रमजाननिमित्त शेकडो कैद्यांचा दंड भरून त्यांना स्वातंत्र्य देणारे फिरोज मर्चंट

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
फिरोज मर्चंट आणि पोलीस महासंचालक
फिरोज मर्चंट आणि पोलीस महासंचालक

 

मलिक असगर हाशमी
 
मुंबईचे ज्वेलर्स फिरोज मर्चंट यांनी आपल्या व्यवसायशैलीने आणि मानवी सेवेने यूएईमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक रमजानपूर्वी, यूएई मधील तुरुंगात जातात आणि दंड न भरू शकल्याने विविध तुरुंगांमध्ये जास्त काळ शिक्षा भोगत असलेल्या कैद्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करतात.  रमजानपूर्वी कैद्यांना त्यांच्या घरी परतता यावे यासाठी हे सर्व करत असल्याचे फिरोज मर्चंटचे म्हणणे आहे .  

२००८ मध्ये त्यांनी कैद्यांच्या मदतीसाठी त्यांनी 'द फॉरगॉटन सोसायटी' नावाची संस्था स्थापन केली आहे. सोसायटीच्या धोरणानुसार, एक आठवड्यापूर्वी फिरोज मर्चंटने ९०० कैद्यांच्या सुटकेसाठी दंडाची रक्कम म्हणून २.५ कोटी रुपये यूएई सरकारकडे सुपूर्द केले. ज्या कैद्यांकडे तिकिटाचे पैसे नसतात अशांच्या  विमान प्रवासासाठी व्यवस्था देखील 'द फॉरगॉटन सोसायटी' करते.६६ वर्षीय फिरोज मर्चंटचा दुबईत प्युअर गोल्ड ज्वेलर्स नावाने व्यवसाय आहे.

यूएई मधील सोने आणि हिऱ्यांचे  ज्वेलर्स
फिरोज मर्चंट म्हणतात, "आम्ही अगदी आमच्या नावाप्रमाणे आहोत!"  १९८९ मध्ये त्यांनी  'प्युअर गोल्ड ज्वेलर्स' या नावाने  व्यवसाय सुरू केला. तेव्हापासून  ते ग्राहकांना अत्याधुनिक डिझाइनसह दर्जेदार दागिने देत आहे.
 
दुबईच्या ज्वेलरी मार्केटमध्ये मक्तेदारी प्रस्थापित केल्यानंतर, नवीन डिझाइनच्या दागिन्यांसह जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण करायची, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.
 
ऑनलाइन दागिन्यांची खरेदी
‘प्युअर गोल्ड ज्वेलर्स’चे सर्व डिझायनर दागिने ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. फिरोज मर्चंट यांच्या  म्हणण्यानुसार, सोन्याचे-हिराचे हे उत्कृष्ट दागिने  यूएई मधील दुबईपासून अबू धाबीपर्यंत ऑनलाइन आणि दुकानातून विकले जातात.

सोन्याच्या अंगठ्या आणि बांगड्या यांना ऑनलाइन वर सर्वाधिक मागणी आहे. अरब महिला हिऱ्यांच्या दागिन्यांना प्राधान्य देतात. त्यामुळे हे दागिने ऑनलाइन विक्रीसाठीही उपलब्ध आहेत.

कैद्यांना मुक्त करण्याची कल्पना दागिन्यांची विक्री करताना आली
एके दिवशी दागिन्यांचा व्यवसाय करत असताना, दंड न भरल्यामुळे अरबच्या विविध तुरुंगात बंदिस्त असलेल्या कैद्यांची सुटका करण्याची कल्पना त्यांना सुचली. याशिवाय कारागृहातील अनेक कैद्यांना विविध माध्यमातून ते मदत करतात.

त्यांच्या प्रयत्नांमुळे २०१९ मध्ये ७०० कैद्यांची सुटका झाली. मागील काही वर्षांत त्यांनी २० हजारांहून अधिक कैद्यांना सोडवले. मागील आठवडात ९००  कैद्यांची सुटका करण्यात आली.  त्यांनी आखाती देशांच्या तुरुंगातून ९०० कैद्यांची सुटका सुनिश्चित करण्यासाठी यूएई सरकारकडे  १ दशलक्ष दिरहम म्हणजे सुमारे २.५ कोटी रुपयांचा दंड भरला.

