ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण; पंतप्रधान मोदींकडून सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी त्यांच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवरील प्रोफाईल पिक्चर्स (DP) बदलले आहेत. बरोबर एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी सुरू झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या स्मृतीनिमित्त आणि भारतीय सशस्त्र दलांच्या यशाचा गौरव करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान मोदींनी X, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनेलवरील आपले फोटो बदलून त्याऐवजी 'ऑपरेशन सिंदूर' लिहिलेले आणि तिरंगा असलेले चित्र लावले आहे. तसेच, देशातील सर्व नागरिकांनी सशस्त्र दलांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आपले प्रोफाईल फोटो बदलावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सशस्त्र दलांच्या शौर्याचा देशाला अभिमान
पंतप्रधान मोदींनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एक वर्षापूर्वी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी आपले अफाट शौर्य दाखवले होते. आपल्या लोकांवर हल्ला करणाऱ्यांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या मोहिमेमुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाच्या सशस्त्र दलांचा सार्थ अभिमान वाटत आहे. ७ ते १० मे २०२५ या कालावधीत भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल आणि बीएसएफ यांनी संयुक्तपणे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला दिले होते प्रत्युत्तर
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हे ऑपरेशन राबवण्यात आले होते. त्या हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका गाईडचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारताने दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या कठोर भूमिकेचे आणि राष्ट्रीय सुरक्षा जपण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेवर भर
पंतप्रधानांनी नमूद केले की, या मोहिमेने भारतीय सुरक्षा दलांमधील वाढती समन्वय शक्ती (Jointness) अधोरेखित केली आहे. तसेच, संरक्षण क्षेत्रातील भारताच्या आत्मनिर्भरतेमुळे राष्ट्रीय सुरक्षा किती मजबूत झाली आहे, हे देखील यातून दिसून येते. आजही भारत दहशतवाद आणि त्याची परिसंस्था नष्ट करण्याच्या आपल्या संल्पावर ठाम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.