केरळ ही धार्मिक सलोख्याची प्रयोगशाळा; निवडणूक निकालांचा दाखला देत शशी थरूर यांची पोस्ट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर

 

नुकत्याच पार पडलेल्या केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. केरळमधील जनतेने जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मानुसकीला महत्त्व दिले असून, हे राज्य जातीय सलोख्याचे एक उत्तम मॉडेल असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर खरी केरळ स्टोरी सांगत जातीयवादी शक्तींना चोख प्रत्युत्तर दिले.

धर्माच्या भिंती तोडणारे निकाल
शशी थरूर यांनी X वरील आपल्या पोस्टमध्ये केरळमधील तीन विशिष्ट मतदारसंघांचा दाखला दिला आहे. त्यांनी नमूद केले की, "जातीयवाद्यांनी केरळमधील या 'स्टोरी'ची दखल घ्यायला हवी. मुस्लिम बहुल असलेल्या तवनूर मतदारसंघातून ख्रिश्चन उमेदवार व्ही. एस. जॉय विजयी झाले आहेत. हिंदू बहुल असलेल्या कलमासेरी मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार व्ही. ई. अब्दुल गफूर निवडून आले आहेत, तर ख्रिश्चन बहुल कोची मतदारसंघातून मोहम्मद शियास या मुस्लिम उमेदवाराला मतदारांनी पसंती दिली आहे."

केरळ हे सामाजिक ऐक्याचे मॉडेल
थरूर पुढे म्हणाले की, देशातील राजकारणात सध्या ओळख आणि अस्मितेच्या राजकारणाचा प्रभाव वाढत असला, तरी केरळने मात्र आपला सामाजिक सलोखा जपला आहे. केरळमधील लोक कोणत्याही व्यक्तीकडे आधी एक माणूस म्हणून बघतात आणि त्यानंतर जात किंवा धर्माचा विचार करतात. हे निकाल म्हणजे केरळमधील प्रगल्भ लोकशाहीचे आणि सर्वसमावेशक संस्कृतीचे दर्शन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

युडीएफचा दणदणीत विजय
केरळ विधानसभेच्या १४० जागांपैकी यूडीएफने (UDF) १०२ जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे. यामध्ये काँग्रेस ६३ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या विजयामुळे केरळमधील डाव्या आघाडीचे १० वर्षांचे शासन संपुष्टात आले असून राज्यात सत्तापालट झाला आहे.