दृढ इ‍च्छाशक्तीने आपला उद्देश साध्‍य होईल – आरिफ मोहम्मद खान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान

 

आपल्या देशामध्‍ये विविध भाषा आहेत आणि त्‍या सर्व भाषा समृद्धही  आहेत. आपल्‍या देशामध्‍ये एक संपर्क भाषा म्हणून हिंदीकडे आपण पाहतो;याचे कारण हिंदी आपली राजभाषा आहे. त्यामुळेच हिंदीच्‍या प्रचार-प्रसार करण्‍यासाठी योगदान देणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी दृढ इच्छाशक्तीची गरज असून, त्‍यातूनच आपण उद्देश साध्‍य करू शकणार आहोत , असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी पुणे येथे केले.

याप्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा, आय.ओ.बी. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी अजयकुमार श्रीवास्तव , मुंबईच्या  मुख्‍य प्राप्तीकर आयुक्त जहांजेब अख्‍तर, उपस्थित  होते. याप्रसंगी ‘नगर राजभाषा कार्यान्वयन समिती’ पुरस्कार प्रदान करण्‍यात आले. केंद्र सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्‍यात आले.

तिस-या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन पुण्‍यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्‍ये करण्‍यात आले असून या संमेलनाच्‍या दुस-या दिवशीच्‍या सत्रामध्‍ये आरिफ मोहम्मद खान यांचे शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी भाषण झाले. या सत्रामध्‍ये ‘नगर राजभाषा कार्यान्वयन समिती’ च्‍या वतीने विविध मान्यवरांच्या व्याख्‍यानांचा कार्यक्रम झाला.

आरिफ मोहम्मद खान याप्रसंगी म्हणाले की, हिंदी भाषेच्या सशक्तीकरणासाठी कार्य करणा-या समितीला मी शुभेच्छा देतो; आपल्या मातृभाषेबरोबरच हिंदीच्या सशक्तीकरणासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे. हिंदी आणि  अन्य भाषा एकमेकांनाही समृद्ध करतात; भारताचा वारसा अधिक समृद्ध करण्‍यामध्‍ये हिंदीसह इतर भाषांचेही योगदान मोठे आहे. राजभाषेचा वेगाने विकास करण्‍याची जबाबदारी आपलीच आहे. हिंदी वास्तविक संवादाची भाषा बनली पाहिजे. असेही ते  म्हणाले.

मुंबईच्या  मुख्‍य प्राप्तीकर आयुक्त जहांजेब अख्‍तर यावेळी म्हणाल्या की, विश्‍वगुरू बनण्‍याची भारताची इच्छा, आकांक्षा आहे, आणि यासाठी शाब्दिक संप्रेषण उपयुक्त ठरणार आहे.