प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बनली उपजिल्हाधिकारी : वसिमा शेखचा संघर्षमय प्रवास!

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
उपजिल्हाधिकारी वसिमा शेख
उपजिल्हाधिकारी वसिमा शेख

 

मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे दिला जाणारा फातिमाबी कार्यगौरव पुरस्कार अमरावतीच्या विद्यमान उपजिल्हाधिकारी  वसिमा शेख यांना नुकताच प्रदान करण्यात आला. त्या निमित्ताने त्यांची ही संघर्षकथा खास आवाज मराठीच्या वाचकांसाठी... 


'अगर किसी भी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है।' २०२० च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत अव्वल ठरलेल्या वसीमा शेखकडे पाहून याची प्रचीती येते. उपजिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न, तिची जिद्द इतकी प्रबळ होती की, परिस्थितीला तिच्यापुढे गुडघे टेकण्यावाचून पर्याय उरला नाही.  


आपलं ध्येय साध्य करण्यासाठी तिनं निवडलेली वाट कोणती होती? तिचा इथवरचा प्रवास कसा झाला ?

वसिमा मुळची नांदेड जिल्यातील लोहा या गावची. वसिमाचा जन्म तसा गरीब कुटुंबातला. त्यात ती तिच्या घरातील चौथे अपत्य. मागील २० - २२ वर्षांपासून वडील सतत आजारी. त्यात चार बहिणी-दोन भाऊ आणि आई-वडील असा हा आठ जणांचा परिवार. खाणारी तोंडे आठ आणि कमावणारी फक्त दोन असे हे व्यस्त प्रमाण होते. त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. या सगळ्यामध्ये शिक्षण मिळणे हाच एक संघर्ष होता. चालू असलेले शिक्षण कडेपर्यंत नेऊन पूर्ण करणे हे त्याहून अवघड होते. मात्र आल्या परिस्थितीशी दोन हात करत वसिमाचा गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेपासून शैक्षणिक प्रवास सुरु झाला. त्यानंतर १० वी पर्यंतचे शिक्षण 'बाळ ब्रम्हचारी वैरागी महाराज विद्यालय' या खासगी संस्थेतून झाले. पुढे कंधार येथील 'प्रियदर्शनी कॉलेज' मधून कला शाखेतून तिने बारावी पूर्ण केली. २०१५ मध्ये तिचे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. इथं पर्यंतचे शिक्षण हाही वसिमाच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा होता. या यशात आपल्या भावाचा आणि आईचा महत्वाचा वाटा असल्याचे वसिमा सांगते. 

 

हे सर्व करत असतानाच २०१७ च्या ‘विक्रीकर निरीक्षक’ या पदासाठी महाराष्ट्र राज्यसेवा नागरी परीक्षेचा निकाल लागला आणि ही जिद्दी वसिमा विक्रीकर निरीक्षक अधिकारी झाली. त्यामुळे थोडी का होईना, आर्थिक दृष्ट्या ती स्थिरावली. मात्र वसिमाचे स्वप्न अजूनही अपूर्ण होते, कारण तिला ध्यास होता उपजिल्हाधिकारी पदाचा.


मग..

वसिमा पुन्हा अभ्यासाला लागली. हातात ‘विक्रीकर निरीक्षक’ चे पद होते त्यामुळे काम आणि अभ्यास ही दुहेरी जबाबदारी आता खांद्यावर आली होती. हा अभ्यास काही कमी नव्हता आणि सोपाही नव्हता. कोणती पुस्तकं वाचावी? ती कुठं मिळतील? कोणती पुस्तकं वाचू नये? असा सगळा तिचा गोंधळ उडाला होता. पण उपजिल्हाधिकारी होण्याचा तिचा निश्चय दृढ होता, प्रयत्न प्रामाणिक होते आणि अभ्यासात सातत्य होतं. तिने पूर्वी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांचे व्हिडिओ पाहिले. त्यांचे मार्गदर्शन घेतले. आणि २०१९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उपजिल्हाधिकारी पदासाठीची जाहिरात आली. २०२० मध्ये ध्येयवेडी वसिमा उपजिल्हाधिकारी झाली.     


शिक्षण घेतलं, अभ्यास केला, परीक्षा दिली आणि पास झाली हे एवढ सोपं गणित कधीच नव्हतं. या सर्वांमागे एक छुपा आणि मोठा संघर्ष होता. बरीच आव्हाने समोर होती. या संदर्भात त्यांच्याशी बोलताना त्यांनी खूप छोट्याछोट्या गोष्टी सांगितल्या ज्याचा आपल्या जडणघडणीवर मोठा परिणाम होत असतो. त्यांच्या बारावी पर्यंत घरात लाईट नव्हती; एकाच खोलीत एवढे लोक राहत होते; ग्रामीण भागात असणारी साधनांची कमतरता; महिलांच्या प्रति असणारा समाजाचा उदासीन दृष्टीकोन, त्यात पाळावी लागणारी परदा पद्धती या सगळ्यातून तगून राहून तरून जाण्याची कमाल वसिमानं करून दाखवली. घरच्या आर्थिक पार्श्वभूमीच विचार करता एका अशा परीक्षेचा अभ्यास करणे ज्याचा निकाल कधीही वेळेत लागत नाही.  शिवाय मुलगी वयात आली की समाजात लग्नाचा विषय सुरू होतो.  या गोष्टींचा परिणाम नाही म्हणलं तरी कळत नकळत होतच असतो. 'त्यात माझं पदवी पर्यंतचं शिक्षण झालेलं होतं. त्यानंतर दोन वर्षांनी या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. दरम्यानच्या काळात लोकांसाठी, नातेवाईकांसाठी मी चर्चेचा विषय झाले होते' असेही तिने सांगितले. तिनं परिक्षा दिली आणि दरम्यान तिचे लग्नही झाले. नवसहजीवनासोबतच परीक्षेच्या निकलाचीही ती आतुरतेने वाट बघत होती. आणि एके दिवशी निकाल जाहीर झाला.


निकाल आल्या नंतर काय बदललं?

आधी चर्चेचा विषय असणारी वसिमा समाजासाठी रोल मॉडेल बनली. जे लोक आधी नावं ठेवत होते तेच आता कौतुक करायला लागले. लोकांचा दृष्टिकोन बदलला होता. लग्न झाल्यापासून आठ दिवसातच उपजिल्हाधिकारी पदासाठीचा निकाल लागला. त्यामुळे सासरच्या लोकांमध्येही वसिमाविषयीचा आदर वाढला. 


अशा निकालाचा समाजावर होणारा परिणाम:

वसिमा सांगते की, अशा निकालांचा जवळपासच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होतो. कारण हे आपल्या आजूबाजूचे चालते बोलते प्रत्यक्ष उदाहरण असते. कारण त्यांनी आपला संघर्ष पाहिलेला असतो. कधीतरी त्यांच्याचसारखे असणारे आपण इथपर्यंत पोहचलो हे बघून त्यांचा आत्मविश्वास वाढतो. मला भेटणाऱ्या मुली मला म्हणत असतात, आम्हीही हे करू शकतो.


भविष्याकडून काय अपेक्षा?

भविष्यात काय करण्याची इच्छा आहे हे विचारलं असता त्या म्हणाल्या की, मुस्लिम समाजात आधीच शिक्षणाचे प्रमाण कमी आहे त्यातही महिला साक्षरतेचे प्रमाण अजूनच कमी आहे. ते वाढत जावे. १००% व्हावे असे वाटते.


समाजाला संदेश:

मी जे केले तोच एक संदेश नव्हे का! हे पहा अडथळे प्रत्येक ठिकाणी येतात. अशा वेळी आपला आत्मविश्वास डगमगतो. आणि आपण थांबतो. तर हे होता कामा नये. येणाऱ्या प्रत्येक संकटाला हिम्मतीने सामोरे गेले पाहिजे. आव्हानाला प्रोत्साहन समजून आपण सातत्याने लढत राहिलो तर गोष्टी सोप्या होतात. काहीही होवो जिद्द जिवंत ठेवली पाहिजे.