'जितो'ने आयोजित केलेल्या विश्व नवकार मंत्र दिवसाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करताना पृथ्वीराज कोठारी, विजय भंडारी आणि इतर पदाधिकारी
"संपूर्ण विश्वात सुख, शांती व समुद्धी निर्माण करण्याची ताकद नवकार मंत्रात आहे. नवकार मंत्र हा आपल्या आस्थेचे केंद्र आहे. हा मंत्र १०८ गुणांना नमन करतो," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या वेळी त्यांनी नऊ संकल्प सांगितले. त्यामुळे नव्या पिढीला दिशा मिळेल, व जगभरात शांतता नांदल, असेही त्यांनी सांगितले.
जीतो अॅपेक्सच्या वतीने नवी दिल्लीतील विज्ञान भवनात बुधवारी (ता. ९) विश्व नवकार मंत्र दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी जीतो अपेक्सचे चेअरमन पृथ्वीराज कोठारी, अध्यक्ष विजय भंडारी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, "आपला शत्रू बाहेर नसून आपल्या आतच आहे. त्यावर विजय संपादन कराल, तर जीवन सुखी व समृद्ध होईल. विश्वशांती व विश्वकल्याणासाठी विश्व नवकार मंत्र दिवसाचे आयोजन करून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनने (जीतो) खूप मोठे काम केले आहे." जागतिक पातळीवर भारताची भूमिका निर्माण होण्यात जैन धर्मीयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असेही मोदी म्हणाले.
दरम्यान, जगभरातील १०८ देशांत अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व ठिकाणी एकाचवेळी झालेल्या या कार्यक्रमात १ कोटी ८८ लाख लोकांनी जप केला. एकट्या मुंबई शहरात ६०० ठिकाणी, तर संपूर्ण भारतात ९७७२ ठिकाणी हा कार्यक्रम झाला. ही आत्मशांती निर्माण झाली, की जगभर शांती व समृद्धता येईल, असे विजय भंडारी यांनी यावेळी सांगितले.
मोदींनी सांगितले नऊ संकल्प
पाणी बचत करा, प्रत्येकाने एक झाड लावा व ते जगवा, स्वच्छता राखा, व्होकल फॉर लोकल, देश दर्शन करा, सेंद्रिय शेती करा, हेल्थी लाइफस्टाइल ठेवा, योग व खेळाला प्राधान्य द्या, गरिबांना मदत करा.