कर्नाटकचे चेंज मेकर्स : शिक्षण, कला, क्रीडा आणि समाजसेवेतून क्रांती घडवणारे १० मुस्लिम चेहरे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
कर्नाटकचे चेंज मेकर्स
कर्नाटकचे चेंज मेकर्स

 

बंगळुरूच्या आधुनिक टेक लॅब्स असोत की कुर्गचे कॉफीचे मळे; हम्पीचे प्राचीन अवशेष असोत की म्हैसूरचे गजबजलेले रस्ते—कर्नाटक एका अदम्य ऊर्जेने सळसळत असते. याच भूमीत भारताच्या आयटी क्रांतीचा जन्म झाला. इथेच शास्त्रीय कला आणि आधुनिक तंत्रज्ञान हातात हात घालून चालतात. 

इथल्या प्रत्येक जिल्ह्याची परिवर्तनाची एक वेगळी कहाणी आहे. अनेक कन्नड मातीतील सुपुत्रांनी साम्राज्ये उभी केली, कीर्ती मिळवली. पण काही जण त्याही पुढे गेले. ते केवळ यशस्वी झाले नाहीत, तर ते ‘चेंजमेकर्स’ बनले. या व्यक्तींनी अडथळे पार केले,  नशीब नव्याने लिहिले आणि क्रांतीची मशाल पेटवली जिच्या प्रकाशाने त्यांचेच नव्हे तर इतरांचे आयुष्यही उजळून निघाले.

कर्नाटकातील या दहा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांची थोडक्यात ओळख

१. रिफाह तस्कीन

म्हैसूरची ही १५ वर्षांची धाडसी मुलगी! तिचे वडील माजी रेसर होते. त्यांनी बनवलेल्या कस्टम कारमधून तिने वयाच्या तिसऱ्या वर्षीच रेसिंगला सुरुवात केली. तिच्यासाठी वय हा केवळ एक आकडा आहे.

पाचव्या वर्षी ती म्हैसूर ते बंगळुरू गाडी चालवत होती. सातव्या वर्षी ती शाळेतील कार्यक्रमांत 'ड्रिफ्टिंग' करत होती आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

लालफितीचा कारभार आणि लोकांचा अविश्वास यावर तिने मात केली. ‘अजून खूप लहान आहे’ म्हणणाऱ्यांचा अडथळा पार केला. तिने सात जागतिक विक्रम (गोल्डन, एलिट, हाय रेंज, इंडिया, आशिया, वर्ल्डवाईड आणि वंडर बुक्स) आपल्या नावे केले आहेत. तिने बाईक, जेसीबी, क्रेन, बस, टिपर, रोड रोलर चालवण्यावर प्रभुत्व मिळवले आहे. एवढेच नाही, तर आठव्या वर्षी तिने विमानही उडवले. 

ती ५ वर्षे म्हैसूरची स्वच्छता दूत आणि ४ वर्षे क्षयरोग निर्मूलन मोहिमेची 'स्टेट वॉरियर' राहिली आहे. ती राज्यस्तरीय बॉक्सिंग पदक विजेती आणि कराटे फायटरही आहे. तिने राहुल गांधींसाठी ड्रिफ्टिंग केले, सोनिया गांधींच्या आशीर्वादाने विमान उडवले आणि जागतिक प्रेक्षकांना अवाक केले.

कुठल्याही सरकारी मदतीशिवाय, स्वखर्चाने ती हे सर्व करते. IAS होण्याचे तिचे स्वप्न आहे. रिफाहने केवळ विक्रम मोडले नाहीत; तर ‘अशक्य’ म्हणजे काय, याची व्याख्याही बदलली. 

२. मुश्ताक अहमद

बंगळुरूमध्ये जन्मलेले आणि दूरदृष्टी असणारे हे व्यक्तिमत्त्व दुबईत पोहोचले तेव्हा तिथे फक्त वाळूचे ढिगारे होते. ४१ वर्षे ते दुबई पोलिसांच्या फोटोग्राफी विभागाचे प्रमुख होते. या निवृत्त फर्स्ट वॉरंट ऑफिसरने या  देशाचा उदय आपल्या कॅमेऱ्यात टिपला. बुर्ज खलिफाचा सांगाडा, क्रेनवरून दिसणारा काबा, शेख मोहम्मद यांचा १९७९ मधील विवाह आणि पवित्र मदिना त्यांनी अत्यंत आदराने टिपले.

दुबईचे हेलिकॉप्टर शॉट्स त्यांनी घेतले. शेख झायेद यांच्यासह लता मंगेशकर, मोहम्मद रफी यांसारख्या जागतिक दिग्गजांच्या सोबतीला ते उभे राहिले. या ७९ वर्षीय इतिहासकाराने महत्त्वाच्या क्षणांना अमर केले. निवृत्तीनंतर दुबई पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला, त्यांना मिठी मारली आणि कपाळावर चुंबन घेतले. मुश्ताक यांच्या लेन्सने केवळ इतिहासाची नोंद केली नाही, तर तो घडवला. त्यांचा मंत्र आहे: "सर्वोत्तम शॉट अजून बाकी आहे."

३. तझैयून ओमर

तझैयून ओमर १३ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी संसदेतील गर्दीतून मार्ग काढत इंदिरा गांधींची स्वाक्षरी मिळवली होती. त्या क्षणाने त्यांना शिकवले की नेतृत्वाच्या आड स्त्री-पुरुष हा भेद येत नाही.

कच्छी मेमन कुटुंबातील या मुलीने वडिलांच्या कापड दुकानात मदत करण्यापासून सुरुवात केली आणि पुढे बंगळुरूमध्ये क्रांती घडवली. १९९९ मध्ये त्यांनी 'ह्युमेन टच ट्रस्ट'ची स्थापना केली. त्याद्वारे दिव्यांग मुलांसाठी १०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या. अल-अझहर शाळा सुरू केली. १,७५० सन्मानजनक सामूहिक विवाह लावले. २,००० पेक्षा अधिकमुस्लिम महिलांना उद्योजक बनवले आणि दरवर्षी सुमारे ३०० मुलींना टेक करिअरमध्ये नेणाऱ्या शिष्यवृत्ती दिल्या.

'सुलतान नारी शक्ती' आणि कर्नाटकचा 'रायझिंग बियॉन्ड द सीलिंग' पुरस्कार विजेत्या तझैयून यांनी सिद्ध केले की, करुणा आणि आपुलकी शतकानुशतकांच्या अडथळ्यांना तोडू शकते. ‘स्त्रीची जागा घरात आहे’, असे मानणाऱ्या परंपरेत तझैयून यांनी शाळा सुरु केली, व्यवसाय आणि भविष्य उभारले. " तुम्ही कृती करण्याचे ठरवता, त्याच क्षणी बदल सुरू होतो." हा त्यांच्या यशोमंत्र आहे.

४. मोहम्मद अली खालिद

भारताचे 'ब्रॉन्झ वुल्फ अवॉर्ड' विजेते (स्काउटिंगमधील सर्वोच्च जागतिक सन्मान) मोहम्मद अली खालिद यांनी चार दशकांहून अधिक काळ स्काउटिंगचे व्रत जोपासले आहे. त्यांचा त्याग आणि प्रभाव थक्क करणारा आहे.

मोहम्मद अली खालिद हे भारतातील सर्वात प्रभावशाली स्काउट नेत्यांपैकी एक आहेत. १९८०च्या नॅशनल जांबोरीमध्ये स्वयंसेवा करण्यापासून ते भारत स्काउट्स आणि गाईड्सचे अतिरिक्त मुख्य राष्ट्रीय आयुक्त बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांनी २०१७ची नॅशनल जांबोरी आणि २०२२ ची इंटरनॅशनल कल्चरल जांबोरी यांसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचे नेतृत्व केले. आशिया-पॅसिफिक क्षेत्रात स्काउटिंग मजबूत केले. 'व्हिजन २०१३' चे शिल्पकार आणि आदरणीय जागतिक मुत्सद्दी म्हणून खालिद ओळखले जातात. त्यांच्या निस्वार्थ नेतृत्वाने आणि मार्गदर्शनाने अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे.

'WOSM' च्या जागतिक शुल्क सहमतीचे ते दुवा ठरले. 'SAANSO' चे संस्थापक आणि असंख्य तरुण नेत्यांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले. खालिद यांनी भारताला स्काउटिंगचे सर्वात मोठे पॉवरहाऊस बनवले. वयाच्या ७० व्या वर्षीही ते २०% सदस्यत्व वाढीसाठी आणि ५०% युवा प्रतिनिधित्वासाठी प्रयत्नशील आहेत.

५. रहमत तारीकेरे

१९५९ मध्ये तारीकेरेच्या संमिश्र गल्ल्यांमध्ये रहमत यांचा जन्म झाला. तिथे हिंदू आणि मुस्लिम एकच रस्ता आणि कथा शेअर करत असत. १९९२च्या बाबरी विध्वंसाने त्यांना हादरवून सोडले. त्यांनी केवळ साहित्यिक टीका करणे सोडले आणि कर्नाटकातील जिवंत बहुलवादी परंपरा शोधून काढल्या. सुफी संत, नाथपंथी, शाक्त कवी आणि लोक मोहरम विधी यांनी शतकानुशतके समुदायांना कसे जोडले होते, हे त्यांनी उलगडले.

त्यांनी ३० क्रांतिकारी पुस्तके लिहिली आहेत. त्यात चार कर्नाटक साहित्य अकादमी विजेते आणि २०१०चे साहित्य अकादमी विजेते पुस्तक 'कत्तियांचिना दारी' (Kattiyanchina Daari) यांचा समावेश आहे. २०१५ मध्ये असहिष्णुता आणि एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध करत त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार परत केला होता. ‘मी चेंजमेकर नाही’, असा आग्रह धरणारे हे नम्र प्राध्यापक शांतपणे कर्नाटकात सर्वसमावेशकतेची विण घट्ट करत आहेत. एकता म्हणजे एकरूपता नाही, तर फरकांचा एक जिवंत मोझॅक आहे, हेच ते आपल्या कार्यातून सिद्ध करू पाहतात. 

६. खुदसिया नझीर

भारताची ‘आयर्न लेडी’ खुदसिया नझीर यांचा जन्म १९८७ मध्ये बांगरपेठ येथे झाला. वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांनी पैलवान वडील गमावले. नैराश्य आणि उपहासाच्या दरम्यान एका पुराणमतवादी मुस्लिम कुटुंबात त्या वाढल्या. त्यांनी आपल्या वेदनेचे रूपांतर शक्तीत केले.

सिझेरियननंतर त्यांनी ३०० किलो डेडलिफ्ट करून विश्वविक्रम केला. त्यानंतर त्यांनी जागतिक स्तरावर झेप घेतली. आशिया पॅसिफिक मास्टर्स २०२३ (दक्षिण कोरिया) मध्ये तीन सुवर्ण, अथेन्समध्ये रौप्य, कॉमनवेल्थ (ऑस्ट्रेलिया) आणि जर्मनीमध्ये सुवर्ण पदके पटकावली. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग पदके जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय मुस्लिम महिला ठरल्या. KSRTC मध्ये पूर्णवेळ काम करत असताना त्या हे  शिवधनुष्य पेलतात.

पोलिस पहाऱ्यात बुरखा घालून चालण्यापासून ते हार्वर्डच्या मंचापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मातृत्व शक्तीचा गुणाकार करते, हेच खुदसिया सिद्ध करतात. शिका, खेळ खेळा, स्वतःचे नशीब लिहा, हा त्यांचा मंत्र आहे. ही 'आयर्न लेडी' केवळ विक्रम मोडत नाही; तर महिलांना घालून देण्यात आलेल्या  मर्यादाही तोडते.

७. फौजिया तरन्नुम

२०१५ च्या बॅचच्या आयएएस (AIR 31) फौजिया तरन्नुम यांनी बंगळुरूच्या सार्वजनिक ग्रंथालयातून अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली. कोणत्याची कोचिंगच्या नव्हे तर फक्त जिद्दीच्या बळावर. आयआरएस सुवर्णपदक विजेत्या ते कर्नाटक केडरपर्यंतचा त्यांचा प्रवास प्रचंड प्रेरणादायी आहे. त्यांनी मुरबाड कलबुर्गीला ‘कलबुर्गी रोटी’सह राष्ट्रीय बाजरीचे पॉवरहाऊस बनवले. हजारो बचत गटांच्या (SHG) महिलांना सक्षम केले. जिल्ह्यांना टॉप एसएसएलसी रँकमध्ये नेले. ग्रामपंचायत वाचनालये पुनरुज्जीवित केली. २०२५ मध्ये भारताचे 'सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती' (Best Electoral Practices) पुरस्कार मिळवून देणाऱ्या सर्वात अचूक मतदारयाद्या त्यांनी तयार केल्या.

वयाच्या ३६ व्या वर्षी या जिल्हाधिकाऱ्याने इस्लामोफोबिक अपशब्दांचा सामना केला, आणि टीकाकारांना कामातून उत्तर दिले. अविचल, सहानुभूतीशील आणि लोकांसाठी काम करणाऱ्या फौजिया यांनी सिद्ध केले की नोकरशाहीलाही हृदय आणि पोलादी कणा असू शकतो. त्यांनी केवळ बदलासाठी ओरड केली नाही तर तो घडवण्यात पुढाकार घेतला. 

८. जफर मोहिउद्दीन

रायचूरचा हा रेडिओ-वेडा मुलगा एकेकाळी शाळेत इतरांसाठी प्रेमपत्रे लिहित असे. आर. नागेश यांनी बसमध्ये केलेल्या एका कौतुकाने त्यांचे आयुष्य रंगमंचाकडे वळवले. त्यांनी यूपीएससी आणि एअर फोर्सच्या पोस्टिंग सोडून 'कठपुतलियान थिएटर ग्रुप' (१९८८) स्थापन केला. त्यांनी बाहुल्या आणि नाटकांचा वापर निषिद्ध विषयांविरुद्ध शस्त्र म्हणून केला.

गिरीश कर्नाड यांच्या 'टिपू सुल्तान के ख्वाब' (थिएटर ऑलिम्पिक २०१८) च्या अनुवादापासून ते 'जबान मिली है मगर' द्वारे उर्दू मिथकांना तोडण्यापर्यंत त्यांचा प्रवास आहे. त्यांचा अमिताभसारखा खडा आवाज दहा भाषांमध्ये गरजला आहे. त्यांनी 'स्वराज्य नामा'चे कथन केले आणि कर्नाड यांच्यासोबत उर्दूच्या धर्मनिरपेक्ष आत्म्याचे रक्षण केले.

नोव्हेंबर २०२५ मध्ये, कर्नाटकाने त्यांना 'राज्योत्सव पुरस्कार' (सर्वोच्च सन्मान) देऊन गौरव केला. चार दशकांपासून ते समाजाला सत्य आणि सलोख्याकडे खेचत आहेत. हा पपेट मास्टर अजूनही हार मानायला तयार नाही.

९. मौलाना डॉ. मोहम्मद मकसूद इम्रान रशादी

बंगळुरूच्या प्रतिष्ठित जामा मशिदीचे प्राचार्य आणि मुख्य इमाम, मौलाना डॉ. मोहम्मद मकसूद इम्रान रशादी यांनी १८ महिन्यांत कुराण मुखोद्गत केले. उर्दू साहित्यात पीएचडी मिळवली. एका मदरशातील ४०० वंचित विद्यार्थ्यांचा १००% निकाल लावून नवीन विक्रम घडवला. 

दंगली घडवण्यासाठी फेकलेले मांस शांतपणे हटवण्यापासून ते २०२५ चे ‘आय लव्ह मोहम्मद’ बॅनर संकट एका शांत प्रवचनाने शमवण्यापर्यंत, अनेक प्रकरणात हिंसाचार घडवण्यापूर्वीच तो रोखण्यात त्यांना यश आले. ते सर्व धर्मांमध्ये लाऊडस्पीकरच्या न्याय्य नियमांवर चर्चा करतात. इफ्तारसाठी हिंदू स्वामींचे स्वागत करतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ते गरजले होते, "दहशतवादाला कोणताही धर्म नसतो—आम्ही हिंदुस्थानवर प्रेम करतो."

तेहरानमध्ये प्रवचन देणारे, सौदी राजघराण्याला भेटणारे आणि तरीही के.आर. मार्केटमध्ये फिरून व्यापाऱ्यांना एकत्र करणारे मौलाना मकसूद म्हणतात की एकता बॅनरने नाही, तर कृतीने तयार होते. बंगळुरूमधील सलोख्याचे ते आधारस्तंभ आहेत..

१०. सय्यद नवाज मिफ्ताही

 २०११ मध्ये मुंबईत अंध मुलांच्या अश्रूंनी भरलेल्या कुराण पठणाने सय्यद नवाज मिफ्ताही यांचे आयुष्य कायमचे बदलले. त्यांनी त्या अंध मुलांचा प्रकाश बनण्याची शपथ घेतली.

त्यांनी ब्रेलमध्ये प्रभुत्व मिळवले. वृद्ध बोटांना जागृत करण्यासाठी ‘तुटलेल्या तांदळाचा स्पर्श’ (broken-rice touch) हे तंत्र शोधले. सुलतान शाह मरकज, मदरसा-ए-नूर (७० विद्यार्थी) आणि दररोजच्या फोन क्लासेसला त्यांनी नवी दिशा दिली. इथे दृष्टीहीन विद्यार्थी निर्दोष 'तज्वीद' (उच्चार) सह कुराण पठण करतात आणि प्रत्येक रमजानमध्ये अनेक 'खत्म' (पूर्ण पठण) करतात.

त्यांच्या मॉडेलने आता हैदराबादपासून काश्मीरपर्यंत हजारो शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांनी 'उमंग फाऊंडेशन्स' सुरू केले. सात अंध विश्वस्त आणि एका निर्भय तरुणीने चालवलेले हे दीपस्तंभच आहे. इथे कोणत्याही धर्माची दृष्टीहीन व्यक्ती कुराण, संगणक आणि स्वातंत्र्याची अनुभूती घेऊ शकतो. नवाज यांनी आपल्या उपक्रमातून सिद्ध केले आहे की डोळ्यांपेक्षा हृदयाची दृष्टी अधिक तेजस्वी असते.