शेकडो गरीबांचा संसार फुलवणारे ‘खलीलभाई’!

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
खलील चौधरी
खलील चौधरी

 

अहमदनगर : ‘घर पहावे बांधून, लग्न पहावे करून आणि विहीर पहावी खोदून,’ असे म्हटले जाते. या तीनही गोष्टी सर्वसामान्य कुटुंबांना अवघड. त्यातील शहरी भागातील नागरिकांना घर आणि लग्न या दोन गोष्टी सतावणाऱ्या. सध्याच्या काळात लग्न जमविणेही अवघड. हेच अवघड काम सोपे करतात नगरचे खलील चौधरी. त्यांनी महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील तब्बल ५५० हून अधिक विवाह जुळवले आहेत, सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करून शेकडो मोफत विवाह लावून दिले आहेत.
 
नगरमधील चौधरी रिश्ते नाते ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाजी शेख खलील यासीन चौधरी हे सामाजिक काम करतात. नगरमधीलच नव्हे, तर महाराष्ट्रात ते ‘लग्न लावणारे चौधरी’ म्हणून ओळखले जातात. ज्यांचे विवाह जमलेले आहेत; परंतु आर्थिक अडचणीमुळे ते लावणे शक्य नसते, अशांना चौधरी यांचा मोठा हातभार लागतो.
 
समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून ते सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करतात. सध्या चौधरी सेवानिवृत्त आहेत. शहरातील मंगलगेट भागात राहतात. समाजातील मुला-मुलींचे विवाह जमविण्यात त्यांच्या वडिलांना छंद होता. त्यांनी त्या काळी सुमारे ५० दाम्पत्यांचे संसार सुरू करून दिले. हाच कित्ता खलिल यांनी गिरविला.
 
याविषयी खलीलभाई म्हणतात, “मुस्लीम समाजातील बहुसंख्य लोकांची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. डामडौल न करता, साधेपणाने लग्न करा असा आदेश प्रेषित मोहम्मद यांनी दिला आहे. धर्मग्रंथ कुराणनेही हुंडा घेणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र या दोन्ही गोष्टींकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. लग्नात भरमसाठ खर्च करण्याकडेच समाजाचा कल असतो. याचा अवास्तव ताण मुलीच्या कुटुंबियांवर येतो. त्यामुळे लग्न लावता लावता ते कर्जबाजारी होऊन जातात." 
 
समाजवास्तवाची जाणीव असलेले खलीलभाई यांचे संवेदनशील मन त्यांना स्वस्थ बसू देईना. ते म्हणतात,  "याविषयी आपण काहीतरी करायला हवं असं मला वाटलं. मी अहमदनगरमधील झोपडपट्ट्यांमध्ये गेलो. पाहतो तर एका एका घरात दोन दोन, एकेक मुलगी लग्नाविना तशीच राहिली आहे. काहींचे वडील वारल्यामुळे, प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची लग्नं होत नव्हती. मग गरीब घरातील अशा मुलींची माहिती जमा करू लागलो. पुढे मी नाशिक, जालना, औरंगाबाद, बुलढाणा, मालेगाव आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ही माहिती जमा करत फिरलो. ते ही स्वखर्चाने. उद्देश एकच, पैशाविना मुलींची लग्न थांबू नयेत.”
 
पुढे खलील म्हणतात, “ मी नोकरीला होतो. मात्र हे एका दिवसाचे काम नाही, याची मला कल्पना होती. त्यासाठी अनेकदा हक्काच्या सुट्ट्या वापराव्या लागल्या. अनेक वेळा तर दोन – दोन महिने बिनपगारी सुट्या टाकून स्वतः नुकसान सहन करून ही सेवा मी सुरू ठेवली.”
 
लग्न ठरवताना स्वतःच्या मुलींसाठी करावी तशी मुलांची माहिती खलील घेतात. मुलाचे शिक्षण, नोकरी, व्यसनाधीनता या सर्व बाबी व्यक्तिश: तपासून खात्री झाल्यावरच ते पुढे बोलणी करतात, ‘मुलींचे कुटुंबीय माझ्यावर भरोसा ठेवतात, त्यामुळे मुलगी चांगल्या घरी जावी याकडे माझा कटाक्ष असतो.’ असं ते आवर्जून सांगतात.   
 
या समाजकार्यासाठी खलिल यांना आतापर्यंत २५ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र गौरव, आदर्श समाजसेवक, मौलाना आझाद ॲवॉर्ड, समाजभूषण असे पुरस्कार देऊन समाजाने त्यांचा यथोचित गौरव केला आहे. हे सर्व करीत असताना त्यांच्या पत्नी मुमताज, मुलगा आकील, मुलगी तब्बसूम सय्यद यांचे सहकार्य लाभत असल्याचे खलिलभाई आवर्जून सांगतात. 
 
खलील चौधरी निस्वार्थ भावनेने हे काम करत आले आहे. ‘खल्क ए खुदा की खिदमत’ (ईश्वराच्या लेकरांची सेवा) करणे ते आपले कर्तव्य मानतात. त्यांच्या या कार्यामुळे शेकडो संसार वसले आहेत. शेकडो कुटुंबियांवर त्यांनी कर्जाचा डोंगर उभा राहू दिला नाही. साहजिकच अशा कुटुंबियांना आणि मुला-मुलींना खलीलभाई देवदूत वाटावेत यात नवल ते काय!    
 
- मुरलीधर कराळे