समाजसेवेचा वसा घेतलेल्या अंजुम रशीद शेख

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
अंजुम रशीद शेख
अंजुम रशीद शेख

 

लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर गावाकडे सामान्य जीवन व्यतीत करण्याऐवजी समाजसेवा किंवा उपक्रमात सहभागी होणारी असंख्य लष्करी कुटुंब आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील माजी सैनिक रशीद नजीर शेख यांच्या पत्नी अंजुम रशीद शेख ऊर्फ मीना पठाण यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्या दहा वर्षांपासून कसबे वणी परिसरात समाजसेवा करत असून गोरगरीब, दिव्यांग, भटक्या विमुक्त समाजातील मुलांसाठी काम करत आहोत. पतीने देशसेवा केली आणि आता पत्नी समाजसेवेत अग्रेसर आहे. अंजुम शेख यांच्या कार्याविषयी जाणून घेऊया त्यांच्याच शब्दांत...

मी एका सामान्य कुटुंबात जन्मलेली. वडील शिक्षक व आईने शिवणकाम करून आम्हा चार भावंडांचा सांभाळ केला. मी सगळ्यांमध्ये थोरली. शिक्षण सुरू असतानाच माझं लग्न एका सैनिक कुटुंबात झालं. रशीद नजीर शेख हे माझे पती. ते सैन्यात असल्यामुळे देशसेवेसाठी बाहेर असायचे. त्यामुळे आम्हाला फार कमी सहवास लाभला. ते सैनिक असल्यामुळे मीच मुलांची आणि संसाराची जबाबदारी पार पाडली.

लग्नाच्या सात वर्षानंतर आम्ही राजस्थानच्या अलवरमध्ये सैनिक वसाहतीत राहायला गेलो. अवघ्या एका महिन्याच्या बाळासह आम्ही तिथे स्थायिक झालो. १९९९च्या एप्रिल-मे महिन्यात कारगिलचे  युद्ध सुरू झाले. माझ्या पतीला लागलीच सीमेवर रवाना व्हावे लागले. मी अलवरला राहिले. सैनिकाचे जीवन हे देशसेवेसाठी असते, पण सैनिक पत्नीचे जीवन अतिशय संघर्षमय असते. जवान देशासाठी लढत असतात, तर दुसरीकडे पत्नीवर कुटुंबांची जबाबदारी असते.

सैनिकासोबतच त्याच्या कुटुंबीयांना आई-वडील, मुलं, सर्वांना खूप त्याग करावा लागतो. मुलाचा सांभाळ करताना माझी धांदल उडायची.सुरक्षेच्या कारणास्तव अलवरच्या कॅम्प भागातील सर्व सुविधा बंद झाल्या होत्या. सर्व सैनिक सीमेवर होते. बाहेरच्या भाजीवाले, दूधवाले कोणालाही वसाहतीत प्रवेश नसायचा. त्याकाळी मोबाईलही नव्हते. टीव्हीवर येणाऱ्या बातम्या हेच आमचे माहितीचे साधन होते. 
 
एखादा जवान हुतात्मा झाला तर त्याच्या गावाकडे आधी कळवले जायचे. त्याची पत्नी, मुलं बदलीच्या ठिकाणी असेल तर घरचे नातेवाईक त्यांना गावाकडे नेण्यासाठी गाडी घेऊन येत असत. लष्करी भाग असल्याने एरवी बाहेरची गाडी दिसत नसे. त्यामुळे अशी एखादी गाडी दिसली तर ती कोणाच्या घरासमोरजातेय हे कळेपर्यंत काळजाचा ठोका चुकायचा. मी कधीही विसरू शकत नाही ते क्षण. काही महिन्यांनी युद्ध संपलं. तब्बल सात महिन्यांनी पती घरी आले. तोवर जीवनात अनेक चढउतार येऊन गेले. 

१८ वर्ष देशसेवा करून पती निवृत्त झाले. आम्ही आज नाशिकमधील दिंडोरी जिल्ह्यातील वणी येथे स्थायिक झालो. आमची मुले आता उच्च शिक्षण घेत आहेत आणि मी समाजसेवेचे व्रत घेत गोरगरीब अपंग,शाळाबाह्य भटके विमुक्त समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करत आहे. अत्याचारपीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या या कार्यात कुटुंब सहकार्य करते.. अशीच देशसेवा करण्याचा आम्हा दोघांचा मानस आहे.

असे आहे सामाजिक कार्याचे स्वरूप
मी दशकभरापासून सामाजिक कार्य करत आहे. वणी परिसर आणि दिंडोरी ग्रामीण भागातील गोरगरिबांची, मजुरांची भटक्या विमुक्त समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मी कार्यरत आहे. या कामात मला बऱ्यापैकी यशही मिळाले आहे.दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या योजनांची माहिती देणे, त्यांना कृत्रिम अवयव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आदि गोष्टीही मी आवर्जून करते. वंचितांच्या मागण्यांसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी शासन दरबारी भूमिका मांडली आहे. निराधार वृद्ध लोकांना वैद्यकीय मदत करणे, वृद्धाश्रमात आधार देणे, समुपदेशन करून विभक्त कुटुंबांना एकत्र करणे, लोकांना व्यसनमुक्त करणे, भंगार वेचणाऱ्या मुलांना शाळाबाह्य शिक्षणाच्या प्रवाहात आणणे अशी कामे मी कर्तव्य भावनेने करत आले आहे.
 
वणी दिंडोरी हा आदिवासी भाग असल्याने इथे सोयी-सुविधांचा वानवा असतो. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, छत्री, दप्तर आदि गोष्टी आदी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील असते. युवती आणि महिलांना स्वसंक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षणाचे उपक्रम मी सध्या राबवत आहे. भविष्यात मतिमंद,अपंग, दृष्टिहीन, अनाथांसाठी निवासी शाळा काढण्याचा माझा मानस असून त्याद्वारे त्यांना स्वावलंबी बनवण्याचा माझा उद्देश आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याबरोबरच अत्याचारमुक्त समाज निर्माण करण्याचाही माझा प्रयत्न आहे.

माझ्या या विविधांगी कामांसाठी मला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यापैकी भारत सामाजिक कार्यकर्ता गौरव पुरस्कार, समिज्ञा हिरकणी राज्यस्तरीय पुरस्कार, दलित आदिवासी युवा संघर्ष पुरस्कार, कोरोनायोद्ध्या, आदर्श समाजसेवक पुरस्कार आदींचा विशेष उल्लेख करता येईल.
 

 

आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter