रमजान ईदनिमित्त देशाने अनुभवला अद्भुत धार्मिक सलोखा

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 8 h ago
राजस्थानच्या हिन्दु-मुस्लीम एकता समितीचे सदस्य नमाजींवर पुष्पवृष्टी करताना
राजस्थानच्या हिन्दु-मुस्लीम एकता समितीचे सदस्य नमाजींवर पुष्पवृष्टी करताना

 

आवाज द व्हॉईस, नवी दिल्ली

देशाची राजधानी दिल्लीतील उत्तम नगर परिसर गेल्या काही दिवसांपासून जातीय तणावाच्या छायेत होता. पण ईदच्या दिवशी याच भागाने एक नवी आशा आणि भाईचाऱ्याचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले.

होळीच्या काळात एका हिंदू तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर वातावरण भडकावण्याचे मोठे प्रयत्न झाले. ईदचा सण शांततेत पार पडण्याऐवजी तणावाचे कारण ठरेल, अशी मोठी भीती व्यक्त केली जात होती. सोशल मीडियावरील भडकाऊ मेसेज आणि काही कट्टरपंथीयांच्या हालचालींनी लोकांच्या मनात मोठी धडकी भरवली होती. ईदच्या दिवशी नमाज पठण करणाऱ्यांना लक्ष्य केले जाईल, अशीही चर्चा सुरू होती.

पण या सर्व शंका-कुशंकांच्या वातावरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा कडक पवित्रा आणि प्रशासनाची तत्परता कामी आली. याहीपेक्षा स्थानिक हिंदू आणि मुस्लिम समुदायांनी दाखवलेल्या समंजसपणामुळे द्वेषाचे हे वातावरण पूर्णपणे निवळले.

ईदच्या सकाळी उत्तम नगरमध्ये दिसलेले दृश्य केवळ आश्चर्यकारक नव्हते. ती संपूर्ण देशासाठी एक मोठी प्रेरणा ठरली. एका बाजूला संघर्षाची भीती व्यक्त केली जात होती. पण तिथेच मुस्लिम बांधवांनी सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस आणि आपल्या हिंदू शेजाऱ्यांवर फुलांचा वर्षाव करत त्यांचे जंगी स्वागत केले.

हे दृश्य म्हणजे द्वेषावर मिळवलेला प्रेम आणि भाईचाऱ्याचा मोठा विजय होता. नमाजसाठी जाणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. तिथे फक्त आनंद आणि आपलेपणा दिसत होता. सर्वसामान्य लोक कोणत्याही प्रकारच्या द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाहीत, हे यातून अगदी स्पष्ट झाले.

केवळ दिल्लीच नाही, तर देशाच्या इतर भागांमधूनही अशीच अत्यंत सकारात्मक चित्रे समोर आली. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये हिंदू बांधवांनी ईदगाहच्या बाहेर येणाऱ्या नमाजींवर फुलांचा वर्षाव केला. हे दृश्य सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. हीच भारताची खरी ओळख असल्याचे लोकांनी आवर्जून सांगितले.

उत्तर प्रदेशातील अमरोहामधूनही एक हृदयस्पर्शी चित्र समोर आले. तिथे सचिन चौधरी यांच्यासारख्या तरुणांनी नमाज पठण करून येणाऱ्यांचे फुलांनी स्वागत केले. आपल्या देशात 'गंगा-जमुनी तहजीब' (सर्वधर्मसमभाव) आजही जिवंत आहे, हे या घटनांनी सिद्ध केले. ती संपवणे इतके सोपे नाही, हेच यातून दिसून आले.

दक्षिणेकडील केरळ राज्यापासून ते उत्तर भारताच्या अनेक भागांपर्यंत भाईचाऱ्याची अनेक सुंदर उदाहरणे पाहायला मिळाली. केरळमध्ये मुस्लिम कुटुंबे आपल्या हिंदू शेजाऱ्यांच्या घरी जाऊन ईदच्या भेटवस्तू देताना दिसली. उत्तर प्रदेशातील एका शहरात एक लहान मुलगा आपल्या वडिलांसोबत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना मिठाई भरवताना दिसला.

अनेक ठिकाणी हिंदू कुटुंबांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून नमाज पठण करून येणाऱ्यांना थंड पाणी आणि सरबत वाटले. सण हा केवळ एका समुदायाचा नसून तो संपूर्ण समाजाचा असतो, हेच यातून प्रतीत झाले.

या सर्व घडामोडींमध्ये काही लोकप्रतिनिधींनीही समाज जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजकुमार भाटी ईदगाहबाहेर सर्वसामान्यांची गळाभेट घेताना दिसले. त्यांनी सर्वांना भाईचाऱ्याचा मोठा संदेश दिला. ही केवळ एक औपचारिकता नव्हती. समाजात वाढत जाणारी दरी कमी करण्यासाठी टाकलेले ते एक अत्यंत सकारात्मक पाऊल होते. राजकारणाने योग्य दिशा पकडली, तर समाजात एकता आणि विश्वास नक्कीच मजबूत होऊ शकतो, हे अशा प्रयत्नांतून दिसून येते.

सरतेशेवटी, उत्तम नगरपासून ते जयपूर आणि अमरोहापर्यंत समोर आलेल्या या चित्रांनी एक गोष्ट ठामपणे सिद्ध केली. भारताची खरी ताकद विविधतेतील एकता आणि परस्पर सलोख्यातच दडलेली आहे. अनेक अफवा, तणाव आणि द्वेष पसरवण्याचे प्रयत्न होऊनही सर्वसामान्यांनी आपला कौल शांतता, प्रेम आणि भाईचाऱ्यालाच दिला.

 

दिल्ली उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप, प्रशासनाची सतर्कता आणि जनतेचा समंजसपणा यामुळे देशाची एकता आणि शांततेला अजिबात तडा गेला नाही. ईदच्या निमित्ताने समोर आलेली ही चित्रे केवळ मनाला शांती देणारी नाहीत. भारताची ओळख ही इथल्या सामायिक संस्कृती आणि एकमेकांबद्दलच्या आदरातच वसलेली आहे, याची ती अत्यंत सुंदर आठवण करून देतात.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

 

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter