इराणमध्ये कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि गगनाला भिडलेली महागाई यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. नागरिक संतापले असून त्यांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून, यामध्ये किमान सात लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. २०२२ नंतर इराणमधील हे सर्वात मोठे आंदोलन असल्याचे मानले जात आहे. राजधानी तेहरानसह अनेक ग्रामीण भागांतही या आंदोलनाचे लोण पसरले आहे.
इराणमधील या स्फोटक परिस्थितीबद्दलच्या १० महत्त्वाच्या गोष्टी :
१. दोन दिवसांत सात बळी: इराणमध्ये बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांत झालेल्या हिंसाचारात सात लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आंदोलक आणि सुरक्षा दलाच्या जवानांचा समावेश असल्याचे अधिकारी आणि मानवाधिकार गटांनी सांगितले आहे.
२. तेहरानबाहेर पसरले लोण: सुरुवातीला केवळ राजधानी तेहरानमध्ये असलेली ही निदर्शने आता अनेक प्रांतांमध्ये पसरली आहेत. विशेषतः 'लुर' (Lur) लोकसंख्या असलेल्या भागांत आंदोलनाची तीव्रता जास्त आहे. या विस्तारामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे.
३. अझना शहरात हिंसाचार: लोरेस्तान प्रांतातील अझना (Azna) शहर हिंसाचाराचे केंद्र बनले आहे. येथे रस्त्यांवर आगी लावण्यात आल्या असून गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. येथील संघर्षात तीन लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त निम-सरकारी 'फार्स' वृत्तसंस्थेने दिले आहे.
४. लोर्डेगनमध्ये गोळीबार: चहारमहाल आणि बख्तियारी प्रांतातील लोर्डेगन (Lordegan) शहरातही गोळीबार झाला. येथील हिंसाचारात दोन मृत्यू झाल्याचे 'फार्स'ने म्हटले आहे, तर हे मृत्यू निदर्शकांचे असल्याचे अमेरिकेतील मानवाधिकार गटाचे म्हणणे आहे.
५. फुलादशहरमधील मृत्यू: इसफहान प्रांतातील फुलादशहर (Fuladshahr) येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
६. बसिज स्वयंसेवकाचा मृत्यू: लोरेस्तानमधील कुहद्रष्ट (Kouhdasht) येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान 'बसिज' दलाच्या (क्रांतिकारी गार्डचे स्वयंसेवक दल) एका २१ वर्षीय सदस्याचा मृत्यू झाला. या घटनेत १३ पोलीस आणि बसिज सदस्य जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
७. आर्थिक संकट हेच मुख्य कारण: महागाई, चलनाचे अवमूल्यन आणि वाढता राहणीमान खर्च यामुळे हा उद्रेक झाला आहे. इराणचे चलन असलेल्या 'रियाल'ची किंमत विक्रमी पातळीवर घसरली असून, १ अमेरिकन डॉलरची किंमत आता सुमारे १४ लाख रियाल झाली आहे. भाडे आणि जीवनावश्यक वस्तू परवडत नसल्याने विद्यार्थी आणि व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत.
८. सरकारकडून शटडाऊनचा निर्णय: आंदोलनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने बुधवारी ३१ पैकी २१ प्रांतांमध्ये अचानक सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. यादरम्यान बाजारपेठा, विद्यापीठे आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली.
९. नेतृत्वावर वाढता दबाव: इराणचे ८६ वर्षीय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासमोर आर्थिक संकटासह पाणी टंचाई आणि नागरी असंतोषाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सरकारवर सध्या विविध आघाड्यांवरून दबाव वाढत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
१०. सुरक्षा कारवाई आणि अटकसत्र: कुहद्रष्टमध्ये हिंसाचारानंतर किमान २० लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच, १०० बेकायदेशीर पिस्तुले जप्त केल्याचे आणि आणखी सात जणांना अटक केल्याचे वृत्त सरकारी वाहिनीने दिले आहे.