राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, तर दुसरीकडे अवकाळी

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 16 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका वाढत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वादळी पावसाचे ढग अजून दूर झाले नाही, तेच राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागलाय. मालेगाव येथे देशातील उच्चांकी म्हणजेच ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात अवकाळीमुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यामध्ये उकाडा वाढण्याची शक्यता आहे. राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील २४ तासांत सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या भागात अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

पुणे जिल्ह्यात उपनगरांसह आता शहराच्या मध्यवर्ती भागातही कमाल तापमान 40 अंशांवर पोहचले आहे. रविवारी शिवाजीनगर परिसरात ४० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हडपसर येथे सर्वाधिक ४१.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.अवकाळी पावसामुळे राज्यातील बहुतांश भागातील कमाल तापमानात सहा ते सात अंशाने घट झाली होती.

मात्र, मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानावर फारसा परिणामा न झाल्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. गेल्या २४ तासांत कमाल तापमानात आणखी वाढू लागली आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील कमाल तापमान ३८ ते ३९ अंशांच्या आसपास होते. मुंबईत हवामान कोरडं राहणार असून तापमान वाढीची शक्यता आहे.

१६ एप्रिल आणि १७ एप्रिलला आयएमडीने उस्मानाबाद, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात अवकाळी पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.बंगालच्या उपसागरापासून ईशान्य भारतापर्यंत नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. १६ एप्रिल आणि १७ एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे.