बुलडाणा शहराजवळील पोखरी फाटा परिसरात आयोजित तीन दिवसीय "दिनी इज्तिमा "चा सोमवारी दुपारी सामूहिक प्रार्थनाने समारोप झाला. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशीम या पाच जिल्ह्यांतील हजारो मुस्लिम बांधव या धार्मिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. संपूर्ण इज्तिमा कालावधीत कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे पार पडले.
दिल्लीतील निजामुद्दीन मरकज यांच्या हजरत मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या इज्तिमाची तयारी सुमारे दीड महिन्यापासून सुरू होती. सुमारे १०० एकर क्षेत्रात मंडप उभारण्यात आला होता. त्यासोबत प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, स्नानगृह, वजुखाने, स्वच्छतागृहे, भोजन व्यवस्था, बाजारपेठ आणि वाहनतळ यांचे काटेकोर नियोजन करण्यात आले.
फज्रची नमाज झाल्यानंतर इज्तिमाची औपचारिक सुरुवात झाली. दिल्ली व देशातील विविध भागांतून आलेल्या उलेमांनी उपस्थितांना हजरत मुहम्मद (स.) यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत सदाचार आणि सामाजिक सलोखा यांचे महत्त्व सांगितले, समारोपप्रसंगी मौलाना महमूद अली यांनी सामूहिक प्रार्थना केली, यावेळी पापांपासून दूर राहणे, नमाज व धार्मिक आचरणात सातत्य ठेवत शांतता जोपण्याचा संदेश देण्यात आला.
स्वयंसेवकांची भक्कम यंत्रणा
इज्तिमादरम्यान भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आयोजकांकडून विविध पथके तयार करण्यात आली होती. स्वच्छता, पाणीपुरवठा, भोजन, मार्गदर्शन आणि पार्किंगसाठी स्वयंसेवक रात्रंदिवस कार्यरत होते. लहानसहान बाबींकडेही लक्ष दिल्याने व्यवस्थापन सुरळीत राहिले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत आरोग्यविषयक समस्या उद्भवू नये, म्हणून दहा खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले होते. सरकारी डॉक्टरांसह शहरातील मुस्लिम डॉक्टर व फार्मासिस्टांनी सेवा दिली. औषधेही स्वयं खर्चातून उपलब्ध करून देण्यात आली.
वाहतूक नियोजनामुळे कोंडी टळली
बुलडाणा-खामगाव मार्गावरील पोखरी फाट्याजवळ इज्तिमा झाल्याने वाहतूक व्यवस्थापन आव्हानात्मक होते; मात्र वेगवेगळे पार्किंग झोन, टप्प्या-टप्प्याने वाहने सोडणे आणि स्वयंसेवक-पोलिस यांचा समन्वयामुळे वाहतूक कोंडी टळली. बुलडाणा ग्रामीण व शहर पोलिस अधिकारी व कर्मचारी मदतीसाठी तैनात होते.