या देशातील १०२ मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचा समावेश आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे पहिल्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार असून उपराजधानी नागपूरमध्ये गडकरी यांच्यापुढे काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचे तर मुनगंटीवार यांच्यापुढे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचे आव्हान आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया, गडचिरोली, रामटेक या मतदारसंघांमध्येही मतदान होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणा-या गडचिरोलीमध्ये या टप्प्यात मतदान होत आहे.

पहिल्या टप्प्यातील १०२ मतदारसंघ २१ राज्यांमधील आहेत. आठ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्य आज मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे. भाजपचे सर्वानंद सोनोवाल, किरण रिजिजू, विप्लव देव, काँग्रेसचे गौरव गोगोई, नकुलनाथ, कार्ती चिदंबरम्, द्रमुकच्या कनिमोळी, लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान आदींचा त्यात समावेश आहे.

पहिल्या टप्प्याचे मतदान होत असतानाही निवडणुकीतील प्रचाराला एक दिशा मिळायला हवी होती, ती मिळताना दिसत नाही. २०२४ची निवडणूक आहे असे म्हणावे तर सगळे २०१९च्या पानावरून पुढे सुरू असल्यासारखे दिसते. भाजपकडून राम मंदिर उभारणी आणि जम्मू-काश्मिरमधील ३७० वे कलम रद्द केल्याच्या वचनपूर्तीचा दाखला देऊन विकसित भारताचे स्वप्न दाखवण्यात येत आहे.

राज्यघटनेला धोका निर्माण झाल्याची व सर्वसामान्य माणसांचे दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडवण्यात मोदी सरकारला अपयश आल्याची टीका करीत त्याभोवती कॉँग्रेस व इंडिया आघाडीने प्रचार केंद्रित केला आहे. राष्ट्रीय पातळीवरील मुद्यांचाच पहिल्या टप्प्यातील प्रचारात अधिक गवगवा दिसून येत असून स्थानिक पातळीवरील मुद्दे प्रचारातून गायब झाले आहेत.

विदर्भात लोकांच्या जगण्यामरण्याशी संबंधित अनेक प्रश्न असताना त्याबाबत विरोधक काही बोलत नाहीत आणि सत्ताधाऱ्यांच्या विषयपत्रिकेवर ते प्रश्न नाहीत. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न हरवलेल्या परिस्थितीत एक पंचमांश मतदारसंघातील मतदार आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. निवडणूक गावकी-भावकीची नाही, देशाचे भवितव्य घडवणारी आहे, हे खरे असले तरी ती सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांभोवती ती फिरत राहिली तर लोकांना त्याबाबत अधिक जिव्हाळा वाटेल.