दहशतवादाविरुद्ध भारताची नवी रेडलाईन; ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त लष्कराचा सज्जतेचा पुनरुच्चार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

 

भारतीय लष्करी नेतृत्वाने ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त या मोहिमेचे वर्णन शत्रूचा डावाने झालेला पराभव आणि दहशतवादाविरुद्धची नवी रेडलाईन अशा शब्दांत केले आहे. ७ मे २०२५ रोजी पहाटे सुरू झालेल्या या ऐतिहासिक मोहिमेने केवळ दहशतवाद्यांचा खात्मा केला नाही, तर पाकिस्तानला कधीही न विसरता येणारा धडा शिकवला, असे लष्करी धुरिणांनी स्पष्ट केले.

अचूक प्रहार
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या मोहिमेची तुलना बुद्धीबळाच्या खेळाशी केली. आयआयटी मद्रास येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्हाला शत्रूची पुढची चाल माहित नव्हती, तरीही आम्ही त्यांच्या मुख्य तळांवर प्रहार केला. पाकिस्तानला कधीही वाटले नव्हते की भारत त्यांच्या इतक्या आत घुसून हल्ला करेल. ही मोहीम एका ट्रस्टेड ऑर्केस्ट्रासारखी होती, जिथे प्रत्येक सैनिकाने आणि दलाने अत्यंत समन्वयाने काम केले आणि अवघ्या २२ मिनिटांत नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले."

दहशतवादाविरुद्ध नवी रेडलाईन
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोलताना स्पष्ट केले की, पाकिस्तान भारताला हजारो जखमा देण्याचे धोरण राबवत होता, पण भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे सीमेपलीकडील दहशतवादाविरुद्ध एक नवी रेडलाईन ओढली आहे. 

जेव्हा त्यांना या मोहिमेतील नुकसानीबद्दल विचारले गेले, तेव्हा त्यांनी क्रिकेटचे उदाहरण देत म्हटले की, "जेव्हा तुम्ही एखादा कसोटी सामना 'डावाने' (Innings defeat) जिंकता, तेव्हा किती चेंडू खेळले किंवा किती विकेट्स गेल्या याला महत्त्व उरत नाही. हा विजय इतका मोठा होता."

पहलगामच्या रक्ताचा घेतला सूड
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी रात्री १:५१ वाजता 'ऑपरेशन सिंदूर'ची घोषणा केली होती. न्याय मिळाला! जय हिंद! या पोस्टसह भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी कारखान्यांचे कंबरडे मोडले.
 
८८ तास चाललेल्या या लष्करी संघर्षात भारताने आपली आक्रमक आणि निर्णायक प्रतिमा जगासमोर मांडली. लष्कराने नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भारताच्या विरोधात कृत्य करणाऱ्यांना प्रत्युत्तर नक्कीच मिळणार... ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे!"