रुद्रप्रयाग
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे निहंग गटाने गुरुद्वारामध्ये शिरून हिंसाचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चमोली जिल्ह्यात १६ जून रोजी झालेल्या एका संघर्षानंतर अटक केलेल्या चार निहंग सदस्यांची सुटका करण्याच्या मागणीसाठी या गटाने हे पाऊल उचलले आहे. निहंग गटाने एका भाविकाला ओलीस धरून गुरुद्वाराच्या तिसऱ्या मजल्यावर ताबा मिळवला आहे.
शनिवारी सायंकाळपासून ही घटना घडली असून, निहंग गटाचे सदस्य भाले, तलवारी आणि कुर्हाडी घेऊन गुरुद्वारामध्ये शिरले. त्यांनी गुरुद्वारा व्यवस्थापनाकडे आंदोलनासाठी ५० ते ६० खोल्यांची मागणी केली होती, परंतु व्यवस्थापनाने असमर्थता दर्शवताच त्यांनी हिंसक पवित्रा घेतला. या वेळी त्यांनी गुरुद्वारात तोडफोड केली आणि एका वृद्ध भाविकाला ओलीस धरून गच्चीवर नेले. तसेच, त्यांनी प्रशासनाला कोणत्हीया बळाचा वापर न करण्याची धमकी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच रुद्रप्रयागच्या पोलीस अधीक्षक निहारिका तोमर आणि जिल्हाधिकारी विशाल मिश्रा यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुरुद्वारा व्यवस्थापन समिती आणि पोलिसांकडून निहंग गटाशी संवाद सुरू आहे. पोलीस अधीक्षक तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चेचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून एक निहंग खाली आला आहे, तर इतरांशी चर्चा सुरू आहे.
हे निहंग १६ जून रोजी कर्णप्रयाग येथील मार्केटमध्ये पार्किंगच्या वादावरून झालेल्या मारामारीच्या घटनेच्या विरोधात आंदोलन करत आहेत. या प्रकरणात पंजाबमधील मोहाली येथील चार निहंगांना अटक करण्यात आली होती. सध्या गुरुद्वारातील 'लंगर' आणि 'अरदास' सेवा सुरळीत सुरू असून भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उत्तराखंड सरकारने दिले आहेत.