हिंदू-मुस्लीम एकता आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते मौलाना आझाद

Story by  Sameer D. Shaikh | Published by  sameer shaikh • 6 Months ago
मौलाना आझाद
मौलाना आझाद

 

सरफराज अहमद

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अग्रणी आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना आझाद यांची आज १३५वी जयंती. इस्लामचे प्रकांडपंडित असणारे मौलाना आझाद हिंदू- मुस्लीम ऐक्याचे आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे प्रखर समर्थक होते. हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समाजातील तणाव नाहीसा व्हावा, त्यांच्यात परस्पर विश्वास आणि सहकार्य वाढावे यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. दोन्ही बाजूच्या जमातवादाला उत्तर देताना त्यांनी अनेकदा धर्माचाच आधार घेतला. या अर्थाने ते खरे धार्मिक होते. हिंदू -मुस्लीम एकता व धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद यांच्याप्रति असलेली मौलाना आझादांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा सरफराज अहमद यांचा विशेष लेख...

खिलाफत आंदोलनाच्या मंचावरुन मौलाना आझाद लोकनेते म्हणून उदयाला आले. पण त्यांनी त्यांचे कार्य कलकत्त्यातून जहाल कार्यकर्त्यांच्या ‘हबीबुल्लाह’ या गटाची स्थापना करुन केले होते. या गटाचे सदस्य होउ इच्छीणाऱ्यांना कब्रस्तानात हातामध्ये कुरआन घेऊन भारतीय स्वातंत्र्याची शपथ घ्यावी लागे. या गटाने काही छुप्या व उघड कारवाया केल्या. कालांतराने हा गट मागे पडला आणि आझादांनी ‘दारुल इरशाद’ या नावाने विद्यार्थ्यांची संघटना बांधली. पण आझांदांमधली जहालता कमी झाली नव्हती. पुढे खिलाफत आंदोलनानंतर आझादांमध्ये काँग्रेसच्या आंदोलनाचा विचार रुजत गेला आणि ते राष्ट्रीय राजकारणात सहभागी झाले. राष्ट्रीय राजकारणात आल्यानंतर मौलाना आझाद यांनी सुरुवातीलाच हिंदू वर्चस्ववादाचा बाऊ करणाऱ्या मुस्लिम नेत्यांना इंग्रजनिष्ठेचे धोरण बदलण्याचे आवाहन केले. आझादांनी मुस्लिमांना काँग्रेसमध्ये सामील होण्यास सांगितले. ते म्हणाले, 

‘मुसलमानांनी काँग्रेसमध्ये सामील व्हावे, याचे एकच कारण असे की, ते त्यांचे कर्तव्य आहे. त्यांचा निर्णय आत्मविश्वासावर आधारलेला हवा. कोणत्याही सत्तेची ‘हांजी-हांजी’ करण्यासाठी नव्हे, किंवा सत्तेपासून भिती आहे म्हणून नव्हे.’ 

बहुसंख्याकांवरचा अविश्वास टाकून देऊन देशाच्या स्वातंत्र्याला मुस्लिमांनी प्राधान्य दिले पाहिजे. असे त्यांचे मत होते- 

‘१९१२ सालापासून मी मुसलमानांना या देशाच्या राजकीय संघर्षात बिनशर्त सामील व्हायचे आमंत्रण देत आहे. आम्ही स्वातंत्र्यलढ्यात कर्तव्य म्हणून सामील होत आहोत, हिंदूंनी भविष्याविषयी आम्हाला काही आश्वासन दिले आहे म्हणून नव्हे, असे स्पष्ट करुन नंतरच त्यांनी सामील व्हावे. मुसलमानांची भविष्यावरील श्रध्दा स्वावलंबनावर आणि धैर्यावर आधारित असावी. आपल्याला काही आधिकार आहेत आणि ते वाया जाऊ नयेत अशी मुसलमानांना जोवर इच्छा आहे, तोवर कोणतीही प्रादेशिक शक्ती ते वाया घालवू शकणार नाही’

 त्यांनी हिंदू समाजाला गतिशील समुह म्हटले. आणि या समाजाशी समन्वय साधण्याची विनंती केली.  आझाद म्हणाले- 

‘हिंदूस्तानी मुसलमानांनी डोळे बंद करुन इंग्रज राजवटीच्या योजना मान्य केल्या. त्यांनी देशातील वास्तविक गतिशील समूह असणाऱ्या हिंदूंशी सारे संबंध तोडले आहेत. आमच्या मनात भिती निर्माण करण्यात आलीय की, हिंदू बहुसंख्य आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत गेलो तर ते आम्हाला संपवतील. त्याचा परिणाम हा झाले की, मुसलमानांच्या भाल्यांच्या निशाण्यावर जे सरकार असायला हवे होते, ते वाचले आणि त्यांचे शेजारीच त्यांच्या निशाण्यावर आले.’

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदू मुस्लिम संवाद गरजेचा आहे, असे त्यांचे ठाम मत होते. म्हणून हिंदू मुस्लिम समन्वयासाठी ते हरघडी प्रयत्नशील राहिले. त्यासाठी मौलाना आझाद यांनी इस्लामचाही आधार घेतला. ते म्हणाले, 

इस्लाम संकुचित मानसिकता आणि धार्मिक पुर्वग्रह यांना परवानगी देत नाही. माणसाची वैशिष्ट्ये, त्याची बुध्दीमत्ता, उदारता, दया आणि प्रेम यांची पारख इस्लाम जाती आणि धर्माच्या आधारावर करत नाही. इस्लाम आम्हाला त्या प्रत्येक भल्या माणसाच्या सन्मानाची शिकवण देतो, जो चांगला आहे. भले त्याचा धर्म वेगळा असेल.’

इस्लामी राज्याच्या संकल्पनेसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या विरोधात आझाद इस्लामच्या सहिष्णूतेचा सिध्दांत अधोरेखित करत होते. त्यांनी मक्केतील प्रेषितांचे वर्तन आणि मदिनेत इस्लामी स्टेटच्या स्थापनेनंतर समस्त अरबस्तानातील समाजाशी त्यांनी केलेल्या राजकीय व्यवहाराचे दाखले यावेळी दिले. कुरआनचा पहिला अध्याय असणाऱ्या सुरह फातेहाचे विश्लेषण करताना आझाद यांनी विश्वबंधुत्व, मानवकल्याण, सन्मार्गातून सामाजिक सौहार्द अशा संकल्पना मांडल्या. ‘अल्‌ हिलाल’ या वर्तमानपत्रातून त्यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षामध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांना इतर धार्मिक आस्था असणाऱ्या सहकाऱ्यांशी विशेषतः हिंदूशी सहकारात्मक भूमिका घ्यावी लागली. त्यातूनचे एका बाजूला हिंदू मुस्लिम ऐक्य आणि दुसऱ्या बाजूला सर्व धर्मांची एकता ‘वहदत ए दिन’ वर त्यांनी भर दिला. हा आधार घेऊन आझाद लढत होते. 

समाजातील दुर्बळ वंचित घटकांबद्दल कुराणामध्ये कणव व्यक्त केली आहेत. जे दुर्बळ आहेत त्यांच्या कृपा करण्याची गरज आहे. आणि त्यांना नेतृत्व देण्याची, वारसदार करण्याची, शक्ती देण्याची इच्छा आहे. (कुराण - २८/ ५-६) आझादांनी कुराणातला नेमका हाच विचार धरुन आपल्या मातृभूमीच्या परिवर्तनामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. 

मोपला शुध्दीकरण थांबवण्याचे आवाहन, आर्यसमाजाला देशहिताचा सल्ला 
सन १९२१मध्ये स्वातंत्र्य चळवळीतून प्रेरणा घेऊन मालबार किनाऱ्यावरील मुस्लिम मोपला शेतकऱ्यांनी बंड केले. हिंदू जमीनदार आणि इंग्रजांविरोधातील या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले. पण पुढे त्याला धार्मिक स्वरुप आले. मोपला चळवळीतील मुस्लिमांनी हिंदूंना जबरदस्ती इस्लाम स्विकारण्यास भाग पाडले. त्यावरुन देशात त्यांच्यावर प्रचंड टिका झाली. मौलाना आझादांनी या आंदोलनाने प्रभावित हिंदूंच्या मदतीसाठी खिलाफत कमिटीची बैठक बोलावली. त्यांच्यासाठी १० हजार रुपयांची मदतही पाठवली. मौलाना आझादांनी मोपला विद्रोहींना इस्लामच्या मुलभूत शिकवणींचा संदर्भ देऊन जबरदस्ती धर्मांतर रोखण्याचे आवाहन केले. मौलाना म्हणाले, 

‘इस्लाम बळजबरी धर्मांतर करण्याला परवानगी देत नाही. अशा पध्दतीचे कृत्य शरियतविरोधी आहे. अशा कृतीला ते स्वतः जबाबदार असतील. त्यांच्या या कृत्यांमध्ये आम्ही सहभागी नाही.’ 

मौलाना आझाद आणि अन्य मुस्लिम नेत्यांनी मोपेल्यांच्या या कृतीचे निषेध नोदंवले तरी त्यावरील प्रतिक्रिया थांबल्या नाहीत. सन १९२३ मध्ये स्वामी श्रध्दानंद यांनी ‘शुध्दी सभेची’ स्थापना केली. मोपला चळवळीतील धर्मांतरांनतरची ही वैध प्रतिक्रिया असल्याचे स्वामी श्रध्दानंद यांनी म्हटले होते. ज्या हिंदूंनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म स्विकारला होता, शुध्दी सभेकडून त्यांना पुनश्च हिंदू धर्मात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले. मलकाना मुसलमान आणि इस्माईली मुसलमानांवर या शुध्दी चळवळीचा जोर दिसून आला. त्याची प्रतिक्रिया म्हणून देवबंदनेदेखील मुस्लिमांमध्ये धार्मिक जागृतीचे प्रयत्न तीव्र केले. शुध्दी आंदोलनाच्या प्रतिक्रियेतूनच पुढे मौलाना मोहम्मद युसूफ कंधलवी यांनी तबलीग जमातची स्थापना केली. 

मुस्लिम लीगच्या लीगच्या नेत्यांनी शुध्दी चळवळीवर टिका केली. हिंदू जमातवाद आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाला अधोरेखित करण्याची आयती संधी त्यांच्याकडे चालून आली होती. पण देवबंदने शुध्दी चळवळीच्या विरोधात केलेल्या मोर्चेबांधणीत लीगच्या नेत्यांना राजकारणाची संधी मिळाली नाही. परिस्थितीचा अंदाज घेऊन मौलाना आझादांनी शुध्दी चळवळीवरुन मुस्लिमांच्या उद्वीग्न झालेल्या समाजमनाला सामान्य पातळीवर आणण्यासाठी काही प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी इस्लाम आणि विवेकस्वातंत्र्याचे दाखले दिले. इस्लाममध्ये जबरदस्तीचे अनुयायीत्व लादता येणार नसल्याची आठवण करुन दिली. मात्र त्याचवेळी शुध्दी सभेला राष्ट्रहिताची जाणिव करुन देताना ते म्हणाले, 

‘मी हिंदू आणि आर्य चळवळीतील ज्येष्ठ नेत्यांना विश्वास देऊ इच्छितो की, जर ते या चळवळीला योग्य समजत असतील तर त्यांनी ती जरुर सुरु ठेवावी. जर इस्माईली मुसलमान हिंदू धर्म स्विकारत असतील तरी त्यातून आमचे कोणतेच नुकसान होणार नाही.’ 

शुध्दी सभेने आग्रा शहरात मलकाना मुसलमानांचे शुध्दीकरण केले होते. त्यावरुन आग्रा शहरात हिंदू मुस्लिमांमध्ये मोठी दंगल भडकली. त्या दंगलीच्या चौकशी करण्यासाठी मौलाना आझाद आग्र्याला गेले. त्यावेळी शहरातल्या काळी मस्जिदमध्ये त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांना शांततचे अवाहन केले. ते म्हणाले, 

‘मलकाना मुसलमान आता हिंदू झाले आहेत. त्यांना धर्मपरिवर्तनाचा आधिकार आहे. शुध्दी चळवळीने अगदी सय्यद वगैरेंनाही शुध्दीचे आमंत्रण दिले तर त्यावरही आक्षेप घेण्याचे कारण नाही.’

एकीकडे धर्मांतराचे विवेक स्वातंत्र्य मान्य करुन आर्य समाजाच्या नेत्यांना राष्ट्रहिताचे आवाहन करणारे मौलाना आझाद आधिकारवाणीने मुस्लिमांना याविरोधात प्रतिक्रिया देऊ नका असे सुचवत होते. त्यांनी आपल्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, 

‘समाजाच्या पुनर्उभारणीत अतिउत्साहापेक्षा योजनाबध्द प्रयत्नांची गरज आहे. तब्लीगची स्थापना करुन त्यांच्या नावाने वादंग माजवण्यात आले आहे. ते इस्लामी परिप्रेक्ष्यात चुकीचे आहे. त्यामुळेच या वादातून भारतात इस्लामला फायदा नाही तर हानी पोहोचली आहे. आजदेखील इस्लामच्या नावाने ज्या जमातवादी कारवाया केल्या जात आहेत, त्यामुळे इस्लामी अस्मितेचे मोठे नुकसान झाले आहे.’ 

मौलाना आझादांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी अडसर ठरणाऱ्या प्रत्येक बाबीवर टिका केली होती. अयोध्येत गोहत्येवरुन दंगल झाल्यानंतर मौलानांनी मुसमलानांना फटकारले होते. ते म्हणाले होते, ‘हिंदूसोबत राष्ट्र म्हणून एक व्हा, आपण राष्ट्रीयत्वाचे अविभाज्य घटक आहोत’

२५ ऑगस्ट १९२१ मध्ये मौलाना आझादांनी आग्र्याच्या खिलाफत चळवळीच्या सभेत मुस्लिमांना हिंदूसोबत एक राष्ट्र म्हणून ऐक्य स्थापन करण्याचे आवाहन केले. ते मुस्लिमांना म्हणाले, 

‘प्रेषित मोहम्मद यांनी मदिन्यातील रहिवाशी आणि मुर्तीपूजकांसोबत जो व्यवहार केला होता. तोच व्यवहार मुस्लिमांनी हिंदूसोबत करायला हवा. त्यांनी हिंदूसोबत प्रेमाचे संबंध निर्माण करावेत आणि एक राष्ट्र म्हणून संघटीत व्हावे.’  

मौलाना आझाद स्वतःला आणि मुस्लिम समाजाला भारतीय राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयत्व यांचा अविभाज्य घटक मानत. आपल्याशिवाय भारतीय राष्ट्रवादाची संकल्पना पुर्ण होऊ शकत नाही आणि या संकल्पनेत सामील होण्यासाठी मला इस्लामचा अभिमान सोडण्याची गरज नाही, असे त्यांचे मत होते. २७ नोव्हेंबर १९४०ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ५३व्या आधिवेशनातील भाषणात त्यांनी हेच स्पष्ट केले.  ते म्हणतात,

‘मी मुसलमान आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. त्याची तेराशे वर्षांची परंपरा हा माझा वारसा आहे. त्यातला अगदी छोटासा भाग सुध्दा वाया जाऊ द्यायला मी तयार नाही. इस्लामचे शिक्षण, इतिहास, तत्वज्ञान आणि संस्कृती हा माझा खजिना आहे. त्याचे संरक्षण करणे, हे माझे कर्तव्य आहे. त्याच्या धार्मिक सांस्कृतिक वातावरणात एक मुसलमान म्हणून माझी खास ओळख आहे. त्यात कुणी ढवळाढवळ केलेली मला खपणार नाही. या माझ्या संवेदनक्षमतांखेरीज माझ्यापाशी आणखी एक विशेष भावना आहे, ती माझ्या वास्तव जीवनातून उदयाला आलेली आहे. इस्लामची चेतना मला थोपवू शकत नाही. खरे तर तीच या मार्गावरील माझी मार्गदर्शक आहे. मी भारतीय आहे, हे मी अभिमानाने सांगतो. भारतीय राष्ट्रीयत्वाचा मी एक अविभाज्य असा भाग आहे. माझे महत्त्व असे की, माझ्याशिवाय त्याच्या अभिमानाला लावलेला शुभसूचक तीळ अपुरा आहे. मी त्याच्या घडणीचा एक अविभाज्य घटक आहे. ही माझी श्रध्दा आहे.’ 

बहुसंख्याकांवरील अविश्वासतून सुरु असलेल्या इस्लामी राज्याचे आंदोलन थांबवण्यासाठी मौलाना आझाद यांनी मुस्लिमांना दिलेला हा विश्वास होता. ते मुस्लिमांना भारतावरील त्यांच्या आधिकारांची आठवण करुन देत होते. पण अवघ्या दहा वर्षात त्यांचा हा विश्वास एका विदारक वास्तवाचे रुप घेउन, शरणार्थी बनून त्यांच्या अंगणात आला आणि पाकिस्तान बनल्यानंतर भारतात राहिलेल्या मुसलमानांना त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागली. 
 
- सरफराज अहमद

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter