महाराष्ट्रात 'अशी' साजरी झाली रमजान ईद

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 17 d ago
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रमजान ईद साजरी करताना टिपलेले काही क्षण
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रमजान ईद साजरी करताना टिपलेले काही क्षण

 

देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली. महाराष्ट्रामध्येही मुस्लीम समाजाने आनंदाने आणि शांतेत ईद साजरी केली. राज्याच्या विविध भागांमधील ईद नेमकी कशी साजरी झाली झाली याची ही झलक, खास 'आवाज मराठी'च्या वाचकांसाठी
 
पुण्यात रमजान ईदचा उत्साह कायम
पुणे शहराच्या विविध भागांत रमजान ईद गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी अनेकांनी मशिदीत तर काहींनी घरात नमाज पठण केले. घरी आमंत्रित केलेल्या मित्रमंडळी व नातेवाईकांसह दुपारी शीरखुर्मा व बिर्याणीच्या आस्वाद घेण्यात आला. काही तरुण व लहान मुलांनी नवे कपडे परिधान करून थंड पेय, आईस्क्रीम खात आपली ईद पार्टी साजरी केली. कुरेशी मशीद चौकात लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य ठेवण्यात आल्याने दिवसभर मुलांनी तेथे आनंद लुटला.

‘‘सर्वधर्मीय मित्र परिवार व कुंबियासोबत सण साजरा करणे आणि गरिबांना दान धर्म करून त्यांच्यात आपला आनंद जोपासने, ही आमची ईद आहे,’’ असे लष्कर भागातील कार्यकर्ते अबू सुफियान कुरेशी यांनी सांगितले.
 
याशिवाय पुण्यातील गोळीबार मैदान परिसरात इदगाह मैदान येथे सकाळपासूनच रंगीबेरंगी कपडे घालून सुमारे चाळीस हजार मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईदच्या नमाजचे पठाण केले. देशाच्या भविष्यासाठी प्रार्थना केली. राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना, ईदगा ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ईद मिलन’ कार्याक्रमात सर्व मुस्लिम बांधवांचे गुलाब आणि शिरखुर्मा देत रमझान ईद मोठ्या उत्साहाने साजरी करणात आली.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार संजय काकडे, प्रमुख पाहुणे पोलिस आयुक्त रितेशकुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, आमदार रवींद्र धंगेकर, सुनील कांबळे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आदी उपस्थित होते. या प्रसंगी दिवंगत खासदार गिरीश बापट आणि आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ताहेर कासी आणि ईदगाह चे अध्यक्ष जैनतुल काझी यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. 
 
पिंपरी बुद्रुक येथे मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान ईद हा सण परिसरात सामुहिक नमाज पठण, एकोपा, भाईचारा पाळत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एकमेकांना आलिंगन देत शिरखुर्मा व गुलगुले खाऊ घालून तोंड गोड करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीतून सर्वांची सुटका व्हावी, अशी सामुहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली.
 
यावेळी मौलाना तय्यब शेख यांच्यासह समाज बांधवांनी नमाज पठण करून दुष्काळ निवारणासाठी सामुहिक प्रार्थना केली. बावडा येथे मौलाना अब्दुल रिजवी यांच्यासह नमाज पठण करण्यात आले. यावेळी परीसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
लुमेवाडी येथील ईदगाह मैदानावर हाफीज कारी असगरअली यांनी नमाज पठण करून उपस्थित समाज बांधवांना नमाज व कुराणचे महत्त्व विशद केले. तसेच हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपुरी बाबा यांच्या दर्गाहमध्ये समाज बांधवांनी सामुहिक प्रार्थना केली. देश व मानव जातीच्या कल्याणासाठी व उत्कर्षासाठी शांतता राखत काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
 
 
नरसिंहपूर परिसरात मुस्लिम बांधवांनी सर्व धर्मातील नागरिकांना शिरखुर्मा व गुलगुलेचा फराळ देवून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तर आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, प्रशांत पाटील, महादेव घाडगे, महारूद्र पाटील, श्रीमंत ढोले, संग्रामसिंह पाटील आदी मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
 
पिंपरी चिंचवड भागातील तळेगाव दाभाडे येथे परिसरातील मुस्लिम बांधवांनी सामुदायिक प्रार्थना करीत ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद मोठ्या उत्साही वातावरणात गुरुवारी साजरी केली. गाव भागातील ईदगाहवर सकाळी मौलाना सिकंदर-ए-आजम यांनी ईद नमाज पठणाचे नेतृत्व केले. यावेळी मुस्लिम बांधवांनी भक्तिभावाने नमाज अदा केली.
 
यंदा गावभागातील जामा मशिद ट्रस्टने घेतलेल्या निर्णयानुसार रमजान ईदपासून मुस्लिम समाजातील गोरगरीब, गरजू कुटुंबांसाठी कायमस्वरूपी मदतीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ट्रस्टी रशिदभाई सिकीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो राबविण्यात येणार असून मुलामुलींचे लांबलेले विवाह, विधवा परितक्ता महिलांच्या समस्या, कौटुंबिक आर्थिक रोजगार किंवा कायदेशीर बाबींबाबत सेवाभावी मोफत सेवा देण्याची घोषणा मौलाना सिकंदर-ए-आजम यांनी नमाज पठणानंतर संबोधित करताना केली. 
 
यावेळी माजी उपनगराध्यक्ष गनिमियॉं सिकीलकर, गफूरभाई मुलाणी, बाबूलाल नालबंद, अमीन खान, इर्शाद अन्सारी, समीर नालबंद, रफिक सिकीलकर, राजू आत्तार आदी उपस्थित होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पाटील आणि सहाय्यक पो. नि. सुरेश यमगर यांनी गुलाब पुष्प देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलिस उपनिरीक्षक भारत वारे यांच्यासह प्रशांत वाबळे, बाबाराजे मुंडे, अमोल गोरे, विकास तारू, आकाश भालेराव, अर्चना पानसरे, वैशाली बोरकर आदी यावेळी उपस्थित होते.
 
तसेच इंदापूर तालुक्यातील जामा मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी रमजान ईद निमित्त नमाज पठण केले. रमजान ईदच्या नामाजचे पठण मौलाना मुजफ्फर हुसेन खान यांनी केले. यावेळी मौलानांनी ईद-उल-फित्रची मुस्लिम बांधवांना माहिती दिली. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर मुस्लिम बांधवांनी शीरखुर्म्याचे वाटप केले.
 
मुस्लिम जमातीचे अध्यक्ष पैगंबर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष तय्यब शेख, नूरखान देशमुख, रुस्तुम पठाण, बशीर शेख, शौकत शेख, खुदा शेख, रहेमान शेख, जहांगीर पठाण, फिरोज शेख, सलीम पठाण, अलीम पठाण, सलीम शेख, जावेद शेख, अल्ताफ पठाण, बालम पठाण, इकबाल शेख, मलंग पठाण, अलफाज पठाण, सर्फराज देशमुख, सलीम शेख, कव्वाल असलम शेख, युनूस शेख, आयुब शेख यावेळी उपस्थित होते. रमजान ईद साठी पंधारवाडी, अवसरी, बेडसिंग, रामवाडी, बाभूळगाव, काटी, शेटफळ हवेली या परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
दापोडी परिसरातही रमजान ईद सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामूहिक नमाज पठण करण्यात आले. सर्व समाज बांधवांनी मुस्लिम बांधवांना मिठाई व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. 
 
यावेळी मौलाना कारी इकबाल उस्मानी, उमेर गाजी, इरफान शेख, मौलाना झाद इकबाल, इरफान शेखअफसर हरमन शेख सलीम, हैदर शेख, मज्जिद ए अमर फारुख, सिद्दीश मोलाना इम्तिहास अन्सारी, समीर नदाफ डाफर शेख, इशाद शेख, जाहीर शेख, कब्रस्तान मजशीद येथे मौलाना जाकीर शेख, साहिल शेख, अमजद शेख, हुसेन तांबोळी आदी समाज बांधवांनी एकत्रित नमाज पठण करून रमजान उत्साहात साजरा केला.
 
येथील परिसरातील मुस्लिम बांधवांनी सामुदायिक प्रार्थना करीत ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद मोठ्या उत्साही वातावरणात  साजरी केली. गाव भागातील ईदगाहवर सकाळी मौलाना सिकंदर-ए-आजम यांनी ईद नमाज पठणाचे नेतृत्व केले. यावेळी मुस्लिम बांधवांनी भक्तिभावाने नमाज अदा केली.
 
बुधवारी चंद्रदर्शन होताच आणि गुरुवारी मुस्लिम बांधवांनी पिंपरी चिंचवड परिसरात ‘ईद-उल-फित्र’ उत्साहात साजरी केली. रमजान ईदनिमित्त रात्री उशिरापर्यंत बाजारपेठा सुरू होत्या. ईदनिमित्त शहरातील विविध ईदगाह व मशिदी विद्युत रोषणाईने उजळून निघाल्या होत्या. नवीन कपडे, पारंपारिक वेशभूषा, शिरखुर्म्याचा आस्वाद आणि अत्तराचा सुगंध...अशा वातावरणात रमजानचा उत्साह गुरुवारी सकाळपासूनच शहरात दिसत होता.
 
चिंचवड ईदगाह मैदानावर चार हजारांहून अधिक मुस्लिम बांधवांनी सकाळी आठ वाजता ईदची नमाज अदा केली. एकात्मता, विश्‍वशांतीसाठी दुवा मागण्यात आली. नमाज अदा करून एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’ च्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, शहरात मोठा पोलिस बंदोबस्त होता. विविध चौकांमध्ये तसेच प्रमुख रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये पोलिस कर्मचारी तैनात होते.
 
असे झाले नमाजपठण
शहरातील ईदगाह, मशिदींमध्ये ‘ईद’ची नमाज अदा करण्यात आली. या वेळी हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. सकाळी आठच्या सुमारास शहरातील सर्वच मशिदींत मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. नमाज पठणापूर्वी धर्मगुरूंचे प्रवचन झाले. शहरातील सर्वच मशिदींमध्ये गर्दी झाल्याने दोन वेळा नमाजपठण करण्यात आले. सामुदायिक नमाजपठण करून पवित्र रमजान महिन्याची सांगता झाली. 
 
भोसरी, घरकुल, निगडी, चिंचवड, आकुर्डी, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, पिंपरी, काळेवाडी, नेहरूनगर, कासारवाडी, दापोडी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, रावेत परिसरात ईदची नमाज सकाळी ८ते १० दरम्यान विविध मशिदीत, मदरचा ईदगाह मैदानात धर्मगुरू मुफ्ती, मौलाना, हाफीज साहब यांनी मुस्लिम बांधवांना नमाज पढविला. 
 
चिंचवडगाव-अलमगीर शाही मशीद, मौल्लाना मिनहाज असरफी, मौल्लाना इनामुल हक, चिंचवड स्टेशन-मजीद ए अम्मार-हाफीज मौन्नूद्दीन, मोहननगर-मजीद ए हिदायतूल मुस्लमीन-हाफीज वसीम, विद्यानगर-मजीद ए अक्सा-मौल्लाना इम्रान मोन्नुद्दीन, आकुर्डी-मजीद ए मदिना-मुफ्ती अबिद , आकुर्डी-मजीद ए अक्सा-मुफ्ती अब्दुल कादीर, काळभोरनगर-मजीद ए फारूकीया-हाफीज लायक, बिजलीनगर-मजीद ए नूरईलाई-मौल्लाना अब्दुल सकूर, वाल्हेकरवाडी-मजीद ए बीसाल-मौल्लाना खुर्शीद, चिंचवडेनगर-मजीद ए हुसैनी-मौल्लाना आखीब, दळवीनगर-मजीद ए बीसाल-हाफीज जैन्नूद्दीन, चिंचवडगाव-मजीद ए ईदगाह-मौल्लाना मिनाज यांनी नमाज पढविला. 
 
दरम्यान नमाज पठनानंतर सर्व धर्मीय समाज बांधवांनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांचे इतर बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी लहान मुलांची मोठी उपस्थिती होती. या बालकांनी एकमेकांची गळाभेट घेत उत्साहात ईदच्या शुभेच्छा दिल्या.
 
पोलिस आयुक्तांकडून ईदच्या शुभेच्छा
पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी चिंचवड येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक सलोखा वाढविण्यावर सर्वांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त शिवाजी पवार उपस्थित होते.
 
अत्तराचा दरवळला सुगंध
ईदच्या खरेदीत अत्तराचाही मोठा वाटा असतो. नवीन कपड्यांसह वेगवेगळ्या अत्तरांचा सुगंध विशेष असतो. ईदच्या नमाजासाठी मुस्लिम बांधव ईदगाहमध्ये एकत्र येतात. ईदसाठी नवीन कपडे, अत्तराचा सुगंध लावण्याची (सुन्नत) प्रथा आहे. ईदच्या निमित्ताने नवीन कपड्यामधून अत्तरचा सुंगधही दरवळला होता.
 
महिलांना साड्या वाटप
निगडी यमुनानगर येथील शेख बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने १२२० गरजू महिलांना शिरखुर्मा कीट आणि ३०० महिलांना साडी वाटप करण्यात आले. पाच दिवस आयोजित कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष बाबा शेख, समीर शेख, हुसेन जमादार, जरिना खान, चिखली शाही जामा मस्जीदचे फिरोज शेख, जुलूस समितीचे अध्यक्ष युसूफ शेख, आम आदमी पक्षाच्या महिलाध्यक्ष सरोज कदम, स्मिता पवार उपस्थित होते. आलम शेख व समीर शेख यांनी आभार मानले.
 
शिरखुर्म्याचा आस्वाद
रमजान ईदला शिरखुर्म्याचे विशेष महत्त्व असते. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या व्यक्तींना पाहुणचार म्हणून ईदचा खास मेनू शिरखुर्मा देण्यात आला. दूध आणि सुकामेवा एकत्र करून तयार केले जाणाऱ्या या खाद्यपदार्थाचा तसेच शेवयांचा सुगंध गुरुवारी सकाळी दरवळलेला जाणवला. गोडधोड पदार्थांबरोबरच बिर्याणी, पुलावचा आस्वादही अनेकांनी घेतला. लहानग्यांना मोठ्यांकडून ‘ईदी’ देण्यात आली. 
 
रमजानचे कठीण उपवास पूर्ण करणाऱ्या बालकांचे खास कौतुक झाले. ईदनिमित्त नातेवाइकांच्या भेटीगाठी, ईदमिलन आदी कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. पाऊस असूनही राजकीय कार्यकर्त्यांतर्फे ठिकठिकाणी फुलांचे वाटप करण्यात येत होते.
 
सोशल मीडियावर शुभेच्छा
सोशल मीडियावर ‘ईद मुबारक’चा वर्षाव बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन घडल्यापासून तर गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावर ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. अनेकांनी मोबाईलद्वारे ईदच्या शुभेच्छा दिल्या. एकापेक्षा एक सरस वॉलपेपर्स, चित्रफितींद्वारे ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली जात होती. एकूणच शुभेच्छांच्या संदेशांची गर्दी व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर दिसून आली.
 
इबादतचा महिना
इस्लाम धर्मातील महत्त्वाचा व इबादतचा महिना म्हणजे रमजान होय. या महिन्यात इस्लाम धर्मीय महिनाभर अन्न, पाण्याचा त्याग करून सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत रोजा करतात. सोबतच मशिदीमध्ये पाच वेळेची नमाज अदा करण्यात आली. या महिन्याची विशेष नमाज १३ व्या रात्री अदा होते. नकळत झालेल्या चुकांची क्षमा मागण्याचा हा महिना आहे. या महिन्यात वार्षिक उत्पन्नातून २.५ टक्के हे जकात म्हणून गरीब, गरजू लोकांना दान करण्याचा नियम आहे.
 
मुंबईमध्ये १४०० हून अधिक ठिकाणी साजरी झाली ईद
बृहन्मुंबईच्या पोलीस आयुक्त्यांच्या 'एक्स' या अधिकृत खात्यावरून मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच संपूर्ण शहरात १४०० हून अधिक ठिकाणी नमाज पठन झाल्याचे सांगितले. तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे व सर्व मुंबईकरांचे अभिनंदन केले आणि  आभार देखील मानले. मुंबईच्या सुरक्षेसाठी यापुढेही तुमचे असेच सहकार्य मिळत राहील याची असे आवाहनही केले.
 
मुंब्रा व कळवा परिसरातही रमजान ईद उत्साहात साजरी झाल्याचे पाहायला मिळाले. मुंब्रा व कळव्यात नमाज अदा झाल्यावर रोजा व सण साजरा करण्यासाठी बाजारात गर्दी लोटली होती. परिसरातील मशिदींना विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी रस्त्यात व चौकात गर्दी केली होती. 
 
मुंब्र्यातील सिमला चौक, कौसा, मुंब्रा कॉलनी, मुंब्रा रेल्वे स्थानक, कळवा नाका, टाकोळी परिसरात ठिकठिकाणी सरबत, पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच नवीन कपडे खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. कपडे, फळे, मिठाई, सुगंधी अत्तर खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती. काही ठिकाणी बदाम पिस्त्यापासून तयार केलेल्या शिरखुर्मा व खिरीचे वाटप केले.
 
यासोबतच पवित्र रमजान ईद सण भिवंडी शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सात वाजल्यापासून विविध मशिदी व मदरशांमध्ये लाखो मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज अदा केली.
 
शहरातील ईदगाह मैदानासह तब्बल १०५ मशिदींमधून सामूहिक नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती. सर्वात शेवटी कोटरगेट येथील सुन्नी जामा मस्जिद येथे हजारो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा करण्यात आली. नमाजनंतर सर्व भारतीयांसाठी दुवा करण्यात आली. आबालवृद्ध मुस्लिम बांधवांनी या वेळी एकमेकांना आलिंगन देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. 
 
ईद सणानिमित्त पोलिसांच्या वतीने कोटरगेट मशीद येथे अतिरिक्त पोलिस आयुक्त विनायक देशमुख, पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी, पराग म्हणेरे यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात रमजान ईददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भिवंडी परिमंडळ - २ चे पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
 
संभाजीनगर परिसरात हजारो मुस्लिमांनी शांततेत अदा केली ईदची नमाज 
पैठण तालुक्यातील आडूळ येथे ११ एप्रिल रोजी रमजान ईद ( ईद- उल - फिञ ) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी आठ वाजता येथील जामा मस्जीद येथे सर्व मुस्लिम समाज बांधव एकञ आल्यानंतर साडे नऊ वाजता येथील ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांनी सामूहिक ईद उल फिञ ची विशेष नमाज अदा केली.
 
मुस्लीम समाज बांधवांनी ईद ची नमाज अदा केल्यानंतर येथील हिंदु समाज बांधवांनी मुस्लीस समाज बांधवांची गळाभेट घेवु शुभेच्छा दिल्या तर मुस्लीम समाज बांधनांनी हिंदु समाज बांधवांना घरी बोलावुन शुर्खुम्याची मेजवानी केली दिवसभर हे चिञ आडुळ परिसरात पहावयास मिळाले.
 
यावेळी बयान (प्रवचन) मुप्ती आलीम तांबोळी, नमाज पठण व दुआ मौलाना रिजवान मनियार तर खुदब्याचे पठण मौलाना रियाज शेख पठण यांनी केले. तेथील जेष्ठ नागरीक तथा माजी सरपंच रुस्तुमराव वाघ, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शुभम पिवळ, पोलीस पाटील भाऊसाहेब पिवळ, राजेंद्र वाघ, विजय वाघ, नारायण पिवळ, अशोक भावले, माजी सरपंच भाऊसाहेब कोल्हे, सरपंच तुळशीराम बताडे, आप्पासाहेबअण्णा वाघ, रामुनाना पिवळ, शिवलाल राठोड, पोलीस पाटील अप्पाराव भावले यांच्या सह इतर शेकडो हिंदु समाज बांधवांनी येथील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
 
ईदगाह मैदानावर पाचोड पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक ज्ञानेश्वर राडकर, बिट जमादार जगन्नाथ उबाडे, रणजितसिंग दुलत सह कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता. आडूळ सह रजापूर, एकतुनी, ब्राम्हणगांव, पांढरी पिंपळगाव, घारेगाव, पारुंडी आदी ठिकाणी ईद शांततेत साजरी करण्यात आली.
 
नाशिकमध्ये अदा करण्यात आला ईदचा शुक्राणा  
नाशिक शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली. येथील पोलिस कवायत ईदगाह मैदानावर झालेल्या मुख्य नमाजपठणात लाखाहून अधिक मुस्लीम बांधव सहभागी झाले. येथील नमाजपठण दरम्यान एका युवकाने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पॅलेस्टिनी ध्वज फडकावल्याने खळबळ उडाली. साध्या वेषातील पोलिसांनी या तरुणाला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाची मानसिकता पाहून तुर्त कारवाई टाळण्यात आली.
 
ध्वज फडकावल्याच्या या प्रकारामुळे नमाजपठणाला काहीसा गालबोट लागला. शहरातील अन्य भागातील तेरा वेगवेगळ्या मैदानांवर सामुहिक नमाजपठण पार पडले. या दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने येथे तळ ठोकून होते. 
 
पोलिस कवायत ईदगाह मैदानावर आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी नमाज पढविली. नमाज पठण व दुवा झाल्यानंतर आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सोशल मिडीयाच्या गैरप्रकारावर व आत्महत्यांच्या घटनांवर प्रकाशझोत टाकत नाराजी व्यक्त केली.
 
तरुण पिढी मोबाईलच्या नादी लागून बरबाद होत आहे. त्यापासून सावध राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल म्हणाले, की अल्लाहच्या दरबारात आपण ईद उल फित्रची नमाज अदा केली आहे. आपण ईदचा शुक्राणा अदा करण्यासाठी आलो आहोत असेही त्यांनी सांगितले.
 
आगामी निवडणुकीत प्रत्येकाने मतदान करुन आपण हिंदुस्थानी असल्याचे कर्तव्य बजवावे असे आवाहन केले. सीएए व एनआरसी बद्दल नाराजी व्यक्त करतांना हा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या घोषणेला छेद देणारा असल्याचे सांगितले. देशप्रेमी म्हणवून घेणारे देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात आणून संविधानाला नख लावू पाहत आहेत असा आरोप करतांनाच मुस्लीमांचा त्यात कुठलाही सहभाग नाही ही समाधानाची बाब असल्याचे सांगितले.
 
शहरातील भूमाफिया १२ बाय २५ च्या भुखंडांची अवैध विक्री यातील गैरप्रकारावर त्यांनी टिका केली. हा गरीबांना लुटण्याचा प्रकार आहे. बिनशेती जमीन खरेदी करु नका. नशेपासून दुर रहा. एका रात्रीतून श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहू नका. मोबाईलपासून दूर रहा. कर्जाच्या विळख्यात व अनैतिक संबंधात अडकू नका असा सल्ला त्यांनी दिला.   
 
सकाळी साडेआठला मुख्य नमाजपठण पार पडले. यासाठी पहाटे सहापासून मुस्लीम बांधवांनी पोलिस कवायत मैदानावर येण्यास सुरुवात केली होती. या मैदानाकडे येणारे सर्व जोड रस्ते बॅरेकेटींग लावून बंद करण्यात आले होते. मुख्य रस्त्यासह पोलिस कवायत मैदानावर चोख बंदोबस्त होता.
 
राष्ट्रीय एकात्मता व शांतता समिती, पोलिस व महसूल प्रशासनातर्फे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांचा सत्कार करण्यात आला. नमाज पठणानंतर मुस्लीम बांधवांसह हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुख्य नमाजपठणानंतर घरोघरी जाऊन मुस्लीम बांधवांनी शिरखुर्मा व विविध खाद्यपदार्थांच आस्वाद घेतला.
 
आजपासून आगामी तीन दिवस शहरातील यंत्रमागाचा खडखडाट सणाच्या पार्श्वभूमीवर बंद असेल. खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल, उद्यान, सिनेमागृहांमध्ये आज मोठी गर्दी होती. अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबिरसिंह संधू, सचिन गुंजाळ आदींसह विविध पोलिस ठाण्यांचे निरीक्षक परिस्थितीवर लक्ष ठेवून दिवसभर गस्त घालत होते.
 
कोकणात सलोख्याची ईद साजरी
रायगड जिल्ह्यातील उरण या उपशहरात मोठ्या उत्‍साहात ईद साजरी करण्यात आली. यावेळी हजारो मुस्‍लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.यादरम्यान शहरात चोख पोलिस बंदोबस्‍त ठेवण्यात आला होता. तर हिंदू बांधवांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील ईदमध्ये सहभागी होऊन मुस्‍लिम बांधवांना शुभेच्‍छा दिल्‍या.
 
हिंदू आणि मुस्लिम ऐक्याची भावना तसेच जातीय सलोख्याचे ऋणानुबंध प्रामुख्याने उरणमध्ये जपले जात आहेत. मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना अगदी शांततेत पार पडला.
 
एका महिन्याच्या उपवासानंतर पवित्र रमजानसाठी मुस्लिम बांधवांना समाजातील विविध घटकांकडून शुभेच्छा देण्यात आल्‍या. तसेच उरणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनीही पोलिसांतर्फे मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. उरण शहरासह परिसरात असलेल्‍या तीन मस्जिदमध्ये सुमारे ४,५०० च्या वर मुस्‍लिम बांधवांनी नमाज अदा केला. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
याशिवाय रायगड जिल्ह्यातील रोहा या तालुक्यातही रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. इस्लाम धर्मातील शवाल महिन्याच्या पहिल्या तारखेला सर्वत्र रमजान ईद साजरी केली जाते.
 
रमजानमध्ये महिनाभर मुस्लिम बांधव व भगिनी उपवास ठेवतात; तर शेवटच्‍या १० उपवासादरम्‍यान सर्वत्र इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. या दरम्यान कपडे, सोने, सुका मेवा खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची झुंबड उडते. 
 
यंदा रमजान महिन्याच्या निमित्ताने बाजारात महिन्याभरात लाखो रुपयांची उलाढाल झाल्‍याचे सांगण्यात आले. ईदच्या अनुषंगाने रोहे तालुक्यासहित संपूर्ण रायगड जिल्ह्यात पहाटे साडेसहा वाजल्यापासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत प्रत्येक मशीद व ईदगाहमध्ये सामुदायिक नमाज करण्यात आली. त्‍यानंतर मशीदच्‍या इमाम (मौलवी) कडून सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

यांत रोहा खालचा मोहल्ला जामे मस्जिद अध्यक्ष हाफिज एजाज किरकिरे, वरचा मोहल्ला जमात अध्यक्ष मुजीब आलेकर, अष्टमी जमात अध्यक्ष शफी पानसरे, अहले हादिस जमात अध्यक्ष मौलाना मसरूर अलम, मिल्लत नगर अध्यक्ष रज्जाक तुळवे, सर्व जमातीचे पदाधिकारी व सर्व मुस्लिम जमातीचे ट्रस्टी यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 
 
रोहे-अष्टमी शहरासह कोकबन, न्हावे, सुडकोली, खैरे खुर्द, चांडगाव, कोलाड, नागोठणे, बेणसे आदी गावात ईद उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. तसेच या वेळी पोलिस बंदोबस्‍त चोख ठेवण्यात आला होता. पोलिसांनीदेखील मुस्‍लिम बांधवाना ईदच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.
 
कोल्हापुरात विश्वशांती प्रार्थनेने साजरी केली रमजान ईद
कोल्हापूरमध्ये रमजान ईदनिमित्त मुस्लिम बोर्डिंगसह शहरातील विविध मशीद आणि दर्ग्यांमध्ये सामूहिक नमाज पठण झाले. यानिमित्ताने सर्वत्र राष्ट्रीय एकात्मता आणि विश्वशांतीसाठी प्रार्थना झाली. मुस्लिम बोर्डिंग मैदानावर मुफ्ती इरशाद कुन्नुरे, हाफीज आकिब म्हालदार, मौलाना राहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई आदींनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
 
मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी स्वागत केले. संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर यांनी आभार मानले. उपाध्यक्ष आदिल फरास, पापाभाई बागवान, लियाकत मुजावर, जहॉँगीर अत्तार, रफीक शेख, रफीक मुल्ला, फारुख पटवेगार, अल्ताप झांजी, मलिक बागवान आदींच्या उपस्थितीत शिरखुर्म्याचे वाटप झाले. यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक अजय टिके, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पोवार, विजय देवणे, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, रमेश पोवार, बापूसाहेब मुल्ला, मासिर धारवाडकर आदी उपस्थित होते.
 
गडहिंग्लज जिल्ह्यातील महागाव, नूल, हलकर्णी, कडगाव, नेसरी या तालुक्याच्या ठिकाणीही उत्साहात ईद साजरी झाली. गेला महिनाभर शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या पवित्र रमजान महिन्याचा ईदने काल समारोप झाला. सकाळी वडरगे मार्गावरील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. यावेळी विश्वशांतीसाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. यानंतर दिवसभर शुभेच्छांची देवाण-घेवाण सुरू होती.
 
गेला महिनाभर रमजानचे रोजे सुरू होते. १० एप्रिलला झालेल्या चंद्रदर्शनामुळे ११ एप्रिलला ईद निश्चित झाली होती. गेला आठवडाभरापासून ईदची तयारी मुस्लिम बांधवांकडून सुरू होती. ईदच्या दिवशी पहाटेपासूनच घरोघरी लगबग सुरू झाली. महिला सकाळपासून भोजनाच्या कामात गुंतल्या. मुले, युवक आणि पुरुषांनी सकाळी नऊ वाजता नमाजसाठी ईदगाह मैदान गाठले. नमाज पठणानंतर विश्वशांती, सुख आणि समृध्दीसाठी प्रार्थना झाली. मौलाना मेहमूद रजा यांनी खुतबा पठण केले.
 
यानंतर मुस्लिम बांधवांनी गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. यांनी नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. आम्ही गडहिंग्लजकर संघटनेतर्फे ईदगाह मैदानावर सर्वांना शुभेच्छा दिल्या. दिवसभर शुभेच्छांचा हा सिलसिला सुरू होता. शिवसेना शहरप्रमुख संतोष चिकोडे आणि सहकाऱ्यांनी जिलेबी वाटप केले. तालुक्यातील ग्रामीण भागासह महागाव, हलकर्णी, नूल, कडगाव, नेसरी परिसरातही सकाळी नमाज पठण झाले.
 
हलकर्णी येथेही रमजान ईद उत्साहात झाली. चंद्र दर्शनानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सकाळी येथे इदगाह मैदानात ईद-उल-फित्र सामुदायिक नमाज पठण केले. हाफिज मोहम्मदमोसीन रजा आणि हाफिज मोहम्मद मकानदार यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्य, समृद्धी, शांतता नांदू दे, देशावर कोणतेही संकट न येवो, अशी सामुदायिक प्रार्थना केली. नमाज पठनानंतर गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हाफिज मोहम्मद मकानदार, मुस्लिम सुन्नत जमात अध्यक्ष अलीसाहेब कादरभाई, उपसरपंच सलीम यमकनमर्डी, शकील पट्टणकुडी, नूर मकानदार, नजीर बागवान आदी उपस्थित होते.
 
आजरा तालुक्यातील साळगाव, उत्तूर, हरपवडे, बहिरेवाडीमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी झाली. मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर आज सकाळी नऊ वाजता नमाज अदा केली. एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. विश्वशांतीसाठी दुआ केली.
 
महिनाभर मुस्लिम बांधवांनी रमजानचे रोजे ठेवले होते. सकाळी नऊ वाजता ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने जमले होते. त्यांनी एका रांगेत उभारून ईदची नमाज अदा केली. युसुफ तकिलदार यांनी नमाज पठण केले. तैयब मणेर यांनी खुतबा पठण केले. ईदनिमित्त बाजारपेठ सजली होती.
 
सलोखा, सद्‌भावना टिकवण्याचा संकल्प
हिंदू, ख्रिश्चन व अन्य धर्मीयांकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. सामाजिक ऐक्य कायम ठेवून सलोख, सद्‌भावनेबरोबर एकोपा टिकवण्याचा संकल्प केला. संभाजी पाटील, अभिषेक शिंपी, संजय सावंत, रवी भाटले, महेश पाटील, नारायण कांबळे यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
 
अशा प्रकारे महाराष्ट्रातील कोट्यावधी मुस्लिमांनी अतिशय शांतेत आणि उत्साहात रमजान ईद साजरी करत प्रेम, बंधुभाव आणि सौहार्द यांचा संदेश दिला.
 
(संकलन : पूजा नायक)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

 Awaz Marathi WhatsApp Group 

Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter