पोलीस आणि प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मुस्लीम महिलेला मिळाले जीवनदान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
डोंबिवली : नाजमी सलीम शेख यांचा जीव वाचवणारे पोलीस व दोन प्रवासी
डोंबिवली : नाजमी सलीम शेख यांचा जीव वाचवणारे पोलीस व दोन प्रवासी

 

अंबरनाथ लोकल सुटणार म्हणून दोघी मायलेकी पळत जाऊन ती लोकल पकडण्याचा प्रयत्न करत होत्या. मुलगी लोकलच्या डब्ब्यात चढली म्हणून आईने देखील धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकलने वेग पकडला असल्याने तिचा तोल जाऊन ती पडली.

लोकल आणि रेल्वे फलाटाच्या गॅप मध्ये महिला सापडणार तोच काही प्रवासी व कल्याण जीआरपी जवानाने क्षणात तिला बाजूला खेचले. ही घटना बुधवारी दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली आहे. नाजमी सलीम शेख (30) असे महिलेचे नाव असून तिच्या मुलीला अंबरनाथ रेल्वेस्थानकात उतरवून नंतर आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याघटनेचे सीसीटीव्ही व्हायरल झाले आहेत.

कल्याण-कर्जत रेल्वेमार्गावरील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बुधवारी दुपारी नाजमी ही महिला आपल्या 9 वर्षाच्या मुलीसह प्रवास करत होती. अंबरनाथ पूर्वेतील आंबेडकर नगर मध्ये त्या राहण्यास असून विठ्ठलवाडी स्थानकातून लोकल पकडून त्यांना घरी जायचे होते.

रेल्वे फलाटावर अंबरनाथला जाणारी लोकल लागली होती. लेडीज डब्बा पकडण्यासाठी नाजमी या घाईत मुलीला घेऊन जात होत्या. तेवढ्यात लोकल सुटण्याची घोषणा झाल्याने त्या मुलीला घेऊन धावू लागल्या. लोकल चालू झाली आणि नाजमी यांची मुलगी लोकल मध्ये चढली.

मात्र लोकलने वेग पकडल्याने नाजमी यांचा तोल गेला व त्या खाली पडल्या. लोकल आणि फलाट यामध्ये त्या जाणार तोच दोन प्रवासी व गस्तीवरील असलेले ऋषीकेश माने या जीआरपी पोलिसांनी क्षणात नाजमी यांना बाहेर खेचले. लोकल प्रवाशांना मुलीला पुढील स्थानकात पोलिसांच्या हवाली करण्याची सूचना केली.

लोकलमधील प्रवाशांनी या मुलीला धीर दिला. रेल्वे स्टेशन मास्तर आणि पोलिसांनी तातडीने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडल्या प्रकाराची माहिती अंबरनाथ रेल्वे स्थानकातील पोलिसांना दिली. या महिलेला गंभीर दुखापत किंवा अन्य काही इजा झाली नाही. हवालदार आठवले यांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकात जाऊन मुलीला ताब्यात घेतले.

नंतरच्या बदलापूर लोकलने नाजमी शेख अंबरनाथ रेल्वे स्थानकात पोहोचली. मुलीला नाजमीच्या ताब्यात देण्यात आले. ऋषीकेश माने यांच्या तत्परतेमुळे या महिलेचे प्राण वाचल्याने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांचे कौतुक केले असून याची कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.