जागतिक दहशतवादाचे पालकत्व पाकिस्तानकडेच

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांनी जीव गमावला, तर २० हून अधिक लोक जखमी झाले. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएकडे आहे. नुकताच एनआयएच्या प्राथमिक अहवाल समोर आला आहे. 

एनआयएच्या प्राथमिक अहवालात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या अहवालानुसार, हा हल्ला पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा, आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराच्या सहकार्याने करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 
 
पाकिस्तानच्या दहशतवादाचा पर्दाफाश करणारा काश्मीर ते काबूल आणि त्यापलीकडेही (फ्रॉम काश्मीर टू काबूल अॅन्ड बियॉन्ड) असे शीर्षक असलेला दस्तावेज (डॉसियर) सरकारने आज जारी केला. पाकिस्तानच वैश्विक दहशतवादाचा जनक आहे, केवळ भारतातच नव्हे तर अफगाणिस्तान, इंग्लंड, रशिया, इराण यांसारख्या जगातील अन्य देशांमध्येही पाकिस्तानने दहशतवाद पसरवला आहे, असे आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून या दस्तावेजात म्हटले आहे.

‘‘पाकिस्तानचा पूर्वेतिहास दहशतवादाला आश्रय देण्याचा, दहशतवादी निर्यात करण्याचाच आहे. हा देश जगातील सर्वात धोकादायक देश बनला आहे,’’ असे भारतीय तपास यंत्रणेने या डॉसियरमध्ये म्हटले आहे. तसेच पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांची यादी तयार करताना त्यात पाकिस्तान सरकारचा असलेला थेट सहभाग याकडेही अंगुलिनिर्देश केला आहे. या निमित्ताने भारताने राजनैतिक रणनीतीद्वारे पाकिस्तानवर संभाव्य लष्करी कारवाईसाठीदेखील दबाव वाढवला आहे.

अनेक हल्ल्यांत सहभाग
रशियातील दहशतवादी घटनांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचा उल्लेख करताना डॉसियरमध्ये म्हटले आहे, की २२ मार्च २०२४ रोजी मॉस्कोच्या बाहेरील एका कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या हल्ल्यात किमान १४५ लोकांचा मृत्यू झाला. यात चार दहशतवादी गोळीबार करताना दिसले. याप्रकरणी एप्रिल २०२५ मध्ये, मॉस्को दहशतवादी हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचा संबंध समोर आला.

रशियन अधिकाऱ्यांनी या घटनेचा सूत्रधार ताजिक नागरिक असल्याचे शोधले. त्याचा पाकिस्तानशी संबंध असल्याची चौकशी सुरू आहे. यातून स्पष्ट होते, की हल्लेखोरांना पाकिस्तानी यंत्रणेकडून लष्करी तसेच वैचारिक पाठिंबा मिळाला असावा. त्याचप्रमाणे ब्रिटनमध्ये, सात जुलै २००५ रोजी, चार आत्मघातकी हल्लेखोरांनी लंडनच्या वाहतूक नेटवर्कवर हल्ला केला होता, ज्यामध्ये ५२ लोक ठार झाले होते आणि ७७० हून अधिक लोक जखमी झाले होते. हा हल्ला करणाऱ्या चार ब्रिटिश इस्लामिक दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण आणि शिक्षण मिळाले होते. यातील महम्मद सिद्दीक खान, शहजाद तन्वीर आणि जर्मेन लिंडसे हे तीन हल्लेखोर हल्ल्यापूर्वी दोन वर्षे म्हणजे २००३ ते २००५ दरम्यान पाकिस्तानमध्ये होते.

डॉसियरमध्ये म्हटले आहे, की इराणमध्ये पाकिस्तानस्थित सुन्नी अतिरेकी गट जैश उल-अदलने सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात इराणी सुरक्षा दलांवर वारंवार हल्ले केले आहेत. सीमेपलीकडून हल्ले करणाऱ्या सुन्नी दहशतवाद्यांना पाकिस्तान आश्रय देत असल्याचा आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप इराणनेही वारंवार केला आहे.

लादेनही पाकमध्येच होता
पाकने ओसामा बिन लादेनला आश्रय दिल्याकडेही या डॉसियरमध्ये लक्ष वेधले आहे. ‘‘२०११ मध्ये अमेरिकेने पाकमधील अबोटाबादमध्ये लादेनला यमसदनाला धाडले. लादेन पाकमध्ये लपला होता. यामुळे पाकचा खरा चेहरा उघडकीस आणला. लादेनने पाकच्या लष्करी अकादमीजवळ अनेक वर्षे सुरक्षित वास्तव्य केले’’ असे यात म्हटले आहे.

डॉसियरमधील आरोप
अफगाणिस्तानमध्ये देखील तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा पूर्ण हात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय अफगाण तालिबान आणि हक्कानी नेटवर्कला निधी, प्रशिक्षण आणि सुरक्षित आश्रय देत आहे २००८ मध्ये काबूलमधील भारतीय दूतावासावर झालेला बॉम्बस्फोट आणि २०११ मध्ये काबूलमधील अमेरिकन दूतावासावर झालेला हल्ला यासह अफगाण नागरिकांवर आणि आंतरराष्ट्रीय सैन्यावर झालेल्या असंख्य प्राणघातक हल्ल्यांसाठी पाकपुरस्कृत गट जबाबदार

संयुक्त राष्ट्रसंघाध्येही भारताने पाकिस्तानला वेगळे पाडले 
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दहशवाद पोसण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर जगभरातून टीका होतेय. त्यातच आता संयुक्त राष्ट्रसंघात भारताने पाकला वेगळे पाडले आहे. संयुक्त राष्ट्रात भारताच्या उपस्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी पाकिस्तानला फटकारलं असून देशाचा उल्लेख करताना त्यांनी दुष्ट देश असं म्हटलं आहे.

योजना पटेल यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीचा दाखला दिला. त्यात त्यांनी कबुल केलं होतं की, पाकिस्तानात दहशतवादाला प्रोत्साहन दिलं गेलं. पटेल म्हणाल्या की, जेव्हा खुद्द मंत्री मान्य करीत असतील तर बाकी काहीच बोलण्याची गरज नाही.

यूएनच्या दहशतवादविरोधी बैठकीत बोलताना योजना पटेल म्हणाल्या, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी मान्य केलंय की पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतं. जगभरात दहशतवाद पसरवणारा देश म्हणून पाकिस्तानची ओळख असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे इतर देशांनी या संकटांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

२००८ नंतरचा सर्वात मोठा हल्ला
योजना पटेल यांनी संयुक्त राष्ट्रात २२ एप्रिल रोजी पहलगा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. या हल्ल्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्या म्हणाल्या की, हा हल्ला २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतरचा भारतातला सर्वात मोठा हल्ला आहे.

कित्येक वर्षांपासून भारत दहशतवादाचा शिकार होत आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री स्वतःला म्हणतात की, त्यांच्या देशात अतिरेक्यांना ट्रेनिंग दिलं जातं. परंतु ही काही नवीन गोष्ट नाही. पाकिस्तान आधीपासून असे उद्योग करत आलेलं आहे, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानवर ताशेरे ओढले.

"पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी या मंचाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला आणि भारतावर खोटे आरोप लावले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताला समर्थन देण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि इतर देशांचे आभार मानते. भारत कधीच पीडितांना विसरणार नाहीत आणि त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जातील." असंही त्यांनी स्पष्ट केलं.