प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर चर्चेत असताना आता आणखी एक तरुणी चर्चेत आली आहे. पाकिस्तानातील जवेरिया खानम सर्व परवानग्या घेत अधिकृत मार्गाने भारतात दाखल झाली आहे. जावेरिया आणि कोलकाता येथील समीर खान यांचं प्रेम आता सुखद टप्प्यावर पोहोचलं आहे. दोघेही आता लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र दोघांसाठी हे इतकं सोपं नव्हतं. या क्षणाची वाट पाहण्यासाठी दोघांना पाच वर्षांची वाट पाहावी लागली आहे.
पाकिस्तानची जवेरिया खानम आता भारताची सून होणार आहे. कोलकाता येथील समीर खान आणि कराची येथे राहणारी जवेरिया हे जर्मनीत भेटले होते. दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी २०१८ मध्ये एंगेजमेंट केली होती. जवेरियाला भेटून आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे समीरने सांगितले.
आईच्या मोबाईलमध्ये पाहिला फोटो
समीरने आपली प्रेमकहाणी सांगताना म्हटलं की, सुमारे साडेपाच वर्षांपूर्वी मी माझ्या आईच्या मोबाईलमध्ये जवेरियाचा फोटो पाहिला. आईकडे तिच्याबाबत विचारणा केली. आईने सांगितले की ती कराचीतील तिच्या एका नातेवाईक अजमत इस्माईल खानची मुलगी आहे. त्याच क्षणी मी आईला सांगितले की मला जवेरियाशीच लग्न करायचं आहे. यानंतर शिक्षणादरम्यान दोघांची जर्मनीत भेट झाली आणि नंतर दोघेही प्रेमात पडले. मात्र कोरोनामुळे दोघांनाही जर्मनीहून आपापल्या देशात परतावे लागले.
४५ दिवसांनी पाकिस्तानात परतावं लागणार
मंगळवारी जवेरिया अटारी सीमेवरून अमृतसरला पोहोचली. येथे तिचं समीर खान आणि सासरे अहमद कमाल खान यांची स्वागत केले. लग्नासाठी जवेरिया खानम ४५ दिवसांच्या व्हिसावर भारतात पोहोचली आहे. येत्या ६ जानेवारील दोघेही लग्न करणार आहेत.लग्नासाठी जवेरियाच्या कुटुंबातील कोणीही पाकिस्तानातून आलेले नाही.
दोनदा व्हिसा नाकारला
मागील पाच वर्षांपासून जवेरिया भारतात येण्यासाठी व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करत होती. भारत सरकारने जवेरियाला दोनदा व्हिसा देण्यास नकार दिला होता. अखेर आता ती भारतात पोहोचली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मकबूल अहमद वासी कादियान यांच्या प्रयत्नांमुळे जवेरियाला व्हिसा मिळू शकला.