युनूस अल्वी
"देशात द्वेषाचे राजकारण पसरवले जाते, तेव्हा त्याचा सर्वाधिक फटका नेहमीच पसमांदा समाजाला बसतो. या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे. शिक्षणानेच आपण स्वतःची आणि देशाची प्रगती सुनिश्चित करू शकतो," असे स्पष्ट मत 'पसमांदा विकास फाऊंडेशन'चे संचालक मेराज राईन यांनी व्यक्त केले.
ते मेवातच्या ऐतिहासिक नूह शहरात, 'पसमांदा विकास फाऊंडेशन'च्या वतीने आयोजित 'कौमी तालीमी बेदारी संमेलन' (राष्ट्रीय शैक्षणिक जागृती परिषद) मध्ये बोलत होते.
येथील 'मदरसा हिफझुल कुराण'मध्ये आयोजित या संमेलनाचा मुख्य उद्देश मदरशाच्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्यांना काळासोबत चालण्यासाठी प्रेरित करणे हा होता. या प्रेरणेला कृतीत उतरवण्यासाठी, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटपही करण्यात आले.
आपल्या भाषणात, मेराज राईन यांनी या उपक्रमाला "शैक्षणिक जिहाद" असे एक सशक्त नाव दिले. ते म्हणाले की, "हे शैक्षणिक किट केवळ एक भौतिक मदत नाही, तर आधुनिक शिक्षणाशी जोडले जाण्याचा एक संकल्प आहे."
राईन यांनी स्पष्ट केले की, "ज्याप्रमाणे धार्मिक शिक्षण आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आजच्या काळात आधुनिक शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा मदरशाचे विद्यार्थी आधुनिक ज्ञान आणि कौशल्यांनी परिपूर्ण होतील, तेव्हा ते केवळ आपल्या समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरतील."
भारताच्या धर्मनिरपेक्ष स्वरूपावर जोर देत ते म्हणाले की, "भारत अनेक धर्म आणि भाषांचा देश आहे. त्यामुळे आपल्याला एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी इतर भाषांचे ज्ञान असणेही आवश्यक आहे."
समाजाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करावा आणि सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
फाऊंडेशनच्या संचालिका निकहत परवीन यांनी आपल्या भाषणात महिला सक्षमीकरणावर भर दिला. "कोणत्याही समाजाची प्रगती महिलांच्या सक्रिय योगदानाशिवाय शक्य नाही. जर एक महिला शिकली, तर केवळ एक व्यक्ती नाही, तर संपूर्ण पिढी शिक्षित होते," असे त्या म्हणाल्या. त्यांनी जोर देऊन सांगितले की, "शिक्षणाला श्रीमंती किंवा गरिबीची अट नसते, त्याला फक्त जिद्द आणि धैर्याची गरज असते."
या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून नल्हड मेडिकल कॉलेजचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. के. दयाल उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले की, "शिक्षण हा कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा सर्वात मजबूत पाया आहे. शिक्षण कोणत्याही धर्माची किंवा वर्गाची मक्तेदारी नाही, तर तो प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे."
यावेळी 'उलेमा टीम'चे अध्यक्ष मुफ्ती वसीम अकरम कासमी आणि मौलाना जाहिद आलम मजााहिरी म्हणाले की, "ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे."
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. कमरुद्दीन यांनी भूषवले. मौलाना अब्बास नदवी यांनी सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी कारी असजद झुबैर, अशरफ खान, सय्यद फर्रुख सेर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -