गाझा पॅटर्नवर आता रशिया-युक्रेनमध्ये शांतता? ट्रम्प यांच्या २८ कलमी फॉर्म्युलावर काम सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी एका शांतता योजनेला 'शांतपणे' (quietly) मंजुरी दिली आहे. दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्यासाठी आणि लढाईला पूर्णविराम देण्यासाठी हा एक मोठा निर्णय ठरू शकतो. 'एनबीसी न्यूज'ने एका वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याचा हवाला देऊन हे वृत्त दिले आहे.

अहवालानुसार, ट्रम्प यांनी या आठवड्यात रशिया आणि युक्रेनमधील शांततेसाठी '२८ कलमी योजने'ला (28-point plan) मंजुरी दिली आहे.

प्रशासनातील सर्वोच्च अधिकाऱ्यांनी गेल्या काही आठवड्यांपासून 'शांतपणे' ही योजना विकसित केली आहे. यासाठी रशियन दूत किरिल दिमित्रीव्ह आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करण्यात आली आहे.

या योजनेचे वृत्त सर्वात आधी 'एक्सिओस'ने (Axios) दिले होते. त्यांच्या मते, अमेरिकेचा हा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांच्या '२० कलमी गाझा शांतता योजने'पासून प्रेरित आहे.

एनबीसीच्या अहवालात नमूद केलेल्या अधिकाऱ्याने शांतता प्रस्तावाचे तपशील शेअर करण्यास नकार दिला. हा प्रस्ताव अजूनही मुख्य भागधारकांमध्ये (stakeholders) चर्चेचा विषय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तीन अमेरिकन अधिकाऱ्यांनी पोर्टलला सांगितले की, या शांतता कराराचा आराखडा अद्याप युक्रेनच्या नेत्यांना अधिकृतपणे सादर करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, या मसुद्याचे काम पूर्ण होण्याची वेळ आणि अमेरिकन लष्करी शिष्टमंडळाची युक्रेन भेट, यांचा मेळ जुळून आला आहे.

दोन अमेरिकन अधिकारी, एक युरोपियन अधिकारी आणि युक्रेन सरकारच्या जवळच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे शिष्टमंडळ बुधवारी सकाळीच युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहे. त्यांच्या भेटीची दोन मुख्य उद्दिष्टे आहेत: लष्करी रणनीती आणि तंत्रज्ञानावर चर्चा करणे आणि रखडलेल्या शांतता प्रक्रियेला पुन्हा गती देणे.

रशिया-युक्रेन युद्ध

रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे हे युद्ध दशकांतील युरोपमधील सर्वात मोठे युद्ध बनले आहे. लढाई पूर्व आणि दक्षिण युक्रेनवर केंद्रित राहिली आहे. तिथे आजही तीव्र लढाया, ड्रोन हल्ले आणि लांब पल्ल्याचे हल्ले मोठ्या प्रमाणावर विनाश आणि जीवितहानी करत आहेत.

पाश्चिमात्य लष्करी आणि आर्थिक पाठिंब्याच्या जोरावर युक्रेनने आपला प्रदेश वाचवण्यावर आणि रशियन आक्रमणाला परतवून लावण्यावर भर दिला आहे. दुसरीकडे, रशियाने ताब्यातील प्रदेशांवर नियंत्रण मिळवण्याचे आणि लष्करी व पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांद्वारे युक्रेनवर दबाव आणण्याचे ध्येय ठेवले आहे.

या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचे विस्थापन झाले आहे, हजारो बळी गेले आहेत आणि युद्ध एका अशा कोंडीत सापडले आहे जिचा कोणताही स्पष्ट अंत दिसत नाही.