बकरी ईद २०२५ : परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ साधणारे ट्रेंडी पेहराव

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 10 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बकरी ईद अगदी काही तासांवर येऊन ठेपली आहे . या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. हा सण केवळ एकत्र येण्याचा आणि प्रेम वाटण्याचा नाही, तर स्वत:ला सजवण्याचा आणि चंद्राप्रमाणे चमकण्याचा आहे. यंदा बकरी ईदच्या निमित्ताने महिलांच्या फॅशनचे अनेक ट्रेंड बाजारात आले आहेत. पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक शैली यांचा सुंदर संगम या सणाला विशेष रंग देणार आहे. 

हवेत पसरलेला मेहंदीचा सुगंध, रेशमी वस्त्रांचा मखमली स्पर्श आणि दागिन्यांचा खणखणाट यामुळे प्रत्येक महिला आपल्या सौंदर्य खुलवणार आहे. यंदा बाजारात शाही अनारकलीपासून ते  अबायापर्यंत प्रत्येक पेहरावात परंपरेची झालर आणि आधुनिकतेचा किनार दिसून येत आहे. रंगांची उधळण आणि नक्षीकामाच्या नजाकतेने सजलेले कपडे तुम्हाला ईदच्या उत्सवात चंद्रकोरीप्रमाणे चमकवतील. आजच्या लेखात तुमच्यासाठी असे काही खास फॅशन ट्रेंड्स घेऊन आलो आहोत, जे तुमच्या बकरी ईदच्या लूकला ट्रेंडी आणि पारंपरिक बनवतील. 

फारसी सूट
फारसी सूट ऐकताच नवाबी अंदाज डोळ्यांसमोर येतो. हा पेहराव तुम्हाला शाही आणि आकर्षक बनवतो. लांब कुर्ता, रुंद पायजमा आणि जड दुपट्टा असलेला हा पेहराव पारंपरिक सौंदर्याला आधुनिक शैली देतो. यंदा सिल्क किंवा बनारसी फॅब्रिकमधील फारसी सूटचा ट्रेंड आहे.

अनारकली सूट
यंदा बाजारात सिल्कच्या अनारकली सूटची चलती आहे. या सूटच्या सुंदर नक्षीकामातच त्याचे सौंदर्य दडलेले आहे. हलके गोटा-पट्टी किंवा चिकनकारी असलेला अनारकलीला महिलांची पसंती मिळत आहे. यामुळे अगदी शाही आणि सौम्य लूक मिळू शकेल. अनारकलीचा दुपट्टा जास्त भरजरी नसावा, तो बारीक नक्षीकाम केलेला असावा. त्यावरच संपूर्ण लूक अवलंबून आहे.

गरारा
ईद सणाला नेहमीच गरारा पेहरावाला महिलांची पसंती राहिली आहे. यंदा काहीतरी पारंपरिक पण ट्रेंडी असे गरारा सूट बाजारात उपलब्ध आहेत. त्याचे भरजरी फ्लेअर आणि शरारा पँट्स त्याला खास बनवतात. हलके किंवा जड नक्षीकाम असलेला गरारा कधीही उत्तम. त्यावर लांब कुर्ता आणि नेटचा दुपट्टा अजून सुंदर लुक देईल. सध्या मिरर वर्क आणि जरी वर्कचे गरारा ट्रेंडमध्ये आहेत.  

लेहेंगा
लेहेंगा नेहमीच पारंपरिक लूकचा अविभाज्य भाग राहिला आहे. ईदला शाही आणि भव्य दिसायचे असेल, तर सिल्क, नेट किंवा बनारसी फॅब्रिकचा लहंगा निवडा. याला चिकनकारी किंवा फुलांचे नमुने असलेले ब्लाउज आणि नेटचा दुपट्टा जोडा. लहंग्यामुळे लूक पारंपरिक पण आधुनिक होईल. 

बटरफ्लाय अबाया 
सौंदर्याला रंग भरण्यासाठी यंदाच्या ईदला बटरफ्लाय अबाया ड्रेस निवडा. यामध्ये सध्या सिल्क अबाया महिलांची पसंती मिळत आहे. डार्क रंगांचे अबाया लुकला चार चाँद लावतात. विविध रंगांचे हे ड्रेस ऑनलाइन सुद्धा उपलब्ध आहेत. किंवा बाजारातून कापड घेऊन पाहिजे त्या स्टाइलमध्ये शिवून घेऊ शकता. 

लाँग स्लीव्ह मॅक्सी ड्रेस
अनेक महिलांना हलके आणि प्रिंटेड पेहराव आवडतात. त्यांच्यासाठी लाँग स्लीव्ह मॅक्सी ड्रेस हा उत्तम पर्याय आहे. हा ड्रेस ईद पार्टीसाठी घालता येऊ शकतो. यामुळे लूक स्टायलिश आणि मोहक दिसेल. 

बकरी ईदचा उत्साह या ट्रेंडी फॅशनने आणखी खुलणार आहे. फारसी सूटचा नवाबी थाट, अनारकलीचा सौम्य लूक, गराराचा ट्रेंडी अंदाज, लहंग्याचा शाही साज आणि बटरफ्लाय अबायाची आधुनिकता, प्रत्येक पेहराव तुम्हाला खास बनवेल. जड दागिने, हलका मेकअप आणि पारंपरिक मोजडी यांच्यासह तुमचा लूक परिपूर्ण बनवा. यंदाचा बकरी ईदचा सण तुमच्या खास शैलीत साजरा करा. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter