भारताचे पहिले अवकाश स्थानक : इस्त्रोकडून ‘बीएए-०१’ मॉड्यूलचे अनावरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) आज बहुचर्चित आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या पहिल्या मॉड्युलच्या (भागाचे) प्रारूपाचे अनावरण केले. राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त दोन दिवसांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यात या मॉडेलचे अनावरण करण्यात आले. या पहिल्या मॉड्यूलचे प्रक्षेपण करण्याचे नियोजन भारताने आखले असून, हे अवकाश स्थानक स्वदेशी बनावटीचे असेल. साधारणपणे २०२८ च्या अखेरपर्यंत त्याच्या प्रक्षेपणाची प्रक्रिया पार पडेल, असे मानले जाते. यामुळे अवकाशात प्रयोगशाळा असलेल्या मोजक्या देशांच्या रांगेमध्ये भारताचा समावेश होऊ शकेल.

सध्या केवळ दोनच अवकाश स्थानकाच्या देखभालीचे अवकाशस्थानके असून, आंतरराष्ट्रीय काम हे पाच देशांच्या अवकाश संस्थांकडून करण्यात येते. तिआंगॉन्ग या अवकाशस्थानकाची निर्मिती चीनने केली आहे. साधारणपणे २०३५ पर्यंत भारतीय अवकाश स्थानकाच्या पाच मॉड्यूलची निर्मिती करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

'बीएए-०१' या मॉड्यूलचे वजन हे दहा टन असून ते पृथ्वीच्या नजीकच्या कक्षेमध्ये स्थापित करण्यात्त येईल. ते पृथ्वीपासून साडेचारशे किलोमीटर एवढ्या अंतरावर असेल. या मॉड्यूलमध्ये स्वदेशी बनावटीची पर्यावरणीय नियंत्रण आणि जीवरक्षक प्रणाली (ईसीएलएसएस), भारत डॉकिंग सिस्टिम, भारत बर्थिग मेकॅनिझम, स्वयंचलित हॅच प्रणाली, सुक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या संशोधनासाठीची प्रणाली आणि तंत्रज्ञान आदींचा समावेश आहे. या मॉड्यूलमध्ये इंधन भरण्याबरोबरच जीवरक्षक द्रव्य साठवून ठेवण्याची प्रणाली असेल. किरणोत्साराबरोबरच अवकाशातील कचऱ्यापासून देखील ते स्वतःचे संरक्षण करू शकेल. स्पेस सूट आणि एअरलॉक प्रणालीची सोयही त्यात करण्यात आली आहे.

याबाबत होणार संशोधन
जीवन विज्ञान
अवकाशाचे विविध पैलू
वैद्यकशास्त्र
विविध ग्रहांचा शोध

यासाठीही लाभ
सुक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा मानवी आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्याची संधी यामुळे मिळणार आहे. तसेच अंतराळातील दीर्घकालीन मानवी वास्तव्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या तंत्रज्ञानाचीही यामाध्यमातून चाचणी घेण्यात येईल. अवकाश पर्यटनालाही यामुळे चालना मिळू शकेल असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.