पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलिडेस यांनी युरोप आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या वातावरणाबाबत आज चिंता व्यक्त केली. सध्याचे युग हे युद्धाचे नाही, असे आमच्या दोघांचेही स्पष्ट मत असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.
सायप्रसच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी आज क्रिस्टोडॉलिडेस यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. याशिवाय शिष्टमंडळ पातळीवरही दोन्ही देशांनी चर्चा केली. दोन्ही देशांमधील संबंध दृढ करून सहकार्य वाढविणे, हा या चर्चेचा मुख्य हेतू होता. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते. यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी म्हणाले, "क्रिस्टोडॉलिडेस यांच्याबरोबरील चर्चेदरम्यान पश्चिम आशिया आणि युरोपमध्ये असलेल्या संघर्षाच्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली. या संघर्षाचा नकारात्मक परिणाम केवळ त्या प्रदेशापुरता मर्यादित नाही.
हे युद्धाचे युग नाही, असे आमच्या दोघांचेही मत आहे. मानवता टिकवून ठेवण्यासाठी चर्चेच्या माध्यमातून तोडगा आणि स्थैर्य प्राप्त करणे आवश्यक आहे." सायप्रस दौऱ्यामुळे व्यापार, गुंतवणूक आणि इतर क्षेत्रांमधील सहकार्याला चालना मिळेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
मोदी यांना सर्वोच्च सन्मान
पंतप्रधान मोदी यांचा आज सायप्रसचा 'ग्रैंड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस-थर्ड ऑफ सायप्रस' हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव करण्यात आला. हा सन्मान भारत-सायप्रस मैत्रीला आणि भारतीयांना समर्पित करत असल्याचे मोदींनी सांगितले. सायप्रसचे पहिले अध्यक्ष आर्चबिशप मकारिओस तिसरे यांच्या नावाने हा सन्मान दिला जातो. "भविष्यातही भारत-सायप्रस मैत्री नवी उंची गाठेल, असा मला विश्वास आहे. ही मैत्री केवळ आपापल्या देशांचाच विकास साधणार नाही, तर यामुळे शांततापूर्ण आणि सुरक्षित जगासाठी योगदानही दिले जाईल," असे मोदी यावेळी म्हणाले.
'जी-७'ला उपस्थिती
पंतप्रधान मोदी आज सायप्रसचा दौरा आटोपून कॅनडात दाखल होणार आहेत. येथील कनानास्किस शहरात जी-७ गटाची परिषद सुरू झाली असून ते यात सहभाग घेणार आहेत. यावेळी ते जी-७ गटातील देशांच्या प्रमुखांशीही स्वतंत्रपणे चर्चा करतील. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टीन टूडो यांच्या काळात भारत-कॅनडा संबंध तणावग्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा होत असून मागील दहा वर्षांत ते प्रथमच कॅनडात येत आहेत. तसेच, सलग सहाव्यांदा ते जी-७ परिषदेत सहभाग नोंदवतील.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter