भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली. या बैठकीत तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर सविस्तर चर्चा झाली. भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक भागीदारी "दिवसेंदिवस अधिक बळकट होत जाईल," असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला.
जयशंकर मंगळवारी (१६ डिसेंबर २०२५) दोन दिवसांच्या दौऱ्यावर इस्रायलमध्ये दाखल झाले. या दौऱ्यात त्यांनी सुरुवातीला इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्वोग यांची भेट घेतली. तसेच त्यांचे इस्रायली समपदस्थ गिडॉन सार आणि अर्थ व उद्योग मंत्री निर बरकत यांच्याशीही चर्चा केली.
पंतप्रधानांच्या शुभेच्छा दिल्या
त्यानंतर दिवसाच्या उत्तरार्धात त्यांनी पंतप्रधान नेतन्याहू यांची भेट घेतली. या भेटीबद्दल माहिती देताना जयशंकर यांनी 'एक्स'वर पोस्ट केली. ते म्हणाले, "आज संध्याकाळी जेरुसलेममध्ये इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांची भेट घेतल्याबद्दल खूप आनंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांना शुभेच्छा दिल्या. तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, कौशल्य आणि टॅलेंट, कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर आम्ही चर्चा केली."
ते पुढे म्हणाले, "प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरील त्यांचे विचार जाणून घेणे महत्त्वाचे होते. मला विश्वास आहे की आपली धोरणात्मक भागीदारी दिवसेंदिवस अधिक बळकट होत जाईल." पंतप्रधान नेतन्याहू यांनीही सोशल मीडियावर या भेटीची दखल घेत बैठकीचे फोटो शेअर केले आहेत.
नेतन्याहूंच्या भारत दौऱ्याची तयारी
पंतप्रधान नेतन्याहू यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्याची तयारी सुरू असतानाच जयशंकर यांची ही भेट झाली आहे. नुकतेच पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांचे फोनवर बोलणे झाले होते. त्यानंतर इस्रायली नेत्याने सांगितले होते की, ते दोघे "लवकरच भेटणार आहेत."
अबू धाबीवरून थेट इस्रायलला
जयशंकर अबू धाबीहून तेल अवीवला पोहोचले. अबू धाबीमध्ये त्यांनी प्रतिष्ठित 'सर बानी यास फोरम'मध्ये सहभाग घेतला होता. तसेच १५ डिसेंबर रोजी झालेल्या १६व्या भारत-युएई संयुक्त आयोगाच्या बैठकीला आणि ५व्या भारत-युएई धोरणात्मक संवादालाही ते उपस्थित होते.