गाझा शांतता योजनेवरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. नेतन्याहूंच्या आडमुठेपणामुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी त्यांना फोनवर अत्यंत अर्वाच्य भाषेत फटकारल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेमुळे दोन्ही नेत्यांमधील मैत्रीपूर्ण संबंध पूर्णपणे तुटण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जात आहे.
इस्रायलने युद्धविरामाचा आदेश धुडकावल्यानंतर, अध्यक्ष ट्रम्प यांचा संयम सुटल्याचे दिसत आहे. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी आपल्या सहकाऱ्यांजवळ बोलताना नेतन्याहूंबद्दल अपशब्दांचा वापर केला. "नेतन्याहूंच्या हट्टामुळे आपली शांतता योजना बारगळत आहे आणि त्यामुळे नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याचे आपले स्वप्न भंग पावत आहे," अशी भावना ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
अध्यक्ष ट्रम्प यांनी गाझा शांतता करार घडवून आणण्यासाठी मोठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र, नेतन्याहू हे इस्रायलच्या सुरक्षेचे कारण पुढे करत, हमासचा पूर्ण खात्मा होईपर्यंत माघार घेण्यास तयार नाहीत. त्यांच्या या भूमिकेमुळे इजिप्तमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेतही अडथळे येत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी इस्रायलची लष्करी मदत रोखण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता थेट शिवीगाळ केल्याचे वृत्त आल्याने, अमेरिका आणि इस्रायलमधील संबंध इतिहासातील सर्वात तणावपूर्ण टप्प्यावर पोहोचले आहेत. या वादामुळे गाझा शांतता योजनेचे भवितव्यच अंधारात सापडले आहे.