शांती आणि प्रगतीचे प्रतिक ठरले आहे आसाममधील हे मुस्लीम बहुल गाव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
धामपूर येथील स्थानिक रुग्णालयातील डॉक्टर आणि पॅरामेडिक्स
धामपूर येथील स्थानिक रुग्णालयातील डॉक्टर आणि पॅरामेडिक्स

 

दौलत रेहमान/ दामपूर
 
स्वातंत्र्यसैनिक अक्रम हुसेन सैकिया, सॉफ्टवेअर अभियंता अल्हाज बद्रुद्दीन अहमद, माउंट एव्हरेस्ट विजेता हेदायत अली,जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आफताब हुसेन सैकिया,राजकारणी आणि माजी मंत्रीनुरुल हुसेन,साहित्यिक आणि PHE चे माजी मुख्य अभियंता सफिउर रहमान सैकिया, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी उपनिबंधक तालमीजुर रहमान,आसाम पोलिस अधिकारी सुमन साहनाज,सुप्रसिद्ध डॉक्टर अख्तारा सैकिया या सर्वात काय समान आहे? तर उत्तर आहे, या सर्वांचा जन्म आसाममधील कामरूप जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुस्लीमबहुल गावात दामपूर येथील आहे.या गावातील यशस्वी व्यक्तींची यादी बरीच मोठी आहे. या यशामागचे  मुख्य कारण म्हणजे  गावातील अनुकूल वातावरण. शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तींला यश मिळवण्यासाठी हे गाव प्रेरित करते.  

राजधानी गुवाहाटीपासून सुमारे ४५ किमी अंतरावर असलेल्या दामपूरमध्ये स्थानिक आसामी मुस्लिमांची वस्ती आहे. दामपूरमध्ये मुस्लिम लोकसंख्या १०० टक्के असली तरीही तेथील मुस्लिमांनी भारतातील मुस्लिम गावाशी संबंधित अनेक मिथक आणि रूढीवादी संकल्पना मोडीत काढल्या आहेत.

देशातील इतर मुस्लिम गावांमध्ये साक्षरतेचे प्रमाण खूपच कमी आहे याउलट दामपूरचे जवळपास ९० टक्के रहिवासी साक्षर आहेत. दामपूर शासकीय उच्च-माध्यमिक विद्यालयाने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे अनेक तल्लख मेंदू निर्माण केले आहेत. येथे चार सरकारी उच्च माध्यमिक शाळा असून त्यापैकी एक मुलींसाठी आहे, विज्ञान शाखेसाठी एक खाजगी वरिष्ठ माध्यमिक शाळा, नऊ सरकारी प्राथमिक शाळा, एक सरकारी उच्च मदरसा शाळा, दोन राष्ट्रीय विद्यालये (इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या धर्तीवर स्थानिक माध्यमाच्या शाळा चालतात ) आणि दामपूरमधील चार खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत.
 
नं. ६७ दमपूर गाव पंचायतीचे माजी अध्यक्ष हैदोर अली सैकिया यांनी आवाज-द व्हॉईसला सांगितले की, त्यांचे गाव शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच पुढे असते. "सरकारी उच्च माध्यमिक शाळा आणि प्राथमिक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण बरोबरच, खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि राष्ट्रीय विद्यालये सध्याच्या तरुण पिढीला शैक्षणिक आणि व्यावसायिक करिअरच्या क्षेत्रातील भविष्यातील आव्हानांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी सक्षम करत असतात."

प्रख्यात साहित्यिक आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकीचे माजी मुख्य अभियंता सफिउर रहमान सैकिया म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीही दामपूरने शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिले. एवढेच नाही तर दामपूरमध्ये मुलींनाही शिक्षणांसाठी कधीच कोणत्या प्रकारची अडचण किंवा भेदभावाचा सामना करावा लागला नाही.भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी मुस्लिम समाजातील मुलींचे शिक्षण हे एक दूरचे स्वप्न होते मात्र  दमपूर त्याला अपवाद होते. याचेच एक उत्तर उदाहरण म्हणजे गावातील वन-अधिकारी आणि स्वातंत्र्यसैनिक अलहाज बदरुद्दीन अहमद. यांच्या चारही मुलींना शिक्षण मिळावे म्हणून ते आग्रही होते. त्यांच्या याच प्रयत्नातून त्यांच्या दोन मुली सरकारी शाळेत शिक्षिका झाल्या तर एक आसाममध्ये सरकारी अधिकारी आहे.

दमपूरमधील मुलींच्या शिक्षणाचा प्रसार आणि सक्षमीकरणाचे आणखी एक उदाहरण म्हणजे सुमन साहनाज ही गेल्या वर्षी आसाम पोलिसात दाखल झाली. सशस्त्र दलात भरती होण्याचे तिचे स्वप्न साकार करण्यासाठी सुमन लोक साखर झोपेत असताना अंधारात पळत असे.  अखेर तिच्या मेहनितीचे चीज झाले आणि ती आसाम पोलिस दलात दाखल झाली.

याव्यतिरिक्त १९२७ मध्ये दामपूरच्या विद्यार्थ्यांनी जात,पंथ आणि धर्माची पर्वा न करता तरुण पिढीला एकत्र करण्यासाठी दामपूर चत्र सन्मिलानी या नावाने एक व्यासपीठ तयार केले. दरवर्षी दामपूर चत्र सन्मिलानी वार्षिक अधिवेशन आयोजित करते, ज्यात विविध क्षेत्रातील लोक गाणी आणि नृत्यांद्वारे भारताची अद्वितीय वैविध्यपूर्ण संस्कृती साजरी करतात.

या गावातील लोक स्वतःच्या आर्थिक आणि इतर रसदेतून दामपूर इस्लामिक मदरसा चालवतात. या मदरशाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हैदोर अली सैकिया यांनी सांगितले की, इस्लामिक शिक्षणाव्यतिरिक्त या मदरसा  विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचे धडेही देते. येथे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि इतर ऐतिहासिक दिन मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याशिवाय कुठल्याही असामाजिक आणि मूलतत्त्ववादी शक्तींकडून मदरशाचा (गैर) वापर होणार नाही यावर व्यवस्थापन समिती कडी नजर ठेवते, असेही हैदर अली सैकिया म्हणाले.

दामपूरमध्ये २६ मशिदी असून प्रत्येक मशिद इमाम शांती आणि बंधुतेचा संदेश देते. दामपूरचे लोक आपल्या आरोग्याबाबत अत्यंत जागरूक आहेत. गावात एक राज्य दवाखाना आणि दोन उपकेंद्रे आहेत. दवाखान्यात पुरेसे डॉक्टर,परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचारी आहेत. आरोग्य केंद्रांवर जीवनरक्षक आणि इतर आवश्यक औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच २१००० ग्रामस्थापैकी ४५ टक्के लोक हे शेतकरी आहेत. प्रामुख्याने भात,भाजीपाला उत्पादनात हे गाव स्वयंपूर्ण आहे.

दामपूरच्या सामाजिक-आर्थिक जीवनशैलीतून एकत्रित संस्कृती आणि परंपरा प्रतिबिंबित होते. दामपूरमधील विवाह मुख्यतः इस्लामिक रीतिरिवाजांवर आधारित आहेत परंतु यात आसामी हिंदूंमधील काही परंपरामधील साम्य दिसते. निकाह आणि रिसेप्शन समारंभात नववधू चमकदार पारंपारिक आसामी पोशाख मेखेला चादोर्स परिधान करतात तर नवरामुलगा हा शेरवानी आणि पागुरी (पगडी) परिधान करतो. या वेशभूषेमागील एक तर्क असाही सांगितला जातो की आसाममध्ये जेव्हा पहिल्यांदा मुस्लीम आले तेव्हा त्यांनी स्थानिक आसामी स्त्रियांशी लग्न केले त्यामुळे हा पोशाख प्रचलित झाला. 

जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती आफताब हुसैन सैकिया यांनी सांगितले की, "दमपूरबद्दल कोणी काहीही बोलले की मी नेहमीच तेथील आठवणीत रमतो. माझ्या आयुष्याची सुरुवातीची वर्षे याच गावात  गेल्यामुळे माझी नाळ कायम दामपूरशी जोडलेली असते. येथे मी अनेक मानवी मूल्यांचे धडे गिरवले आहेत. माझ्या पूर्वजांनी ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे." न्यायमूर्ती सैकिया हे मेघालय मानवाधिकार आयोगाचे संस्थापक अध्यक्ष देखील होते.

कामरूप जिल्ह्यातील हाजो या तीर्थक्षेत्राला  हिंदू,मुस्लिम आणि बौद्ध या तीनही धर्मातील लोक पूजतात. त्यामुळे धार्मिक सलोख्याची मरुभूमी म्हणून हे स्थळ जगप्रसिद्ध आहे. दामपूर हे हाजोच्या अगदी जवळ असल्याने हा  अनोखा जातीय सलोखा जपण्यात दामपुरचे मोलाचे योगदान असल्याचे मानले जाते.
 
अनुवाद: पूजा नायक 
-दौलत रेहमान/ दामपूर
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

WhatsApp | Telegram | Facebook 

| Twitter | Instagram | YouTube