रमजानच्या खरेदीमुळे फुलल्या महाराष्ट्रातील बाजारपेठा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
मालेगावातील किदवाई रस्त्यावर रमजान खरेदीसाठी जमलेली गर्दी
मालेगावातील किदवाई रस्त्यावर रमजान खरेदीसाठी जमलेली गर्दी

 

जलील शेख/ मालेगाव 
रमजानपर्व सुरु होऊन १८ दिवस उलटले आहेत. शहरात कपडे, चप्पल, बुट यासह रमजान ईदसाठी लागणाऱ्या वस्तुंची खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कपडे, चप्पल व इतर वस्तूचा दरात मोठी दरवाढ झाली आहे. सध्या कापड बाजार तेजीत आहे. रमजान पर्वाच्या अखेरच्या टप्प्यात तयार कपडे खरेदीवर भर असेल. येथील किदवाई रस्त्यावर शेकडो दुकाने लावण्यात आली आहेत. 

मध्यम वर्गीय व गरीब नागरीकांचा स्वस्त दरात मिळणारे कपडे व वस्तू खरेदीकडे कल असतो. येथे शंभर रुपयांपासून शर्ट व पॅन्ट विकले जात आहेत. शहराबरोबरच ग्रामीण व उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मालेगाव हे खरेदीचे हब बनले आहे. किदवाई रोड, मोहम्मद अली रोड, गांधी मार्केट, अंजुमन चौक, सरदार मार्केट या भागांमध्ये कपडे, चप्पल, बुट व सौंदर्य प्रसाधने विक्रीची मोठ्या प्रमाणात दुकाने लागली आहेत.

चप्पल, बुट दिल्ली, आग्रा, कानपूर, जयपूर, जोधपूर, कोलकाता, उल्हासनगर, मुंबई येथून तर लहान मुलांचे रेडीमेड कपडे, कोलकाता व मुंबईहून येत आहेत. महिलांसाठी कच्चे ड्रेस हे गुजरात व मुंबई येथून मोठ्या प्रमाणात आणले जात आहेत. लहान मुला व मुलींमध्ये वेस्टर्न ड्रेस, घागरा, प्लाजो, जीन्स पॅन्ड, शर्ट, टी-शर्ट, जॉकेट, सुट, कुर्ता पायजमा, थ्री पीस या कपड्यांना मोठी मागणी आहे.फॅन्सी ड्रेसला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. चप्पलमध्ये विविध प्रकारच्या फॅन्सी चपला आल्याने महिलांना भुरळ घातली आहे. फॅन्सी चप्पल वापरायला मजबूत नसली तरी महिलांना त्या आकर्षित करीत आहेत.

पूर्व भागात पाहुण्यांची रेलचेल
मालेगाव हे यंत्रमागाचे मॅचेस्टर आहे. यंत्रमागापाठोपाठ कुटुंबातील सर्वांसाठी गांधी मार्केट हब ठरत आहे. महिलांना एसटी बसेसमध्ये ५० टक्के सुट असल्याने मोठ्या प्रमाणात महिला भगिनी मालेगावी नातेवाईकांच्या घरी मुक्कामाला येत आहेत. दिवसा कडक ऊन व रोजा असल्याने बहुसंख्य महिला रात्री खरेदी करण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे येथील बाजारात मोठ्या प्रमाणात रात्री गर्दी उसळत आहे.

रिक्षाचालकांना अच्छे दिन
मालेगावात कमी किंमतीत चांगले कपडे मिळतात. त्यामुळे येथील कपडे खरेदीकडे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांचा कल असतो. महिलांना बसच्या तिकीटात सवलत असल्याने बहुसंख्य महिला खरेदीसाठी बाहेरगावाहून येथे येत आहेत. परिणामी, येथील गांधी मार्केट व इतर बाजारात खरेदीला गर्दी होत आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांमुळे येथील नवीन व जुने बस स्थानक येथील रिक्षाचालकांचा व्यवसाय तेजीत आला आहे.

टेलर दुकाने हाऊसफुल
इस्लाम धर्मामध्ये मोहरम व रमजान ईदच्या महिन्यात विवाह सोहळा होत नाही. ११ एप्रिलला रमजान ईद झाल्यानंतर लग्नसराईची धूम असणार आहे. ज्या नागरिकांच्या घरी लग्न सोहळा असणार आहे ते आता रमजानच्या कपड्यांमध्ये लग्नाची खरेदी करत आहेत. रमजान संपल्यानंतर आठवडाभर येथे टेलर व इतर वस्तूंची दुकाने बंद असणार आहे. त्यामुळे बहुसंख्य नागरीक आताच खरेदी करुन ठेवत आहेत.

शबे बारातपासूनच येथे कपडे खरेदी करण्यासाठी लगबग सुरु होती. पुरुषांमध्ये तीनशे ते एक हजार रुपयापर्यंत ड्रेसचे कापड मिळत आहे. येथे पुरुषांच्या ड्रेसची शिलाई पाचशे रुपयांपासून तर महिलांची दोनशे रुपयांपर्यंत शिलाई घेतली जात आहे. टेलर व्यवसाय रात्रंदिवस सुरु आहे. अनेक टेलरच्या दुकानांवर आतापासूनच हाऊसफुलचे फलक लावले जात आहेत.

बाजारात दररोज लाखो रुपयांची उलाढाल
रमजाननिमित्त मालेगावात गेल्या दोन आठवड्यापासून विशेष बाजार भरत आहे. या बाजारात खाद्य पदार्थांबरोबरच फळांचीही कपडे, चप्पल, बुट यांची विक्री जोमात आहे. त्यामुळे विक्रीतून शहरात रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. 
 
 
उपवास असल्यामुळे येथे फळांना विशेष मागणी असते. प्रामुख्याने टरबूज, खरबूज, चिकू, द्राक्ष, मोसंबी, पेरु तसेच काकडी यांच्या विक्रीत दुप्पटीने वाढ होते. फळ विक्रीतून रोज सुमारे २५ ते ३० लाखाची उलाढाल होते. इतर महिन्यांपेक्षा रमजान महिन्यात दुप्पटीने फळांची विक्री होते. फळांबरोबरच प्रत्येक मुस्लीम बांधव रमजान ईदसाठी नवीन कपडे खरेदी करतो. त्याचबरोबर टेलर व्यवसाय जोमात आहे.

शहरात किदवाई रोड, मोहम्मद अली रोड, गांधी मार्केट, लल्ले चौक, सरदार मार्केट या ठिकाणी कपड्यांचा बाजार भरतो. कपड्यांच्या किमतीत दरवर्षी दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होत असली तरी त्याच्या विक्रीतही कुठलीही घट होत नाही. कापड व्यवसायातून येथे महिनाभरात करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याचे येथील व्यापारी सांगतात. खजूरची महिनाभरात अंदाजे शंभर टनच्या आसपास विक्री होते.
 
येथे भरतो विशेष बाजार
शहरातील शिकारी हॉटेल, आयशानगर चौक, बेलबाग, तीन कंदील, मोहम्मद अली रोड, भिक्कू चौक, इद्दू मुकादम चौक, जुना आग्रा रोड, आझादनगर, अख्तराबाद, राैनकाबाद, गुलशेरनगर, अलीअकबर, गोल्डननगर, सैलानी चौक यासह इतर ठिकाणी विशेष बाजार भरले जातात.

या बाजारातून फळांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्याचबरोबर मुंबई येथील चिकनचे खाद्यपदार्थ येथील नागरीकांना भुरळ घालत आहे. खाद्यपदार्थ घेण्यासाठी गर्दी होत आहे. फळांनंतर खाद्यपदार्थ विक्रीतही रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून येथे खाद्यपदार्थ विक्रीच्या शेकडो गाड्या लागल्या आहेत.
 
 
हे खाद्यपदार्थ विशेष लोकप्रिय
रमजान आणि नवनवे खाद्यपदार्थ हे जणू समीकरणच बनले आहे. मालेगावातही रमजानच्या काळात नवनवे खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध होतात. त्यापैकी काही पदार्थांना विशेष मागणी असते. यावर्षी चिकन बर्गर, चिकन रोल, ब्रेड बम, चिकनकाडी, रशियन कबाब, ब्रेड रोल, समोसा, चिकन कटलेट, चिकन पालक रोल, चिज रोल, पहाडी रोल, बर्फी कबाब, शेजवान कबाब, तीळ पालक कबाब हे पदार्थ विशेष लोकप्रिय झाले आहेत. 
 
शीतपेयांना विशेष मागणी
शितपेयांमध्ये सिताफळ क्रीम, मँगो, कोकोनट, लस्सी, फालुदा, रुअबजा, ताक, सरबत, लिंबू सरबत यासह विविध शितपेयांच्या दुकानांवर खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहे. शीतपेयांमध्ये २० ते १५० रुपयांपर्यंत शीतपेय मिळतात. सर्वात महाग सीताफळ आइस्क्रीम असून सर्वात स्वस्त सरबत व लस्सी आहे. सायंकाळी उपवास सोडण्याच्या वेळी लस्सी व सरबतच्या दुकानांवर गर्दी होते.
 

 
यावेळी बोलताना प्रशांत ॲन्ड भगवा फ्रुट कंपनीचे मालक श्‍यामकांत मालपुरे म्हणाले, "रमजान महिन्यात फळांच्या विक्रीत दुप्पटीने वाढ होते. यंदा टरबूज, खरबूजला मागणी जास्त आहे. टरबूज सुमारे २२ टन तर खरबूजाची पाच टन विक्री होते."

- जलील शेख


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter