काश्मीरमधील मदरसा शिक्षक : कट्टरतावादाला रोखणारे पडद्यामागचे खरे योद्धे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

डॉ. खालिद खुर्रम

जम्मू-काश्मीरमधील कट्टरतावादाचा विचार करताना अनेकदा आपण भू-राजकारण, दहशतवाद आणि बाह्य प्रभावांवरच चर्चा करतो. मात्र, या सगळ्यात एक महत्त्वाचा स्तर दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे मदरसा शिक्षण. हे मान्य करावेच लागेल की, सर्वच मदरसे फुटीरतावादी विचार शिकवत नाहीत, परंतु अनेक मदरसे आजही अशा वातावरणात काम करतात जिथे केवळ धार्मिक ओळखीलाच सर्वोच्च स्थान दिले जाते. तिथली व्यवस्था, अभ्यासक्रम आणि शिकवण्याची पद्धत अशा प्रकारची असते की, इस्लाम हाच मानवतेचा एकमेव मार्ग आहे असा विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला जातो. संघर्षाची पार्श्वभूमी असलेल्या या प्रदेशात अशा प्रकारच्या ठाम समजुतींमुळे मुलांच्या सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनाला एक वेगळेच वळण मिळते.

वास्तवाचा स्वीकार आणि मर्यादा

हे वास्तव आपल्याला मोकळेपणाने स्वीकारावे लागेल. दशकानुदशके चाललेला संघर्ष आणि जहाल साहित्याचा प्रभाव यामुळे कट्टर विचारांना पोषक जमीन तयार झाली आहे. आज मदरशांमधील अनेक शिक्षकांचे विचार उदारमतवादी असले, तरी त्यांना तिथली जुनाट व्यवस्था आणि पुराणमतवादी सहकाऱ्यांच्या दबावाखाली राहावे लागते. परंपरेशी तडजोड केल्याचा शिक्का बसेल या भीतीने ते शांत राहतात. त्यामुळे कट्टरतावाद दूर करण्यासाठी प्रयत्न करताना या मर्यादांचा विचार करणे गरजेचे आहे.

शिक्षकांचा विश्वास : एक मोठी ताकद

विचित्र विरोधाभास असा आहे की, याच वातावरणात काम करणारे शिक्षक कट्टरतावादाला उत्तर देण्यासाठी सर्वात प्रभावी ठरू शकतात. सरकार, विद्यापीठे किंवा स्वयंसेवी संस्थांपेक्षा या शिक्षकांकडे लोकांचा आणि विद्यार्थ्यांचा मोठा विश्वास असतो. काश्मीरमध्ये मदरसा शिक्षक हा केवळ शिक्षक नसून तो समाजाचा मार्गदर्शक आणि परंपरेचा रक्षक मानला जातो. हा विश्वास बाहेरून विकत घेता येत नाही. त्यामुळे जर काश्मीरमधील तरुणांना चुकीच्या विचारांपासून वाचवायचे असेल, तर ज्या आवाजावर त्यांचा विश्वास आहे, त्याच माध्यमातून हे प्रयत्न होणे गरजेचे आहे.

कथानक बदलण्याची गरज

काश्मीरमधील अनुभव असे सांगतात की, कट्टरतावादाची सुरुवात शस्त्राने नाही तर चुकीच्या कथानकांनी (Narratives) होते. जेव्हा विद्यार्थ्यांना केवळ मर्यादित धार्मिक साहित्याचाच परिचय करून दिला जातो, तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते. दहशतवादी संघटना याच गोष्टीचा फायदा घेतात आणि जागतिक संघर्षांना धार्मिक युद्धाचे स्वरूप देऊन मुलांची दिशाभूल करतात. हे रोखण्यासाठी अशा विद्वानांची गरज आहे ज्यांना धर्मग्रंथांचे सखोल ज्ञान आहे आणि जे विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखतात. मदरसा शिक्षक या भूमिकेत चपखल बसतात.

अभ्यासक्रमात आधुनिकतेची जोड

यासाठी जम्मू-काश्मीरमधील मदरशांची धार्मिक ओळख न पुसता त्यांचा शैक्षणिक परीघ विस्तारणे आवश्यक आहे. याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पारंपारिक धार्मिक विषयांसोबत 'जम्मू आणि काश्मीर स्टेट बोर्ड'चा (JKBOSE) अभ्यासक्रम अनिवार्य करणे. गणित, विज्ञान, इंग्रजी, समाजशास्त्र आणि नागरिकशास्त्र यांसारख्या विषयांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता विकसित होईल. यामुळे मदरशांचे 'सेक्युलरायझेशन' होणार नाही, तर अभ्यासक्रम संतुलित होईल. विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये, तर्कशुद्ध विचार आणि आधुनिक ज्ञानाची ओळख होईल.

जेव्हा एखादा विद्यार्थी हदीससोबत इतिहास शिकतो किंवा कायद्यासोबत लोकशाहीची तत्त्वे समजून घेतो, तेव्हा त्याची वैचारिक क्षमता वाढते. यामुळे मदरसा पदवीधरांना उच्च शिक्षण, व्यावसायिक कोर्सेस आणि सरकारी नोकऱ्यांच्या संधी मिळतील, ज्यामुळे ते समाजाच्या मुख्य प्रवाहात अधिक घट्टपणे जोडले जातील.

शिक्षकांचे सक्षमीकरण

केवळ अभ्यासक्रम बदलून भागणार नाही, तर शिक्षकांची क्षमता वाढवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक शिक्षक धर्मग्रंथांत पारंगत असले, तरी त्यांना आधुनिक विषयांची पुरेशी ओळख नसते. काश्मीरमधील मध्यवर्ती विद्यापीठ, काश्मीर विद्यापीठ, जम्मू विद्यापीठ आणि आययुएसटी अवंतीपोरा यांसारख्या संस्थांनी मदरसा शिक्षकांसाठी विशेष अभ्यासक्रम राबवावेत. यामध्ये तौलनिक धर्मशास्त्र, शांतता अभ्यास, घटनात्मक साक्षरता आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचा समावेश असावा. हे कार्यक्रम सक्तीचे न ठेवता सहकार्याच्या भावनेतून राबवले जावेत.

अशा प्रशिक्षणांमुळे शिक्षकांना हे समजेल की जहाल गट धर्मग्रंथांचा चुकीचा वापर कसा करतात. धर्माचा आदर करणाऱ्या या शिक्षकांनी जेव्हा मानवी प्रतिष्ठा आणि सहअस्तित्वाचा संदेश दिला, तेव्हा त्याचा प्रभाव अधिक खोलवर पडेल.

मदरशांच्या व्यवस्थेत सुधारणा

मदरशांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्यासाठी 'ॲक्रेडिटेशन सिस्टिम' (मान्यता प्रणाली) लागू करता येईल. सुधारणावादी विचारांच्या शिक्षकांना ओळखून त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. जरी अशा शिक्षकांची संख्या सध्या कमी असली, तरी ते हळूहळू संपूर्ण संस्थेचे बौद्धिक वातावरण बदलू शकतात.

खरे तर मदरसा शिक्षक हे काश्मीरमधील कट्टरतावाद रोखण्याच्या लढाईत आघाडीवर आहेत. मुलांची ओळख, समाजाबद्दलचा दृष्टिकोन आणि श्रद्धेचा अर्थ तेच ठरवतात. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे ही केवळ गरज नसून ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी अनिवार्य आहे.

जर काश्मीरला कट्टरतावादाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल, तर मदरशांचे रूपांतर ज्ञान आणि समृद्धीच्या केंद्रांत झाले पाहिजे. जेकेबीओएसई अभ्यासक्रमाची जोड आणि शिक्षकांचे सक्षमीकरण हे या परिवर्तनाचे मुख्य स्तंभ आहेत. काश्मीरचे भविष्य या शिक्षकांच्या हातात आहे—त्यांनी केवळ धार्मिक कट्टरतेचे नव्हे, तर न्याय, करुणा आणि सहअस्तित्वाचे दूत म्हणून पुढे यायला हवे.

(लेखक काश्मीरमधील शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक असून काश्मीर संघर्षाचे अभ्यासक आहेत)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter