आजच्या धावपळीच्या युगात, जिथे सोशल मीडियावरील आक्रमक नॅरेटिव्ह आणि आजूबाजूच्या तणावपूर्ण घटनांनी सामुदायिक संबंधांच्या मुळांवर आघात केला आहे, तिथे शेजाऱ्यांमधील शतकानुशतकांची जुनी असलेली उब आणि विश्वास कमी होत चालला आहे. दुसऱ्या समाजाचे सोडाच, पण एकाच गल्लीत किंवा इमारतीत राहणारे लोकही आता एकमेकांकडे संशयाने पाहू लागले आहेत. वाढते शहरीकरण आणि व्यस्त जीवनशैलीमुळे माणसा-माणसांतील संवाद हरवत चालला आहे. ही बिघडलेली सामाजिक वीण पुन्हा घट्ट करण्यासाठी आणि परस्परांमधील बंधुभाव पुन्हा जागृत करण्यासाठी, जमात-ए- इस्लामी हिंद (JIH) या देशातील एका प्रमुख मुस्लिम संघटनेने एका व्यापक उपक्रमाची घोषणा केली आहे.
‘आदर्श शेजारी, आदर्श समाज’ (Ideal Neighbourhood, Ideal Society) या ब्रीदवाक्यासह, जमातने २१ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत चालणाऱ्या ‘शेजाऱ्यांचे अधिकार’ (Rights of Neighbours) या दहा दिवसीय देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ केला आहे. शेजाऱ्यांशी चांगले संबंध हेच एका मजबूत आणि निरोगी समाजाचा पाया असतात, या विचाराने शेजाऱ्यांप्रती सद्भावना, आदर आणि जबाबदारीची जाणीव पुन्हा निर्माण करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
धर्म कोणतीही असो, संदेश प्रेमाचाच
या मोहिमेची घोषणा करताना, जमात-ए- इस्लामी हिंदचे अध्यक्ष सय्यद सादतुल्लाह हुसेनी यांनी 'शेजारधर्मा'चे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की, "इस्लाममध्ये शेजाऱ्यांच्या अधिकारांना अत्यंत उच्च स्थान दिले आहे. कुराण स्पष्टपणे आदेश देते की, केवळ जवळ राहणाऱ्या शेजाऱ्यांशीच नव्हे, तर 'तात्पुरते शेजारी' (जसे की ऑफिसमधील सहकारी, सहप्रवासी किंवा रस्त्यावरून आपल्यासोबत चालणारे पादचारी) यांच्याशीही उत्तम व्यवहार केला पाहिजे."
हुसेनी यांनी पुढे सांगितले की, ही शिकवण केवळ इस्लामपुरती मर्यादित नाही. हिंदू धर्मातही 'वसुधैव कुटुंबकम्' (संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे) हा विचार मांडला आहे, जिथे शेजाऱ्याला विस्तारित कुटुंबाचा सदस्य मानले जाते. शीख धर्मातील गुरु ग्रंथ साहिबमध्ये सेवा आणि परोपकारावर भर देण्यात आला आहे, जो आपल्याला सर्वांशी, विशेषतः आसपासच्या लोकांशी करुणेने वागण्याची प्रेरणा देतो. ख्रिश्चन धर्मातील बायबलमध्येही "आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करा," अशी शिकवण आहे. त्यामुळे ही मोहीम खऱ्या अर्थाने भारताच्या सामायिक धार्मिक आणि नैतिक वारशाला पुढे नेण्याचे काम करत आहे.
समाजाचे परिवर्तन : दया आणि न्यायाच्या आधारावर
सय्यद सादतुल्लाह हुसेनी यांनी म्हटले की, "चांगल्या शेजारधर्माच्या पायावर उभा असलेला समाज नैसर्गिकरित्या एक आदर्श समाज बनतो. जेव्हा शेजारी एकमेकांशी दया, क्षमा आणि न्यायाने वागतात, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण समुदायावर होतो. आम्हाला आशा आहे की, ही मोहीम केवळ शेजाऱ्यांमधील तंटे मिटवणार नाही, तर दया आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या इस्लामिक मूल्यांचा एक शक्तिशाली पुरावा ठरेल."
या मोहिमेचे उद्दिष्ट मुस्लिमांना या महत्त्वपूर्ण शिकवणींची आठवण करून देणे आणि त्यांना आदर्श शेजारी बनण्यासाठी प्रेरित करणे हे आहे, जेणेकरून ते समाजासमोर इस्लामचा खरा, शांततापूर्ण आणि करुणामयी चेहरा सादर करू शकतील, असेही हुसेनी यांनी नमूद केले.
शहरी एकाकीपणावर उपाय
‘शेजाऱ्यांचे अधिकार’ मोहिमेचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अहमद यांनी स्पष्ट केले की, शहरी भागात वाढत्या व्यक्तिवादामुळे शेजाऱ्यांमधील संबंधांकडे दुर्लक्ष होत आहे. या मोहिमेद्वारे परस्पर करुणा, सहकार्य, स्वच्छता आणि वाहतुकीचे नियम पाळणे या गोष्टींना प्रोत्साहन दिले जाईल, ज्यांना इस्लाममध्ये सामाजिक जबाबदारीचा भाग मानले जाते.
कर्नाटक आणि इतर राज्यांचा सहभाग
या मोहिमेला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. ईटीव्ही भारतशी बोलताना जमात-ए- इस्लामी हिंद, कर्नाटकचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद साद बेळगामी यांनी सांगितले की, "शेजाऱ्यांच्या हक्कांबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे. जेव्हा शेजारी स्नेह आणि विश्वासाने राहतात, तेव्हा सलोखा नैसर्गिकरित्या बहरतो." त्यांनी कुराणातील सुरा अन-निसा (४:३६) मधील आयतीचा संदर्भ दिला, ज्यात नातेवाईक, बिगर-नातेवाईक आणि तात्पुरत्या शेजाऱ्यांशी चांगले वागण्याचा आदेश दिला आहे. त्यांनी प्रेषित मोहम्मद (स.) यांच्या वचनाची आठवण करून दिली की, "ज्या व्यक्तीचा शेजारी त्याच्या उपद्रवापासून सुरक्षित नाही, त्याचे ईमान (श्रद्धा) अपूर्ण आहे. जो आपल्या शेजाऱ्याला त्रास देतो, तो स्वर्गात प्रवेश करणार नाही."
मोहिमेत काय असणार?
या दहा दिवसांच्या अभियानासाठी विविध आणि मैत्रीपूर्ण कार्यक्रमांची एक विस्तृत शृंखला तयार करण्यात आली आहे:
सर्वधर्मीय बैठकी आणि 'चाय पे चर्चा': विविध धर्मांच्या शेजाऱ्यांसोबत अनौपचारिक भेटीगाठी आयोजित केल्या जातील, जेणेकरून थेट संवादातून परस्पर गैरसमज दूर होतील.
मोहल्ला स्वच्छता मोहीम आणि जनजागृती रॅली: सामुदायिक स्वच्छता आणि रस्ते सुरक्षा (ट्रॅफिक नियम) या विषयांवर रॅली काढल्या जातील, ज्यामुळे नागरी जबाबदारीची जाणीव होईल.
'नो युवर नेबर' (Know Your Neighbour): या उपक्रमांतर्गत लोकांना त्यांच्या शेजाऱ्यांचे जीवन आणि संस्कृती समजून घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा: महिला आणि तरुणांसाठी विशेष कार्यक्रम, स्नेहमेळावे आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले जाईल, ज्यामुळे सुसंवाद वाढेल.
बिगर-मुस्लिमांपर्यंत पोहोचण्यावर भर: आंतरधर्मीय सलोखा बळकट करण्यासाठी आणि इस्लामबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी बिगर-मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचण्यावर विशेष भर दिला जाईल.
कर्नाटकातील जमातचे सचिव लबिद शफी यांनी सांगितले की, प्रेषित मोहम्मद (स.) यांनी शेजाऱ्यांच्या हक्कांवर इतका जोर दिला होता की, एकदा त्यांना वाटले की, वारंवार येणाऱ्या सूचनांमुळे कदाचित शेजाऱ्याला संपत्तीत वारसदार तर बनवले जाणार नाही ना! त्यांनी एका हदीसचा हवाला दिला, "तो व्यक्ती प्रेषितांचा अनुयायी मानला जात नाही, जो स्वतः पोटभर जेवतो, पण त्याचा शेजारी उपाशी झोपतो."
ची ही मोहीम अशा वेळी आली आहे, देशाला परस्पर विश्वास आणि सामाजिक सलोख्याची सर्वाधिक गरज असताना जमात-ए- इस्लामी हिंदने हा उपक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेनंतरही संवाद कायम राहावा यासाठी स्थानिक समित्या स्थापन करण्याची जमातची योजना आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page