भारतीय बेटांवरही चिनी बलूनच्या घिरट्या?

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
चिनी बलून
चिनी बलून

 

नवी दिल्ली: चिनी बलूनने अमेरिकी अवकाशामध्ये घातलेल्या घिरट्या जगभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या पण साधारणपणे वर्षभरापूर्वी रणनितीकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या भारतीय बेटांभोवती देखील असाच प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. सिंगापूरला लागून असलेल्या भारतीय बेटांवर येथील स्थानिकांनी अवकाशामध्ये चिनी बलूनसदृश्य वस्तू पाहिल्याचे उघड झाले आहे. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा स्थानिकांना त्याची कल्पना आली नव्हती. अंदमान आणि निकोबार बेटावर पर्यटनासाठी गेलेल्या शेकडो पर्यटकांनी या बलूनची छायाचित्रे टिपून ती चक्क सोशल मीडियामध्ये व्हायरल देखील केली होती. या प्रकारानंतर भारतीय संरक्षण संस्था खडबडून जाग्या झाल्या आहेत.

बंगालच्या खाडीमध्ये असलेल्या भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्यांच्या स्थळापासून ही बेटे अगदी जवळच आहेत. भारताचा चीन आणि उत्तर आशियायी देशांसोबतचा व्यापार साधारणपणे याच भागातून चालतो. मध्यंतरी अमेरिकेने त्यांच्या हवाई हद्दीमध्ये आलेले चिनी बलून पाडले होते. आता असाच प्रकार पुन्हा घडल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय संरक्षण संस्था उपाययोजना आखत आहेत. भारतीय हद्दीमध्ये अशाप्रकारचे बलून दिसल्यास त्यांना तातडीने पाडण्यासाठी भारतीय संरक्षणसंस्थांकडून उपाययोजना आखल्या जात आहेत.
 
रडार प्रणालीला चकवा
अमेरिकेने त्यांच्या हद्दीमध्ये आलेलेल्या चिनी बलूनला पाडण्यासाठी ‘एम-९ एक्स साईडविंडर’ या क्षेपणास्त्राचा वापर केला होता. भारतीय सुरक्षा दले त्यासाठी लढाऊ विमाने मशीन गनचा स्वस्त पर्याय वापरू शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय बेटांच्या हद्दीमध्ये आलेल्या या बलूनने रडार यंत्रणेला देखील चकवा दिल्याचे उघड झाले आहे. सगळी यंत्रणा सावध होईपर्यंत हे बलून नैऋत्य समुद्राच्या दिशेने गेल्याचे दिसून आले.

सुरक्षा दलांचे भाष्य नाही
भारतीय सुरक्षा दलातील अधिकारी या बलूनच्या मूलस्थानाबाबत काहीही स्पष्टपणे बोलायला तयार नाहीत. यंदा ‘जी-२०’ समूहाच्या संमेलनाचे यजमानपद हे भारताकडे आहे त्यापार्श्वभूमीवर शेजारी देशांसोबतचे संबंध कलुषित होऊ नये म्हणून भारताचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाबाबत परराष्ट्र मंत्रालय, नौदल आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनीही थेट भाष्य केलेले नाही.
 
बलूनमुळे तणाव
अमेरिकेच्या हद्दीमध्ये चिनी बलूनने घुसखोरी केल्याने दोन जागतिक महसत्तांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. चीनने आम्ही हा बलून हवामानाचा डेटा संकलित करण्यासाठी हवेमध्ये सोडल्याचा दावा केला होता. अमेरिका या प्रकरणाचा उगाच बाऊ करत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. अमेरिकेने ज्या चिनी बलूनला पाडले होते त्याचा ढिगारा उत्तर कॅरोलिनामध्ये कोसळला होता. सध्या या ढिगाऱ्याचे अमेरिका परीक्षण करते आहे