शिवपुराण कथेसाठी मुस्लिमाची जमीन

Story by  test | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
तुरीच शेत
तुरीच शेत

 



परभणी : धार्मिक सहिष्णुता आणि बंधुभावामुळे विविधतेत एकता हे भारताचे सांस्कृतिक सूत्र उठून दिसते. विविध जाती धर्मांच्या लोकांतील सलोखा हाच आपल्या देशाच्या ऐक्याचा पाया आहे. परभणीमध्ये आता हिंदू - मुस्लिम एकोप्याचे अनोखे उदाहरणसमोर आले आहे.

 

येथे १३ ते १७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या शिवपुराण कथा या भव्य धार्मिक कार्यक्रमासाठी मुस्लिम तरुणाने पुढाकार घेत स्वतःची ६० एकर शेतजमीन विनामूल्य वापरासाठी दिली. एवढेच नाही तर यासाठी ६० पैकी ४३ एकर क्षेत्रातील तूर, साडेतीन एकरातील बहरलेल्या हरभरा पिकावर त्याने नांगर फिरवला.


परभणी येथे पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांची विख्यात शिवपुराण कथा होणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी खासदार संजय जाधव काही वर्षांपासून प्रयत्नात होते. या पार्श्वभूमीवर परभणीला अचानक १३ ते १७ जानेवारी दरम्यानची तारीख देण्यात आली.  पं. प्रदीप महाराज मिश्रा यांच्या या कथेला लाखो भाविक उपस्थित राहतात. त्यामुळे एवढ्या कमी दिवसांत विस्तीर्ण जागा कुठे मिळणार ? असा प्रश्न खासदार जाधव यांच्या पुढे होता. त्यांनी ‘सय्यद बिल्डर अॅँड डेव्हल्पर’ चे हाजी शोहेब यांना जागेसंदर्भात विचारणा केली. त्यांनी तातडीने शेतात जागा देण्याचे मान्य केले. त्यासाठी साठ एकर जागा देण्यात आली आहे.


सहन केले लाखोंचे नुकसान
हाजी शोहेब यांनी प्लॉटिंग सोडून त्यांच्याच साठ एकर पैकी ४३ एकर क्षेत्रात तुरीचे पीक घेतले होते. ही जागा कथा आयोजनासाठी देऊ शकतो, असे त्यांनी खासदार संजय जाधव यांना सांगितले. परंतु, तुरीचे पीक कसे काढणार? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर शोहेब यांनी कुठलाही विचार न करता ४३ एकरवरील तुरीसह साडेतीन एकरातील हरभरा पिकावर नांगर फिरविला आणि जागा साफ करून दिली. शिवाय इतरही १४ एकर जमीन दिली. हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांनी लाखो रुपयांचे नुकसान सहन केले.


देवाचे कार्य आहे हे समजल्यानंतर ते विना अडथळा पार पडले पाहिजे असे आमचा धर्म सांगतो. त्यामुळे या पवित्र कार्यात माझा व माझ्या कुटुंबाचाही सहभाग असावायासाठी आमच्या कुटुंबाने हा निर्णय घेतला व जागा देऊ केली.
- हाजी शोहेब, परभणी