२०२४  मध्ये तीनहजार कैद्यांची सुटका करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. फिरोज मर्चंट कार्यालयाने दिलेल्या माहितीत सांगितले की,  हे काम म्हणजे रमजान पूर्वी नम्रता, मानवता, क्षमा आणि दयाळूपणाचा संदेश आहे. ९००  कैद्यांच्या सुटकेनंतर द फॉरगॉटन सोसायटी त्यांची आवश्यक त्या सुविधाही पुरवत असल्याचेही त्यांनी संगीतले.

फिरोज मर्चंटच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत अजमान तुरुंगातून ४९५  कैद्यांची, फुजैराहमधून १७० , दुबईतून १२१ , उम्म अल क्वाइनमधून ६९ आणि रास अल खैमाह तुरुंगातून २८ कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. 

आखाती प्रदेशात राहणारा तेलुगू समुदायातील एका ऑनलाइन न्यूज पोर्टलचा वाचक, मगलुफ सांगतो की,  'मर्चंट यांनी त्याचे कर्जही फेडले. मायदेशी परतण्यासाठी विमान भाडे भरले. यामागे फक्त एकच उद्देश आहे ते म्हणजे  कुटुंबांना पुन्हा एकत्र आणणे आणि व्यक्तींना  आयुष्यात दुसरी संधी देणे.'

कैद्यांना मदत देण्याची सतत प्रक्रिया
मर्चंट यांनी यूएईच्या मध्यवर्ती कारागृहांच्या पोलीस महासंचालकांच्या सहकार्याने, गेल्या काही वर्षांत २० हजारांहून अधिक कैद्यांना मदत केली आहे. त्यांच्या या कामाची प्रशंसा सरकारी अधिकाऱ्यांकडूनही होत आहे.

सरकारच्या सहकार्याबद्दल मर्चंट यांनी सरकारप्रति कृतज्ञता ही व्यक्त केली . पुढे ते म्हणाले की,  फॉरगॉटन सोसाइटीचा असा विश्वास आहे की मानवतेला मर्यादा नाही आणि कैद्यांना मदत करताना आम्ही कसल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. 

युएईचे कर्नल मोहम्मद युसेफ अल-मातरोशी यांनी कैद्यांच्या पुनर्वसनासाठी मर्चंटच्या कामाची प्रशंसा केली. कर्नलच्या मते, त्यांनी असंख्य लोकांना मदत केली आहे. यांच्या या उदारतेमुळे दंड भरण्यासाठी धडपडणाऱ्यांना आशेचा एक किरण दिसतो. .

कैदी वेगवेगळ्या देशांचे आहेत
फिरोज मर्चंटच्या पुढाकाराने २०१९  मध्ये ७००  कैद्यांची सुटका करण्यात आली. यासाठी, मर्चंटने यूएईला २७२२४२ डॉलर्स दिले होते. यावर रिटेलर प्युअर गोल्ड ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणाले की, त्यांचे हे पाऊल यूएईच्या सहनशीलतेला अनुरूप आहे.

कैद्यांच्या सुटकेत ते भेदभाव करत नाही. ज्या कैद्यांची तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाली आहे, परंतु दंड भरू शकत नाहीत अशा कैद्यांची सुटका करण्यास मर्चंट मदत करतात. हे कैदी कोणत्याही देशातील असतात.. 

बहुतांश कैदी अफगाणिस्तान, इराक, भारत, पाकिस्तान, फिलीपिन्स, रशिया आणि थायलंड या देशांतील आहेत. अजमान पोलीसचे कमांडर-इन-चीफ मेजर जनरल शेख सुलतान बिन अब्दुल्ला अल नुएमी म्हणाले की, कैद्यांची सुटका हे शुद्ध सोन्याच्या एकतेचे प्रतीक आहे.
 
(अनुवाद - पूजा नायक)
-मलिक असगर हाशमी

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter