जालन्याच्या शाळेत पाकिस्तानी गाणे लावल्याचा आरोप; प्राचार्य आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
जालन्याच्या शाळेतील विद्यार्थी नृत्य करताना
जालन्याच्या शाळेतील विद्यार्थी नृत्य करताना

 

जालना जिल्ह्यातील परतूर येथील एका शाळेच्या कार्यक्रमात कथितरित्या पाकिस्तानी गाण्याचा वापर केल्याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, संबंधित शाळा प्रशासनाने हे गाणे पाकिस्तानी नसून एका तुर्की टीव्ही मालिकेतील असल्याचे स्पष्ट केले आहे.

नेमका प्रकार काय?

मार्च २०२५ मध्ये परतूर येथील 'किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल'मध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी एका गाण्यावर नृत्य केले होते. या दरम्यान एका व्यक्तीचा फोटोही प्रदर्शित करण्यात आला होता, जो पाकिस्तानी अतिरेकी 'मुमताज कादरी' असल्याचा दावा सोशल मीडियावरील पोस्टमध्ये करण्यात आला होता. या प्रकरणावरून स्थानिक भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली होती.

शाळा प्रशासनाचा दावा

परतूर पोलिसांनी गुरुवारी मुख्याध्यापक वझीयोद्दीन सिद्दीकी आणि इतर दोघांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आणणे, गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे आणि चुकीची माहिती पसरवणे अशा गंभीर आरोपांचा समावेश आहे.

मात्र, मुख्याध्यापक सिद्दीकी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "कार्यक्रमात वापरलेले संगीत 'एर्तुग्रुल गाझी' या लोकप्रिय तुर्की टीव्ही मालिकेतील आहे. फोटोमध्ये असलेला व्यक्तीही त्या मालिकेतील एक अभिनेता आहे. काहींनी व्हिडिओमध्ये छेडछाड करून चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवली आहे," असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, नेमके सत्य काय आहे, हे तपासाअंती स्पष्ट होईल.