डॉ. आसिफ इक्बाल आणि त्यांच्या चमूने ईशान्य भारतात केली पहिली स्टेम सेल शस्त्रक्रिया

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
डॉक्टर आसिफ इक्बाल त्यांच्या रुग्णासाह
डॉक्टर आसिफ इक्बाल त्यांच्या रुग्णासाह

 

आरिफुल इस्लाम, सुदीप शर्मा चौधरी, गुवाहाटी

ईशान्य भारतातील कर्करोग उपचारासाठी ओळखल्या जाणाऱ्या डॉ. बी. बोरोआ कॅन्सर इन्स्टिट्यूटने (बीबीसीआय) आधुनिक उपचार पद्धतीत एक नवीन मैलाचा दगड गाठला आहे. मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे युनिट असलेल्या गुवाहाटीमधील या संस्थेने ईशान्य भारतातील पहिले 'मॅच्ड अनरिलेटेड डोनर' (MUD) ॲलोजेनिक स्टेम सेल ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. ही संस्था अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत येणारी एक अनुदानित संस्था आहे.

या उपचार प्रक्रियेत रुग्णाच्या कुटुंबाबाहेरील दात्याचे स्टेम सेल्स वापरले जातात. ईशान्येच्या वैद्यकीय क्षेत्रातील ही एक मोठी झेप मानली जात आहे. डॉक्टरांनी नुकतेच एका १९ वर्षांच्या मुलावर हे ट्रान्सप्लांट केले. तो आता पूर्णपणे बरा झाला असून त्याला रुग्णालयातून सुटीही देण्यात आली आहे.

स्टेम सेल ट्रान्सप्लांट हे रक्ताच्या कर्करोगासारख्या (ल्युकेमिया) गंभीर आजारांच्या उपचारासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, यामध्ये सर्वात मोठे आव्हान म्हणजे दाता आणि रुग्ण यांच्यातील 'ह्युमन ल्युकोसाइट अँटीजेन' (HLA) जुळणे. सख्ख्या भावंडांमध्ये हे गुणसूत्र जुळण्याची शक्यता केवळ २५ टक्के असते, त्यामुळे कुटुंबाबाहेर योग्य दाता शोधणे अधिक कठीण होते, असे डॉक्टर आणि संशोधकांचे म्हणणे आहे.

प्रौढ रक्तविज्ञान (Adult Haematology) विभागाचे सहयोगी प्राध्यापक आणि या बीएमटी युनिटचे प्रमुख डॉक्टर आसिफ इक्बाल यांनी माहिती दिली की, "ज्या मुलावर उपचार झाले, तो १९ वर्षांचा असून त्याचा कर्करोग पुन्हा बळावला होता आणि त्यावर इतर उपचार लागू होत नव्हते. त्याच्या कुटुंबात योग्य दाता नव्हता. त्यामुळे अशा रुग्णाला दीर्घायुष्य मिळण्यासाठी कुटुंबाबाहेरील दाता शोधणे हाच एकमेव पर्याय होता".

बीबीसीआयने जून महिन्यापासून देशातील सर्वात मोठ्या 'दात्री' (DATRI) स्टेम सेल डोनर रजिस्ट्रीच्या माध्यमातून दात्याचा शोध सुरू केला होता. जुलैमध्ये अखेर एक योग्य दाता सापडला.

एकदा का दाता निश्चित झाला की, त्यानंतर पडताळणी टायपिंग, संसर्गजन्य आजारांच्या चाचण्या, दात्याची वैद्यकीय मान्यता आणि स्टेम सेल्स गोठवून ठेवण्याची (cryopreservation) परवानगी अशा गुंतागुंतीच्या प्रक्रिया सुरू होतात. हे स्टेम सेल्स लुधियाना येथील दात्याकडून अनेक राज्यांचा प्रवास करून गुवाहाटीला आणायचे होते. त्यावेळी रुग्णाच्या शरीरात कर्करोगाचे इतर कोणतेही अंश उरले नव्हते, ज्यामुळे ट्रान्सप्लांट करणे सोपे झाले.

दात्याच्या एका लांबच्या नातेवाईकामुळे या १८.५ लाख रुपयांच्या प्रक्रियेसाठी मदत झाली. दात्याच्या पेशी अनेक राज्यांमधून प्रवास करून येणार होत्या, त्यामुळे रुग्णालय प्रशासन आधीच सतर्क होते. सुरक्षिततेचा उपाय म्हणून डॉक्टरांनी रुग्णाचे स्वतःचे स्टेम सेल्सही जमा करून ठेवले होते, जेणेकरून बाहेरून आणलेले स्टेम सेल्स शरीराने स्वीकारले नाहीत तर त्याचा वापर करता येईल.

"जागरूकतेच्या अभावामुळे ईशान्य भारतात स्टेम सेल दात्यांची संख्या खूपच कमी आहे. तो मुलगा नशीबवान होता, पण अशा रुग्णांना मदत करण्यासाठी आपल्याला अधिक दात्यांची गरज आहे", असे डॉ. इक्बाल म्हणाले.

डॉ. इक्बाल पुढे म्हणाले की, "लुधियाना (पंजाब) येथून हे जीव वाचवणारे स्टेम सेल्स सुरक्षितपणे आणण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागली. यासाठी दात्याची संस्था, विमानतळ अधिकारी, सरकारी विभाग, लुधियानाचे अफेरेसिस सेंटर आणि बीबीसीआयचे ट्रान्सप्लांट युनिट यांच्यात अचूक ताळमेळ असणे आवश्यक होते".

दात्याचा आणि रुग्णाचा रक्तगट (ABO) जुळत नसूनही स्टेम सेल्स सुरक्षितपणे पोहोचले आणि लगेच ट्रान्सप्लांट करण्यात आले. रुग्णावर संपूर्ण शरीराच्या इरिडिएशनवर (TBI) आधारित प्रक्रिया करण्यात आली, जे बीबीसीआयच्या कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. ही टीबीआय प्रक्रिया रेडिएशन ऑन्कोलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कौशिक कटाकी यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाली. या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले 'लंग शिल्ड' बीबीसीआयमध्येच स्थानिक पातळीवर तयार करण्यात आले होते.

डॉ. आसिफ इक्बाल यांनी सांगितले की, ही कामगिरी म्हणजे ट्रान्सफ्यूजन मेडिसिन, हिमेटो-पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि बीएमटी नर्सिंग स्टाफ अशा विविध विभागांच्या निष्ठेचे फळ आहे.

स्टेम सेल दान लोकप्रिय करण्यासाठी डॉ. इक्बाल यांनी विशेष पावले उचलली आहेत. ते जानेवारी महिन्यात राज्यात जनजागृती मोहीम राबवणार आहेत. त्यांनी 'आवाज-द व्हॉइस'शी बोलताना सांगितले की, "ईशान्येत २०० हून अधिक आदिवासी समुदाय आहेत आणि त्यांच्यात जागरूकतेची कमतरता आहे. जेव्हा त्यांना कर्करोग होतो, तेव्हा त्यांना दात्यासाठी बाहेरील संस्थांकडे धाव घ्यावी लागते".

ते पुढे म्हणाले की, संपूर्ण ईशान्य भारतात स्टेम सेल दानाचा असा कोणताही जुना दाखला नाही. "माणसाच्या शरीरात ५ लिटर अस्थिमज्जा असते आणि त्यातील केवळ १५० मिलीलिटर जरी एखाद्याने दिले, तरी कर्करोग रुग्णाला नवे आयुष्य मिळू शकते. रक्तदान करण्याइतकेच हे सोपे आहे आणि यामुळे कोणालाही कर्करोगाविरुद्धचा योद्धा बनण्याची सुवर्णसंधी मिळते", असेही त्यांनी नमूद केले.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter