पंतप्रधान मोदींच्या ओमान दौऱ्यातून भारताला मिळणार मोठे सामरिक फायदे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत ओमानचे राजदूत ईसा बिन सालेह अल शिबानी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत ओमानचे राजदूत ईसा बिन सालेह अल शिबानी

 

आतिर खान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ओमान दौरा हा भारताच्या सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक संबंधांना नवी झळाळी देण्यासाठी उचललेले एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये पूर्वीपासूनच विश्वास आणि आपुलकी आहे. आता या मैत्रीचे रूपांतर 'धोरणात्मक भागीदारीत' (Strategic Partnership) करण्याची वेळ आली आहे.

ऐतिहासिक संदर्भ आणि गमावलेली संधी

भारताचे ओमानशी असलेले संबंध दशकांपासूनचे आहेत. १९५० च्या दशकात ओमानच्या सुलतानांनी भारताला सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे 'ग्वादर बंदर' भेट म्हणून देऊ केले होते, असे सांगितले जाते. मात्र, तेव्हा दिल्लीने ही ऑफर नाकारली. पुढे प्रिन्स आगा खान यांच्या मध्यस्थीने ग्वादर पाकिस्तानकडे गेले आणि आता तिथे चीनचा वावर आहे.

ही गमावलेली संधी आपल्याला एक गोष्ट शिकवते. ती म्हणजे ओमानसारख्या विश्वासू मित्राशी सतत संपर्कात राहणे किती गरजेचे आहे. ओमानची विश्वासार्हता आणि त्याचे भौगोलिक स्थान यामुळे भारताच्या दीर्घकालीन धोरणांसाठी तो एक नैसर्गिक भागीदार ठरतो.

या दौऱ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

सामरिक महत्त्व

दोन्ही देशांचे संबंध प्राचीन संस्कृतीच्या धाग्यांनी विणलेले आहेत. ओमान हा भारताचा काळाच्या कसोटीवर उतरलेला मित्र आहे. आर्थिक, सांस्कृतिक आणि लष्करी अशा विविध आघाड्यांवर सहकार्य वाढवणे काळाची गरज आहे.

वरिष्ठ पत्रकार डॉ. वाएल अव्वल 'आवाज़ द व्हॉइस'ला सांगतात, "जागतिक महासत्ता म्हणून उदय होत असताना भारताने या भागात आपला प्रभाव वाढवला पाहिजे. ओमानसोबतचे संबंध केवळ व्यापारासाठी किंवा रेड सीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी महत्त्वाचे नाहीत, तर चाचेगिरी रोखण्यासाठी आणि तेलाच्या सुरक्षिततेसाठीही अत्यंत गरजेचे आहेत."

ओमानसोबतचे लष्करी सहकार्य भारताला मोठा फायदा देऊ शकते. हार्मूझच्या सामुद्रधुनीजवळअसल्याने जागतिक ऊर्जा आणि व्यापाराच्या दृष्टीने ओमानचे स्थान अत्यंत मोक्याचे आहे. जगातील जवळजवळ एक तृतीयांश नैसर्गिक वायू (LNG) आणि २५ टक्के तेल याच अरुंद मार्गावरून जाते. त्यामुळे भू-राजकीयदृष्ट्या हे ठिकाण खूप महत्त्वाचे आहे.

भारतीयांसाठी दुसरे घर

ओमानची प्रगत विचारसरणी आणि तिथल्या लोकांच्या मनात भारतीयांबद्दल असलेला आदर, यामुळे ओमान भारतासाठी खास ठरतो. आशियातील इतर देशांच्या तुलनेत नोकरी आणि व्यवसायासाठी भारतीयांना तिथे पसंती दिली जाते. माजी राजनयिक जे. के. त्रिपाठी म्हणतात, "आपण ओमानला आपल्यासोबत ठेवले पाहिजे. हे आपल्यासाठी तुलनेने सोपे आहे."

ओमानमध्ये ८ लाखांहून अधिक भारतीय राहतात. अनेक पिढ्यांपासून तिथे राहणाऱ्या गुजराती व्यापाऱ्यांना 'शेख' ही पदवी देऊन सन्मानित केले आहे. असे म्हणतात की मस्कतमध्ये राहायचे असेल तर अरबी भाषेइतकाच मल्याळम आणि हिंदीचाही उपयोग होतो. तिथे स्थायिक झालेले भारतीयही ओमानच्या संस्कृतीचा मनापासून आदर करतात.

सांस्कृतिक ठेवा

आखाती देशांमध्ये भारताची सांस्कृतिक छाप ओमानमध्ये जेवढी दिसते, तेवढी इतरत्र कुठेही दिसत नाही. ओमान हा या भागातील कदाचित एकमेव असा देश आहे जिथे तीन मंदिरे, तीन गुरुद्वारे आणि तीन चर्च आहेत. यातील काही तर शंभर वर्षांहून अधिक जुनी आहेत. शिव मंदिरात पूजेचे साहित्य जसे की कलावा, प्रसाद आणि मूर्ती स्थानिक ओमानी लोक विकतात. स्थानिक दुकानांमध्ये रामचरितमानस सारखे ग्रंथ मिळतात. मस्कतमध्ये भारतीयांसाठी स्मशानभूमीही आहे. नवरात्रीत गरबा आणि दांडियासाठी मोठे मैदान दिले जाते. भारतीय लोक तिथे अनेक रेस्टॉरंट्स आणि व्यवसाय चालवतात.

सुरक्षेच्या बाबतीतही हा विश्वास दिसून येतो. ओमानी गुप्तचर संस्था धार्मिक मेळाव्यांवर बारीक लक्ष ठेवून असतात, पण भारतीय मंदिरांच्या बाबतीत त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. अधिकारी क्वचितच मंदिराच्या आवारात येतात, इतका विश्वास तिथे आहे.

भौगोलिक जवळीक

भौगोलिकदृष्ट्या ओमान भारताच्या खूप जवळ आहे. मस्कत आणि गुजरात यांमधील समुद्रप्रवास खूप कमी वेळेचा आहे. मस्कत ते मुंबई विमानाचा प्रवास तर मुंबई ते दिल्ली प्रवासापेक्षाही कमी वेळेचा आहे. ओमान एअरला इतर कोणत्याही देशापेक्षा भारतातून जास्त महसूल मिळतो. ही विमान कंपनी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, कोची, हैदराबाद, जयपूर, लखनऊ आणि कोलकाता यांसारख्या शहरांना जोडणारी आठवड्याला सुमारे १६ उड्डाणे चालवते.

राजघराण्याचे प्रेम

ओमानच्या राजघराण्याला भारताविषयी नेहमीच विशेष प्रेम राहिले आहे. ब्रिटिश कागदपत्रांमध्ये सुलतान काबूस बिन सैद यांचा उल्लेख 'इंडियन किंग' असा आढळतो. राजघराण्यातील सदस्य पावसाळ्यात नियमितपणे मुंबईत येत असत. सुलतान काबूस यांचे आजोबा अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये शिकले होते. तिथे आजही 'ओमान हाऊस' या जुन्या आठवणींची साक्ष देत उभे आहे. 'ऑल इंडिया सज्जादानशीन परिषदे'चे अध्यक्ष सय्यद नसीरुद्दीन चिश्ती सांगतात की, ओमानच्या राजघराण्याने ख्वाजा गरीब नवाज यांच्या दरग्याला सढळ हाताने दान दिल्याचा इतिहास आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांनी सुलतान काबूस यांच्या आजोबांना शिकवले होते. या नात्याचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता. जेव्हा डॉ. शर्मा ओमानच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा प्रोटोकॉल तोडून सुलतान काबूस स्वतः त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आले होते. हा सन्मान खूप मोठा होता.

आर्थिक संधी

आर्थिकदृष्ट्या ओमान हे एक आकर्षक ठिकाण आहे. तिथे इन्कम टॅक्स नाही आणि कस्टम ड्युटीही कमी आहे. १९६० च्या दशकापर्यंत तिथे भारतीय रुपया कायदेशीर चलन म्हणून चालत असे. भारतीय कंपन्यांनी तिथे मोठी गुंतवणूक केली आहे. 'ओमान ऑइल कॉर्पोरेशन'ची मध्य प्रदेशात रिफायनरी आहे, तर 'क्रभको' (KRIBHCO) ओमानमध्ये खत कारखाना चालवते. 'बँक ऑफ मस्कत' ही एचडीएफसी बँकेच्या भागधारकांपैकी एक आहे. इंडियन स्कूल, डीपीएस आणि ॲमिटी सारख्या भारतीय शिक्षण संस्थांना तिथे मोठी मागणी आहे.

इतके असूनही, नोकरशाहीच्या दुर्लक्षामुळे वीज, रेल्वे आणि खत क्षेत्रातील अनेक संयुक्त प्रकल्प आपण गमावले आहेत. तज्ज्ञांच्या मते, व्यवसायाच्या अनेक संधी अजूनही आपण पूर्णपणे वापरलेल्या नाहीत. उदाहरणार्थ, ब्राझील लोह खनिज निर्यातीसाठी ओमानचा आशियाई हब म्हणून वापर करतो. भारत आणि ओमान एकमेकांसाठी प्रादेशिक बाजारपेठेत प्रवेश करण्याचे द्वार बनू शकतात.

ओमानमधील कंपन्यांचे सुमारे १६० सीईओ भारतीय आहेत. पण या फायद्याचा वापर करण्यासाठी आपण पद्धतशीर प्रयत्न केले नाहीत. संरक्षण आघाडीवर भारतीय नौदल आणि ओमानचे रॉयल नेव्ही यांच्यात चांगले सहकार्य आहे. संयुक्त सराव आणि सागरी सुरक्षेत सलालाह बंदराची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

माजी राजदूत अनिल वाधवा म्हणतात की, करार असूनही आपण जहाज दुरुस्तीसारख्या क्षेत्रात प्राथमिक स्तराच्या पुढे जाऊ शकलो नाही. ओमानकडे असलेल्या विशाल जमिनीचा विचार करता, तिथे भारतीय शेतकऱ्यांनी साखर आणि गहू पिकवण्यासाठी जमीन भाडेतत्त्वावर घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

पूर्वी ओमानचे अधिकारी प्रशिक्षणासाठी भारतात येत असत, पण अलीकडे हे प्रमाण कमी झाले असून ते पाश्चिमात्य देशांकडे वळले आहेत. नागरी सेवा आणि लष्करी प्रशिक्षणात पुन्हा सहकार्य वाढवल्यास द्विपक्षीय संबंधांना एक नवा आयाम मिळेल.

(लेखक ‘आवाज द व्हॉइस’चे मुख्य संपादक आहेत.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

 

Awaz Marathi Twitter