ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका बनावट व्हिडिओविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण न केलेले विधान आपल्या तोंडी घालण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जावेद अख्तर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) याबद्दल संताप व्यक्त केला. हा व्हिडिओ पूर्णपणे बकवास असून त्यात काडीमात्र सत्य नसल्याचे त्यांनी सांगितले. या व्हिडिओमध्ये त्यांच्या आवाजाची नक्कल करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्यात आला आहे.
आपल्या पोस्टमध्ये जावेद अख्तर लिहितात, "सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत आहे. यात मी पंतप्रधान आणि सरकारबद्दल काहीतरी बोलताना दिसत आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की हा व्हिडिओ १०० टक्के बनावट आहे. यात माझा आवाज वाटावा यासाठी एआयचा वापर केला गेला आहे. मी याबाबत सायबर क्राईम विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करणार आहे."
हा व्हिडिओ पाहिल्यास लक्षात येते की, त्यातील दृश्ये अख्तर यांच्या एका जुन्या मुलाखतीमधील आहेत. मात्र, त्या दृश्यांवर दुसराच ऑडिओ डब करण्यात आला आहे. ओठांची हालचाल आणि आवाज जुळवण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची दिशाभूल होत आहे.
गेल्या काही काळापासून बॉलीवूडमधील अनेक कलाकार 'डीपफेक' तंत्रज्ञानाचे बळी ठरले आहेत. याआधी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, काजोल आणि अभिनेता आमिर खान यांचेही असेच बनावट व्हिडिओ व्हायरल झाले होते. आता या यादीत जावेद अख्तर यांचेही नाव जोडले गेले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी कडक कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.