इन सर्च ऑफ वननेस : हिंदू-मुस्लिम एकता आणि अध्यात्माला जोडणारा एक भक्कम दुवा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
मुसा रझा यांचे AI निर्मित चित्र
मुसा रझा यांचे AI निर्मित चित्र

 

अमीर सुहैल वानी 

आजच्या काळात धार्मिक ओळखींचा वापर संवाद वाढवण्याऐवजी अंतर निर्माण करण्यासाठी केला जात आहे. अशा वातावरणात मुसा रझा यांचे 'इन सर्च ऑफ वननेस: द भगवद्गीता अँड द कुराण थ्रू सुफी आइज' हे पुस्तक काळाची गरज म्हणून समोर आले आहे. हे पुस्तक भगवद्गीता आणि कुराण या दोन पवित्र ग्रंथांची केवळ तुलना करत नाही, तर आध्यात्मिक ऐक्याच्या केंद्रस्थानी नेणारा हा एक प्रामाणिक अंतर्मुख प्रवास आहे. 

जग सध्या संशय आणि टोकाच्या भूमिकांमुळे विभागलेले असताना, रझा यांचा आवाज कोणावरही टीका करणारा किंवा स्वतःची बाजू सावरणारा नाही; तो शांतपणे बदल घडवून आणणारा आहे. धर्म ही सीमा आखण्यासाठी नसून, अंतिम सत्याच्या शोधात या सीमा पुसून टाकण्यासाठी आहे, याची आठवण त्यांचे कार्य करून देते. यामुळेच हे पुस्तक केवळ महत्त्वाचेच नाही, तर अनिवार्य ठरते. आपल्या धर्माचे पालन करतानाच दुसऱ्यांच्या श्रद्धेशी आपण कसे जोडले जाऊ शकतो, याचा फेरविचार करण्याचे आवाहन हे पुस्तक करते.

रझा यांचे हे कार्य एका आध्यात्मिक आठवणींच्या प्रवासासारखे सुरू होते आणि हळूहळू त्याचे रूपांतर तुलनात्मक धर्मशास्त्रात होते. इस्लामच्या चौकटीत राहूनच त्यांनी हे लेखन केले आहे. ते आपली धार्मिक ओळख सोडत नाहीत, तर ती अधिक व्यापक आणि समृद्ध करतात. हिंदू तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना त्यांचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित नसून नम्रता आणि कुतूहलाने भरलेला आहे. धार्मिक मर्यादांकडून आध्यात्मिक अनुभवाकडे होणारा हा प्रवास पुस्तकाचा सर्वात प्रभावी भाग आहे. स्वतःच्या परंपरेशी एकनिष्ठ राहून इतर ठिकाणचे सत्य कसे स्वीकारावे, या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी हा प्रवास मार्गदर्शक ठरेल.

भगवद्गीतेच्या शिकवणीत रझा यांना कुराणमधील नैतिक आणि आध्यात्मिक तत्त्वांचे पडसाद उमटताना दिसतात. हे साम्य त्यांनी उगाच ओढून-ताणून दाखवलेले नाही, तर चिंतनातून ते सहजपणे उमजले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी याकडे सुफी नजरेतून पाहिले आहे. यामुळे केवळ शाब्दिक अर्थावर न थांबता त्यांना धर्माच्या प्रतीकात्मक आणि अनुभवात्मक पैलूंकडे पाहता आले. जागतिक एकात्मता साधण्यासाठी स्वतःची ओळख पुसण्याची गरज नसते, तर ती इतकी सखोल करावी लागते की तिथून इतर सर्वांशी नाते जोडणे नैसर्गिक बनते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

या पुस्तकाचा गाभा इब्न अरबी यांच्या 'वह्दत अल-वुजूद' या सुफी सिद्धांतावर आधारित आहे. संपूर्ण अस्तित्व एकाच वैश्विक सत्याचे प्रकटीकरण आहे, असा हा विचार आहे. याच दृष्टिकोनातून रझा यांनी गीता आणि कुराण वाचले आहे. या चष्म्यातून पाहिल्यावर तात्विक मतभेद मागे पडतात आणि विविधतेखाली दडलेले आध्यात्मिक साम्य स्पष्टपणे दिसू लागते.

उदाहरणार्थ, फळाची अपेक्षा न ठेवता केलेले 'निष्काम कर्म' आणि कुराणमधील निस्वार्थीपणा व प्रामाणिकपणे केलेल्या सत्कर्माचा विचार यात विलक्षण साम्य आहे. तसेच ईश्वराचे सतत स्मरण करण्याची इस्लामिक 'झिक्र' ही पद्धत हिंदू धर्मातील 'साधना' आणि 'भक्ती' यांशी मिळतीजुळती आहे. दोन्ही मार्ग ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव सतत जागृत ठेवण्याचे काम करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'समर्पण' हा विचार दोन्हीकडे केंद्रस्थानी आहे. 'इस्लाम' या शब्दाचा अर्थच ईश्वराच्या इच्छेनुसार वागणे असा आहे, तर गीतेचा शेवटही भगवंताला पूर्णपणे शरण जाण्याच्या म्हणजेच 'शरणागती'च्या आवाहनाने होतो. अशा साम्यस्थळांतून रझा यांना धर्मातील मतभेद मिटवायचे नाहीत, तर श्रद्धा, नम्रता आणि आंतरिक बदलातून गवसणारा ईश्वराचा मार्ग प्रकाशित करायचा आहे.

भारतातील हिंदू-मुस्लिम संबंधांच्या संदर्भात या पुस्तकाचा एक महत्त्वाचा सामाजिक पैलू दिसून येतो. राजकीय वाद किंवा ऐतिहासिक तक्रारींच्या जागी रझा यांनी आध्यात्मिक पर्याय सुचवला आहे. ऐक्याचा मार्ग केवळ सत्तेच्या किंवा ओळखीच्या वादातून मिळत नाही, तर दोन्ही परंपरांमधील समान वैचारिक आणि नैतिक मुळांच्या आकलनातून मिळतो, असे ते मानतात.

या दृष्टीने पाहिले तर रझा हे कबीर आणि गुरुनानक यांच्यासारख्या भारतीय आध्यात्मिक विचारवंतांच्या वारशाचे प्रतिनिधी वाटतात. या महापुरुषांनीही धार्मिक मर्यादांना आव्हान देत ईश्वराशी थेट आणि वैयक्तिक नाते जोडण्यावर भर दिला होता. रझा यांनीही धर्माला केवळ बाह्य रूपात न पाहता त्याच्या आंतरिक सारावर लक्ष केंद्रित केले आहे. राजकीय फायद्यासाठी ओळखीचा वापर होणाऱ्या काळात त्यांची ही समन्वयाची परंपरा अत्यंत मोलाची आहे.

हे पुस्तक कोणत्याही प्रकारची दिखाऊ किंवा सक्तीची एकता लादण्याचा प्रयत्न करत नाही. उलट, खरे ऐक्य म्हणजे सर्वजण सारखे असणे नव्हे, तर 'वेगवेगळे मार्ग एकाच सत्याकडे नेतात' ही प्रगल्भ जाणीव असणे होय, असा विचार मांडते. ही बहुविधतेची चौकट प्रत्येक परंपरेचे वेगळेपण जपतानाच त्यांना एका आध्यात्मिक क्षितिजावर एकत्र आणते. यात आदर आहे आणि भेदभावाशिवाय प्रत्येकाच्या वेगळेपणाचा स्वीकार आहे.

रझा यांची लेखनशैली कोणत्याही शैक्षणिक बोजडपणापासून मुक्त आहे. त्यांनी तांत्रिक शब्दांचा वापर टाळून अत्यंत साधी आणि स्पष्ट भाषा वापरली आहे. त्यामुळे धर्मशास्त्राची विशेष माहिती नसलेल्या सामान्य वाचकांसाठीही हे पुस्तक वाचनीय झाले आहे. त्यांचे लेखन वादापेक्षा चिंतनाला अधिक वाव देते आणि वाचकाला व्यक्तिगत पातळीवर विचार करायला भाग पाडते.

पुस्तकात त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील प्रसंग, आध्यात्मिक गुरूंच्या भेटी, मनात आलेली शंका आणि त्यातून मिळालेली उत्तरे यांचाही समावेश केला आहे. यामुळे पुस्तकाला जिवंतपणा आला असून तत्त्वज्ञान आणि वास्तव जीवन यांचा सुरेख मेळ बसला आहे. अर्थात, जे वाचक सखोल शाब्दिक विश्लेषण किंवा ऐतिहासिक टीका शोधत आहेत, त्यांना हे लेखन कदाचित एकांगी वाटू शकते; कारण रझा यांनी संघर्षाऐवजी समन्वयाच्या मुद्यांवर अधिक भर दिला आहे. पण हा लेखनाचा दोष नसून लेखकाने उद्देशाशी प्रामाणिक राहून घेतलेला तो एक जाणीवपूर्वक निर्णय आहे.

धार्मिक ध्रुवीकरण वाढत असलेल्या आजच्या सामाजिक-राजकीय वातावरणात हे पुस्तक महत्त्वाची भूमिका बजावते. भारतीय उपखंडाचा आध्यात्मिक इतिहास केवळ संघर्षाचा नसून तो संवाद, परस्पर प्रभाव आणि सामूहिक शोधाचा आहे, याची आठवण हे पुस्तक करून देते. गीता आणि कुराण यांच्यातील संवादातून रझा वाचकांना पूर्वग्रह सोडून एकमेकांकडे शत्रू म्हणून नव्हे, तर सत्याच्या वाटेवरील सहप्रवासी म्हणून पाहण्याचे आवाहन करतात.

हा हस्तक्षेप महत्त्वाचा आहे कारण तो कोणावरही ओरडून किंवा वाद घालून केलेला नाही, तर अंतर्मुख होऊन केलेला आहे. हे पुस्तक कोणाला हरवण्यासाठी नाही, तर लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आहे. याद्वारे धार्मिक संवादाची एक अधिक संवेदनशील आणि दयाळू पद्धत समोर येते, ज्याची आज नितांत गरज आहे.

शेवटी, 'इन सर्च ऑफ वननेस' हे पुस्तक एका शक्यतेबद्दल आहे. ऐतिहासिक विभागणी आणि तात्विक मतभेदांच्या पलीकडे एक सखोल आध्यात्मिक सत्य अस्तित्वात असू शकते, ही ती शक्यता आहे. हे पुस्तक सर्व धार्मिक प्रश्नांची उत्तरे देण्याचा दावा करत नाही किंवा धर्मांमधील गुंतागुंत नाकारत नाही. त्याऐवजी, ते आपल्याला एकमेकांकडे पाहण्याचा आणि समजून घेण्याचा एक अधिक शाश्वत मार्ग देते. अध्यात्म, सर्वधर्म संवाद आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या विचारात रस असणाऱ्यांसाठी हे पुस्तक काळाच्या कसोटीवर उतरणारे आहे. हे केवळ बौद्धिक वाचन नसून आंतरिक परिवर्तनाचे एक आवाहन आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter