पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानात तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी गुरुवारी (दि.१) भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी फोनवरून चर्चा केली. अमेरिका भारताच्या आत्मसंरक्षणाच्या हक्काला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढ्याला पाठिंबा देत आहे, असे हेगसेथ यांनी सांगितले. पहलगाम हल्ल्यातील निरपराध नागरिकांच्या मृत्यूबद्दल हेगसेथ यांनी सहानुभूती आणि संवेदना व्यक्त केली.
राजनाथ सिंह यांनी हेगसेथ यांना पाठवलेल्या अधिकृत निवेदनात नमूद केले की, "पाकिस्तान हा एक दुष्ट देश आहे. तो जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. देशाला अस्थिर करत आहे. आता जगाने डोळे झाकून चालणार नाही."
राजनाथ सिंह यांनी हेगसेथ यांना पाठवलेल्या अधिकृत निवेदनात नमूद केले की, "दहशतवादी संघटनांना मदत, प्रशिक्षण आणि निधी पुरवण्याचा पाकिस्तानचा इतिहास असल्याचे स्पष्ट मत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी नोंदवले."
राजनाथ सिंह सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, "हेगसेथ यांनी भारताशी एकजुटीची भावना व्यक्त केली. भारताच्या आत्मसंरक्षणाच्या हक्काला पाठिंबा दिला. अमेरिकी सरकार दहशतवादाविरुद्ध भारताच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा देत आहे."
संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात सांगितले की, राजनाथ सिंह यांनी अमेरिकी संरक्षणमंत्र्यांना पाकिस्तानचा इतिहास सांगितला. पाकिस्तान दहशतवादी संघटनांना पाठिंबा देत आहे. त्यांना प्रशिक्षण आणि निधी पुरवत आहे. पाकिस्तान जागतिक दहशतवादाला खतपाणी घालत आहे. जागतिक समुदायाने दहशतवादाच्या क्रूर कृत्यांचा ठाम निषेध करावा, असे आवाहन सिंह यांनी केले.
परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि अमेरिकी परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्यातील चर्चेनंतर एका दिवसाने ही बातचीत झाली. रुबियो यांनी जयशंकर यांना सांगितले की, अमेरिका दहशतवादाविरुद्ध भारताशी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. दक्षिण आशियातील तणाव कमी करण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी भारताने पाकिस्तानशी सहकार्य करावे, असेही त्यांनी सुचवले.