गरजूंच्या जीवनात प्रकाशरूपी हास्य फुलवणारे ‘जावेद शेख’!

Story by  vivek panmand | Published by  sameer shaikh • 1 Years ago
गरजूंना सोलर विजेचे किट देताना जावेद (उजवीकडून दुसरे)
गरजूंना सोलर विजेचे किट देताना जावेद (उजवीकडून दुसरे)

 

‘दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःची ओंजळ पुढे करा, देव त्याच्यासकट तुमचेही भले करेल’ या स्वरूपाचे वाक्य केवळ पुस्तकात वाचले होते. हा विचार जगणारे लोक आपल्या आजूबाजूला असतील यावर विश्वास बसणे तसे कठीणच. मात्र जावेद शेख यांची गोष्ट ऐकली आणि अशी माणसे अस्तित्वातही आहेत याची खात्रीच पटली. आणि वाटल, गरजूंच्या आयुष्यात प्रकाशरुपी आनंद देणारे जावेद आणि त्यांचे कार्य आपल्या सगळ्यांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे.

जवळपास प्रत्येकच शहरात रात्री-अपरात्रीही सगळीकडे लख्ख उजेड असतो. साहजिकच डोळे दिपून जातात. मात्र या लखलखाटात विजेविना असलेल्या अंधाऱ्या झोपड्या आणि घरांकडे बरेचदा दुर्लक्षच होते, ते आपल्या खिजगणतीतही नसतात. मात्र डोळस आणि संवेदनशील असलेल्या जावेद शेख या तरुणाने उजेडाआड लपलेली ही अंधारी घर ओळखली. या घरांमध्येही प्रकाश पोहोचायला हवा, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे त्याने ठरवले.  

जावेद पुण्यातील येरवडा भागात राहतात. या परिसरातून येता जाता त्यांना अनेक घरांमध्ये काळोख पसरलेला दिसायचा. तिथे जाऊन चौकशी केल्यावर त्यांना सर्रास उत्तरं मिळायची, ‘विजेचे कनेक्शन घ्यायला पैसे नाहीत’ किंवा ‘वीजबिल न भरल्यामुळे लाईट कनेक्शन काढून टाकले’. गरिबांच्या अगतिकतेमुळे जावेद दुःखी व्हायचे. या गरजूंना मदत करावी या उद्देशाने आपले ज्ञान वापरायचे त्यांनी ठरवले. हा अंधार दूर करण्यासाठी सौर उर्जेचा वापर करायचा, या निष्कर्षाप्रत ते आले. स्वतःच्या  युसूफ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी काळोख्या घरांमध्ये सोलर दिवे बसवले आणि तेथे राहणाऱ्या मंडळींचे चेहरे प्रकाशाने उजळवले. 

तेहतीस वर्षीय जावेद शेख हे जन्माने पुणेकर. विज लोडशेडिंग पाचवीलाच पूजले असल्यामुळे घरातला अंधार त्यांच्यासाठी नवा नव्हता. मोठे झाल्यावर अशा अंधाऱ्या घरांमध्ये उजेड आणण्याचे स्वप्न त्याने लहानपणापासूनच मनाशी बाळगले होते. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकीची पदवीही मिळवली. 

जावेद यांना समाजसेवेची खानदानी परंपरा होती. त्यामुळे लहानपणापासूनच जावेद यांना समाजसेवेचे आकर्षण होते. सामन्यत: शिक्षण पूर्ण केल्यावर विद्यार्थी नोकरीच्या मागे लागतात. कमी धोका आणि आर्थिक स्थैर्य यांसाठी बहुतेकजण नोकरीलाच पसंती देतात. जावेदने मात्र व्यवसायाला सुरुवात केली. घरातला विचारांचा वारसा पुढच्या पिढीकडे आपोआप जातो, असे म्हटले जाते. जावेद लहानपणापासून काका सादिक शेख यांना पाहत मोठा झाला. त्यांचे काम पाहून आपणही समाजासाठी काहीतरी करावे अशी त्याची मनापासून इच्छा होती. त्यांच्याकडूनच कामाची प्रेरणा मिळाल्याचे जावेद आवर्जून सांगतात. 

जावेद यांचे कुटुंब छोटे आहे. कुटुंबात आई, बायको आणि मोठी बहीण आहे. जावेद यांच्याप्रमाणेच त्यांची मोठी बहीण वझिया यांना समाजसेवा करायची इच्छा होती. दोघा बहीण भावांनी मिळून मग वडिलांच्या नावाने ‘युसूफ फाउंडेशन’ची स्थापना केली. हेतू एकच, सामाजिक कार्याच्या रूपाने वडिलांच्या नावाचा सुगंध समाजात सदैव दरवळत राहावा. कुटुंबीयांनीही दोघांच्या निर्णयाला पाठींबा दिला आणि कामाला सुरुवात झाली. २०२० मध्ये युसूफ फाउंडेशनच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. 

जमिनीवर उतरून काम करण्याची जावेद यांना आता संधी मिळाली होती. कोणतीही समस्या परस्पर सहकार्याने सोडवली जाऊ शकते यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. याच विश्वासाच्या जोरावर त्यांच्या कामाचा शुभारंभ झाला. प्रत्यक्षात सामाजिक काम करताना पहिले ध्येय मूलभूत गरजा पूर्ण करणे हेच असायला हवे याची त्यांना खात्री पटली. मूलभूत गरजांमध्ये सरकारकडून रस्ते आणि पाणी या सुविधा काही अंशी पुरवल्या जातात, मात्र अनेक गरीब घरांमध्ये अद्यापही वीज कनेक्शन नसते किंवा बिल भरायला पैसे नसतात. परिणामी जीवन अंधारातच कंठावे लागले. ही समस्या कशी सोडवता येईल यावर जावेद यांचे विचारमंथन सुरु झाले.

अल्प दरात अधिकाधिक लोकांची ही समस्या कशी दूर करता येईल यावर त्यांचा विचार सुरु होताच.  अपारंपरिक ऊर्जेच्या मदतीने ही समस्या सोडवता येऊ शकते का याचा त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. सोलर वीज हा उत्तम पर्याय असू शकतो याची त्यांना खात्री पटली. घरावर सोलर पॅनल बसवला तर अंधाऱ्या खोल्यांत प्रकाश पडू शकतो हे त्यांना अभ्यासांती उमजले होते. 

गरजूंच्या घरात सोलरच्या विजेचा प्रकाश देण्याचा संकल्प जावेद यांनी केला. सुरुवात आपल्या मोहल्ल्यापासूनच करायचे त्यांनी ठरवले. ज्या कुटुंबात कर्ता पुरुष नाही किंवा अपंग लोक आहेत अशांना प्राधान्यक्रमाने वीज देणे गरजेचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.  

सुरुवातीला दहा गरजू कुटुंबांची निवड करून त्यांना सोलर पॅनल पुरवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पर्यावरणपूरक वीज देण्याचा त्यांचा हेतू सोलर सिस्टमच्या मदतीने पूर्ण होणार होता. वीज नसलेल्या घरात लोकांचे किती हाल होतात हे त्यांनी जवळून पहिले होते. यामुळे जात धर्म न पाहता सर्व गरजूंना या विजेचा पुरवठा करू असा संकल्प त्यांनी केला. एकदा चार्ज झाल्यावर आठ तास पुरेल एवढी वीज या सोलर पॅनलद्वारे पुरवली जाते. विशेष म्हणजे सोलर उर्जेद्वारे पंखा आणि मोबाईल चार्ज केले जाऊ शकत होते. कित्येक पिढ्या अंधारात काढलेल्यांच्या जीवनात जावेद यांच्यामुळे प्रकाश पडला  होता. 

सोलर बद्दल जनजागृती नसल्यामुळे खरच वीज येईल का हा प्रश्न सर्वसामान्यांना पडायचा. अंधारलेल्या घरात उजेड आल्यावर मात्र लोक भावनिक व्हायचे. जावेद हे देवमाणूस असल्याची भावनाही अनेकांनी व्यक्त केली. 

युसूफ फाउंडेशन भविष्यात कोणती कामे करणार याबद्दल जावेद भरभरून माहिती देतात. सध्याच्या काळात पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना जावेद बोलून दाखवतात. ते म्हणतात की, भविष्यातही पर्यावरणपूरक कामे करण्यावर आम्ही युसूफ फाउंडेशनच्या वतीने हातभार लावत राहू. 

कोरोना काळातही युसूफ फाउंडेशनमार्फत जावेद यांनी मोठ्या प्रमाणावर समाजकार्य केले. याकाळात त्यांनी मास्क, अन्न आणि पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात वाटप केले. पुण्यातील आझम कॅम्पस कॉलेज ऑफ आर्टस आणि युसूफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अनाथ मुलांसाठी स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी जावेद स्वतः निधी उभा करतात. 

स्वकमाईतला काही हिस्सा जावेद समाजकार्यासाठी बाजूला काढून ठेवतात. ‘आपण समाजाचे देणे लागतो’ असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते. जावेद यांची समाजाप्रती असणारी तळमळ आणि काम करण्याचा उत्साह पाहिला की आपणही यात हातभार लावावा अशी भावना आपल्या मनात तयार झाल्यावाचून राहत नाही.   

- विवेक पानमंद