दिल्लीत नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला असताना, प्रसिद्ध इस्लामिक विद्वान मुफ्ती सलमान अझहरी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. मुंबईतील मस्जिदमध्ये पारंपारिक खुत्बा किंवा प्रवचन देताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. इस्लाममध्ये हिंसा आणि दहशतवादाला कोणतेही स्थान नाही, हे यावेळी त्यांनी अधोरेखित केले. ‘जमिनीवर फसाद (गोंधळ/हिंसा) माजवू नका’, या कुराणातील आयतीचा संदर्भ देत त्यांनी शांततेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
इस्लाम आणि व्यक्तिगतकृत्य यात फरक
मुफ्ती अझहरी यांनी स्पष्ट केले की, एखाद्या व्यक्तीने केलेले कृत्य आणि धर्माची शिकवण यात गल्लत केली जाऊ नये. ते म्हणाले, "जर एखादा मुस्लिम दारू पित असेल किंवा जुगार खेळत असेल, तर तो त्याचा वैयक्तिक दोष आहे, इस्लामचा नाही. त्याचप्रमाणे, जर कोणी दहशत माजवत असेल, तर तो इस्लामचा ठेकेदार होऊ शकत नाही." आज जगभरात इस्लामची जी प्रतिमा रंगवली जात आहे, त्याला धर्माची शिकवण नाही, तर काही लोकांची चुकीची कृत्ये जबाबदार आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
दिल्ली स्फोट आणि त्याच्या सामाजिक परिणामावर व्यक्त केली चिंता
दिल्ली स्फोटाचा उल्लेख करताना मुफ्तींनी सांगितले की, सुरुवातीच्या तपासात जी नावे समोर येत आहेत, ती पाहून धक्का बसतो. "हे लोक डॉक्टरसारख्या पवित्र पेशाशी निगडीत असल्याचे सांगितले जात आहे. अशा उच्चशिक्षित तरुणांनी हिंसाचाराचा मार्ग का निवडला? यामुळे कोणाचे भले झाले? उलट यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाईल," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या कृत्यांमुळे अनेक निरपराध विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे भविष्य धोक्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
एका निरपराध्याचा जीव घेणे म्हणजे मानवतेची हत्या
कुराणाचा दाखला देत मुफ्ती म्हणाले की, "ज्याने एका निरपराध व्यक्तीचा नाहक जीव घेतला, त्याने जणू संपूर्ण मानवतेची हत्या केली." कोणत्याही रस्त्यावरून जाणाऱ्याला, पर्यटकाला किंवा सामान्य माणसाला मारणे याला जिहाद म्हणता येणार नाही. काश्मीरमधील घटनांचा संदर्भ देत त्यांनी विचारले की, तिथे पर्यटनासाठी आलेल्या निरपराध लोकांचा काय दोष होता? अशा कृत्यांमुळे केवळ द्वेष पसरतो आणि समाजाचे नुकसान होते.
तरुणांना सोशल मीडियाबाबत दिली ताकीद
आजकाल तरुण सोशल मीडियावर आक्रमक स्टेटस ठेवून किंवा भीतीदायक पोस्ट शेअर करून स्वतःला शूर समजतात, यावर मुफ्तींनी इशारा दिला. "लोकांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा दहशत पसरवणे हे इस्लाममध्ये हराम आहे. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा. तुमचे वर्तन असे हवे की लोकांनी तुमचे स्वागत केले पाहिजे, तुम्हाला घाबरता कामा नये," असे आवाहन त्यांनी तरुणांना केले.
भविष्यातील धोक्यांविषयी केले सावध
मुफ्तींनी इशारा दिला की, काही संघटना किंवा गट तरुणांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत. "कोणत्याही दहशतवादी संघटनेशी किंवा हिंसक विचारधारेरीशी संबंध ठेवू नका. आपली सदसदविवेकबुद्धी जागृत ठेवा. इस्लाम हा शांततेचा आणि प्रेमाचा संदेश देणारा धर्म आहे, तो द्वेष शिकवत नाही," असे सांगत त्यांनी शेवटी अल्लाहकडे देशात शांतता आणि सौहार्द नांदावे, अशी प्रार्थना केली
कोण आहेत मुफ्ती सलमान अझहरी?
मुफ्ती सलमान अझहरी भारतातील एक अत्यंत लोकप्रिय सुन्नी इस्लामिक विद्वान, प्रभावी वक्ते आणि धर्मगुरु आहेत. इजिप्तमधील कैरो येथील जागतिक कीर्तीच्या 'अल-अझहर' विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले असून, त्यांच्या नावासोबत जोडलेली 'अझहरी' ही उपाधी त्यांच्या या शैक्षणिक पार्श्वभूमीची ओळख करून देते.
जोशपूर्ण भाषण शैलीमुळे, अमोघ वक्तृत्व आणि शेरो-शायरीच्या माध्यमातून संवाद साधण्याच्या पद्धतीमुळे मुस्लिम तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स असून, ते आपल्या भाषणांतून केवळ धार्मिक शिक्षणच देत नाहीत, तर तरुणांना व्यसनमुक्ती, शिक्षण आणि गुन्हेगारीपासून दूर राहण्याचे आवाहनही करतात. अनेकदा त्यांच्या परखड वक्तव्यांमुळे ते चर्चेत असतात, परंतु समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवणारे आणि धार्मिक सलोखा राखण्याचा सल्ला देणारे आधुनिक विचारांचे धर्मगुरु म्हणून त्यांची ओळख आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -